दुग्ध व्यवसायासोबत यशस्वी गांडूळ खतनिर्मिती

परभणी जिल्ह्यातील उमरा (ता. पालम) येथील शिंदे बंधूंचे एकत्रित मोठे संयुक्त कुटुंब आहे.आपल्या ३५ एकर शेतीची प्रगती साधताना कुटुंबातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी उचलूनदुग्ध व्यवसाय व गांडूळ खत व व्हर्मिवॉशनिर्मिती करून शेतीची आर्थिक बाजू भक्कम केली आहे. आपल्या उत्पादनांना त्यांनी जिल्ह्याबाहेरही बाजारपेठ मिळवली आहे.
गांडूळखताचे बेडस व तयार दर्जेदार खत.
गांडूळखताचे बेडस व तयार दर्जेदार खत.

परभणी जिल्ह्यातील उमरा (ता. पालम) येथील शिंदे बंधूंचे एकत्रित मोठे संयुक्त कुटुंब आहे. आपल्या ३५ एकर शेतीची प्रगती साधताना कुटुंबातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी उचलून दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत व व्हर्मिवॉशनिर्मिती करून शेतीची आर्थिक बाजू भक्कम केली आहे. आपल्या उत्पादनांना त्यांनी जिल्ह्याबाहेरही बाजारपेठ मिळवली आहे.   परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील डोंगराळ, दुष्काळी भागातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती तसेच पूरक पशुपालन, दुग्ध व्यवसाय करू लागले आहेत. गंगाखेड-लोहा राज्य रस्त्यावर पालम या तालुका ठिकाणापासून काही अंतरावर उमरा गाव आहे. येथील कै.. विश्‍वनाथराव शिंदे यांना सुरेश, ज्ञानेश्‍वर, विनायक, भास्कर, सुधाकर अशी पाच मुले. पैकी सर्वांत धाकटे सुधाकर ‘आयएएस’ झाले. त्रिपुरा येथे ते जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. ज्ञानेश्‍वर, विनायक, भास्कर हे बंधू शेतीची धुरा सांभाळतात. कुटुंबाची उमरा शिवारात ३५ एकर जमीन आहे. खरीप, रब्बी व आले आदी प्रमुख पिके आहेत. गांडूळ खतनिर्मिती व्यवसाय परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून बी.टेक. (अन्नतंत्र) पदवी घेतल्यानंतर सुधाकर यांनी स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवीत उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी पदापर्यंत भरारी घेतली. प्रशासकीय सेवेत राहूनही त्यांनी शेतीची आवड कायम जपली. घरच्या शेतीला बळ देण्यासाठी ज्येष्ठ बंधूंना ते नेहमीच पूरक व्यवसायांबाबत प्रोत्साहित करीत राहिले. सध्याच्या काळात सेंद्रिय शेती व त्या आनुषंगिक गांडूळ खताला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन त्यातच उतरायचे शिंदे कुटुंबाने नक्की केले. लाल कंधारी बैलजोडी, गाय, म्हशी अशी एकूण २५ जनावरे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेण उपलब्ध होते. सन २०१७ मध्ये शेतातील मोकळ्या जागेत शेड उभारून दोन वर्षे १०० ते २०० क्विंटलपर्यंत गांडूळ खत उत्पादन घेतले. घरच्या शेतीत वापर केला. पॉलिथिन बेडमध्ये निर्मिती सन २०१९ मध्ये शेतातच कमी खर्चातील शेड व पॉलिथिन बेड उभारून गांडूळ खत उत्पादन सुरु केले. हळूहळू मार्केटिंग व विक्री वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आज सुमारे २५ बेड्‌स असून, प्रति बेड तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे एक टन खतनिर्मिती करण्यापर्यंत यशस्वी पल्ला गाठला आहे. घरच्या वापरासाठी ठेवून उर्वरित विक्री होते. पॉलिथिन बेड्‌स असल्याने शेतात कोणत्याही ठिकाणी निर्मिती साध्य करता येते. तीन ते चार मजूर वर्षभर रोजंदारी तत्त्वावर काम करतात. मागणी वाढत असल्यामुळे आगामी काळात उत्पादन वाढविण्यात येणार आहे. व्हर्मिवॉश उत्पादन... शंभर लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या दहा टाक्यांमध्ये गाईचे शेण, गांडूळ कल्चर व पाणी यांचा वापर करून व्हर्मिवॉश तयार केले जाते. दररोज ३० लिटरपर्यंत तर वर्षभरात ३ ते ५ हजार लिटरपर्यंत निर्मिती होते. एक आणि पाच लिटर प्लॅस्टिक बॉटलमधून ‘सनया व्हर्मिवॉश’ नावाने विक्री होते. गांडूळ खत प्रति किलो १० रुपये, व्हर्मिवॉश एक लिटर १०० रुपये, तर पाच लिटरसाठी ४०० रुपये असे दर आहेत. उत्पादनांचे विपणन लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील शेतकरी खत खरेदी करतात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा, तर पुणे जिल्ह्यातील बारामती भागातील शेतकऱ्यांकडून व्हर्मिवॉशला मागणी आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी वितरक नेमला आहे. त्या माध्यमातून प्रचार होण्यास मदत होते. ज्ञानेश्‍वर यांचे चिरंजीव निरंजन यांनी ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून कृषी गंगा चॅनेल सुरू केले आहे. त्याद्वारेही उत्पादनांचे विपणन सर्वत्र होण्यास मदत झाली आहे. दुग्ध व्यवसायाची मदत सात वर्षांपूर्वी दोन गावरान म्हशी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्या वेळी दहा लिटरपर्यंत दूध उत्पादन व्हायचे. दोन वर्षांपूर्वी जाफराबादी, मुऱ्हा जातीच्या म्हशी घेतल्या. सध्या एकूण ११ म्हशी आहेत. दररोज ८० लिटरपर्यंत दूध संकलन होते. दहा लिटर दूध घरी ठेवतात. पालम येथे ६० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. गावात तेलंगण राज्यातील मस्कती डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू केले आहे. लिटरला सरासरी ४५ ते ५० रुपये दर मिळतो. मागणीनुसार तूप, पनीर, खवाही तयार करतात. कुटुंबातील प्रत्येकाचे श्रमदान शिंदे यांचे २१ सदस्यांचे कुटुंब आहे. प्रत्येकाने जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. ज्ञानेश्‍वर यांच्याकडे गांडूळ खत उत्पादन- विक्री जबाबदारी आहे. विनायक दुग्ध व्यवसायाचे, तर भास्कर पीक व्यवस्थापन व विक्री पाहतात. गावात दूध संकलन केंद्र चालवतात. एक सालगडी आहे. शेतीतील ठळक बाबी

  • चारा पिकांसाठी चार- पाच एकर क्षेत्र राखीव.
  • सोयाबीन २५ एकरांत. एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन. दोन एकर आले (माहीम)- एकरी १०० क्विंटलपर्यंत उत्पादन.
  • दोन वर्षांपासून रासायनिक निविष्ठांचा वापर बंद. सेंद्रिय व गांडूळ खत वापरावर भर.
  • सिंचनासाठी विहीर. हंगामी पिकांना तुषार व फळबागांस ठिबकद्वारे पाणी.
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अडीच एकरांत पेरू. तैवान आणि रत्नदीप जातींची लागवड. पेरू आणि लिंबूत पपईचे आंतरपीक. एक एकर लिंबू.
  • संपर्क- भास्कर शिंदे, ९७६३९८७२३७ ज्ञानेश्‍वर शिंदे, ८४५९८९३२७०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com