संत्रा उत्पादकांच्या एकीतून प्रगतीच्या वाटेवर वडजी

वाशीम जिल्ह्यात वडजी गावातील सुमारे ९५ शेतकऱ्यांनी एकत्र येत संत्रा पिकात आघाडी घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला शेतीशाळा, ज्ञानाचे आदान-प्रदान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून बागेची उत्पादकता वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याद्वारे अर्थकारण आणि स्वतःबरोबर गावाची प्रगती होण्याला हातभार लागत आहे.
-अवघी तीन वर्षे वयाची झाडे अशी जोमदार झाली आहेत.
-अवघी तीन वर्षे वयाची झाडे अशी जोमदार झाली आहेत.

वाशीम जिल्ह्यात वडजी गावातील सुमारे ९५ शेतकऱ्यांनी एकत्र येत संत्रा पिकात आघाडी घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला शेतीशाळा, ज्ञानाचे आदान-प्रदान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून बागेची उत्पादकता वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याद्वारे अर्थकारण आणि स्वतःबरोबर गावाची प्रगती होण्याला हातभार लागत आहे.   सोयाबीन पिकात ओळख असलेला वाशीम जिल्हा आता संत्रा उत्पादनासाठी पुढे येत आहे. जिल्ह्यात सुमारे आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक संत्रा लागवड झाली असून, दरवर्षी क्षेत्र व शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. यातही जिल्ह्यात वडजी गावाने वेगळेपण जपले असून सुमारे ९५ शेतकरी संत्रा पिकात आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या वाटेने निघाले आहेत. यासाठी जे जे करावे लागेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. वडजी गावाविषयी

 • लोकसंख्या- १३४५
 • भौगोलिक क्षेत्र ५९५ हेक्टर, पैकी लागवडयोग्य क्षेत्र- ५६० हेक्टर
 • फळबाग- २२० एकर (संत्रा २०० एकर, पेरू १० एकर, सीताफळ १० एकर)
 • शेतीशाळेतून ज्ञानाचा प्रसार गावातील शेतकऱ्यांची संत्रा शेतीतील प्रयोगशील वृत्ती पाहून तीन वर्षांपूर्वी करडा कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला. उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील त्यामध्ये मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांच्या पुढाकारातून वर्षभरापासून प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला शेतीशाळा होते. त्या वेळी सर्व संत्रा उत्पादक एकत्र येतात. दरवेळी पाच विविध प्रातिनिधिक बागांची पाहणी होते. सकाळी नऊ वाजता सुरू होणारी शेतीशाळा सायंकाळपर्यंत सुरू असते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञही निमंत्रित केले जातात. चर्चेअंती मिळालेल्या सल्ल्याचे प्रत्येक जण पालन करतो. छायाचित्रांसह ‘व्हॉट्‍सॲप ग्रुप’ वर ज्ञानाचे आदान-प्रदान होते. मिळताहेत परिणाम एक पीक केंद्रस्थानी ठेवून त्यासाठी सातत्याने शिवारफेऱ्या घडणे ही बाब महत्त्वाची ठरते आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी लावलेल्या बागा काढून टाकण्याच्या मनःस्थितीपर्यंत काही शेतकरी पोहोचले होते. परंतु संपूर्ण बागेचे पुनरुज्जीवन करणे व उत्पादन वाढवणे त्यांना शक्य झाले आहे. किडी-रोगांचे वेळेवर नियंत्रण, मृग बहर, बाग ताणावर सोडणे, छाटणी, शेणखत, ट्रायकोडर्मा, अन्नद्रव्ये आदी व्यवस्थापन सुधारत आहे. उत्पादन वाढले वडजीत सात शेतकऱ्यांकडे जुन्या बागा आहेत. नव्या बागांसह शेतकरी संख्या ९५ वर पोहोचली आहे. काही बागा पुढील हंगामात उत्पादनक्षम होत आहेत. प्रातिनिधिक बोलायचे, तर राजेश बोरकर यांची २० वर्षांपूर्वीची बाग आहे. त्यांना पूर्वी हेक्टरी १५ ते १८ टन उत्पादन मिळायचे. अन्य शेतकऱ्यांचे उत्पादन जवळपास असेच होते. आता त्यात दोन ते पाच टनांपर्यंत वाढ झाली आहे. बोरकर यांच्या जुन्या बागेतील (सव्वा एकर) ११० झाडांवर एक हजार क्रेट (प्रति २४ किलो) माल निघाला. सहाशे रुपये प्रति क्रेटप्रमाणे विक्री केली. नव्या बागेतील १८ झाडांवर १०० क्रेट संत्रा मिळाला. तो उच्चतम दर्जाचा असून, हजार रुपये प्रति क्रेट दर मिळाला. स्वखर्चाने प्रगतीला चालना वडजीतील शेतकरी प्रामुख्याने शासनाच्या योजनांचा आधार न घेता स्‍वखर्चाने आपल्या प्रगतीला चालना देत असल्याचे दिसते. बाग उभारणीपासून ते विविध प्रकारच्या व्यवस्थापनापर्यंत अनुदानासाठी कुठले काम करायचे नाही ही मानसिकता प्रत्येकाने तयार केली आहे. संत्रा बागेतून शेतकऱ्यांच्या व पर्यायाने गावाच्या प्रगतीला हातभार लागत आहे. जुन्या बागायतदारांपैकी काहींनी शेतजमीन घेतली. घरे बांधली. कुणी शेततळे खोदले, कुणी शेतीचे सपाटीकरण केले, कुणी विहिरी खोदल्या. मुलांना चांगले शिक्षण देणे शक्य झाले. कुणी तालुक्याच्या ठिकाणी प्लॉट घेतला. कुणाकडे ट्रॅक्टर, दुचाकी आली. पूर्वी शेतकरी व्यापाऱ्यांना पूर्ण बाग द्यायचे. आता ‘मार्केटिंग’चा फंडा बदलू लागला आहे. क्रेटप्रमाणे सौदे होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दीड पटीने पैसे अधिक मिळत असल्याचा अनुभव येत आहे. ग्रेडिंग युनिट सुरू करणार यंदा संत्रा विक्रीत शेतकऱ्यांना विविध अनुभव आले. चांगल्या प्रतीचा माल व्यापारी जागेवर खरेदी करण्यासाठी लगबग करतात. मात्र अपेक्षित दर देत नाहीत. अशावेळी काही शेतकऱ्यांनी स्वतः बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना ग्रेडिंग, पॅकिंगची आवश्‍यकताही जाणवली. आता सामूहिकपणे पहिल्या टप्प्यात ‘ग्रेडिंग युनिट’ उभारण्याचा मानस शेतकऱ्यांचा आहे. प्रतिक्रिया वाशीम जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र वाढते आहे. कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र मिळून ‘क्लस्टर’ तयार करीत आहेत. सर्वच शेतकऱ्यांना व त्यातही पाच एकरांच्या आत क्षेत्र असलेल्यांनाही त्याचा चांगला फायदा मिळू शकेल. -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम एखाद्या पिकात शेतकरी एकत्र येत झपाटल्यागत काम करतात त्याचे परिणाम दिसून येतात. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनातून तंत्रज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वडजीसारखी अन्य गावे उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. -निवृत्ती पाटील, उद्यानविद्या तज्ज्ञ, केव्हीके, करडा संपर्क- ९९२१००८५७५

  आमचा सुमारे ९५ शेतकऱ्यांचा गट आहे. प्रत्येकात एकोप्याची भावना असून, शेतीतून गावाची प्रगती प्रेरक ठरत आहेत. गावातील उच्चशिक्षित तरुण अधिकाधिक शेतीत उतरले तर भविष्यासाठी ही नक्की वेगळी बाब ठरेल. - गोपाल विलासराव बोरकर, युवा शेतकरी, वडजी संपर्क- ९२८४०५५१४२

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com