घोले यांनी विकसित केला वैशिष्ट्यपूर्ण ‘संदीप प्याज’

पाटस (ता. दौड) येथील युवा शेतकरी संदीप घोले यांनी सुमारे आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर कांद्याची नवी जात निवड पद्धतीने विकसित करण्यात यश मिळवले आहे. ‘संदीप प्याज’ असे त्याचे नामकरण केले आहे. लाल आकर्षक रंग, चांगली उत्पादकता व टिकवणक्षमता, किडी-रोगांना काटक असे त्यांचे वाण राज्याबरोबर परराज्यांतही लोकप्रिय झाले आहे.
घोले यांचे कांद्याचे शेत
घोले यांचे कांद्याचे शेत
Published on: 
Updated on: 

पाटस (ता. दौड) येथील युवा शेतकरी संदीप घोले यांनी सुमारे आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर कांद्याची नवी जात निवड पद्धतीने विकसित करण्यात यश मिळवले आहे. ‘संदीप प्याज’ असे त्याचे नामकरण केले आहे. लाल आकर्षक रंग, चांगली उत्पादकता व टिकवणक्षमता, किडी-रोगांना काटक असे त्यांचे वाण राज्याबरोबर परराज्यांतही लोकप्रिय झाले आहे.   पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पाटस गावाचे प्रयोगशील युवा शेतकरी संदीप घोले यांचे पंचक्रोशीत नाव आहे. बारावीनंतर त्यांनी शेती व्यवसाय करत असताना बाहेरून शिक्षण पूर्ण केले. संदीप ऊस पट्ट्यातील शेतकरी आहेत. प्रयोगशीलता व प्रयत्नवाद उपयोगात आणत त्यांनी ऊसशेतीत मास्टरी मिळवली. त्याचबरोबर कांदा पिकाची शेतीही सुरुवात केली. मात्र कांद्याची उत्पादकता, गुणवत्ता व टिकवणक्षमता यात समाधानकारक हाती लागत नव्हतं. काही वेळा बियाणे निकृष्ट प्रतीचे असायचे. मग संदीप यांनी या सर्व बाबींच्या अनुषंगाने अभ्यास सुरू केला. डबल रिंग (दुबाळका) असलेल्या कांद्याची टिकवमक्षमता कमी असल्याचं त्यातून लक्षात आलं. मग सुमारे ८ वर्षे कसून काम करून पुना फुरसुंगी जातीतून निवड पद्धतीने कांद्याची नवी जात तयार करण्यात त्यांना यश मिळालं. संदीप यांची सुमारे १२ एकर शेती आहे. त्यात प्रत्येकी चार एकर ऊस व चार एकर कांदा असतो. रोपवाटिका तयार करून लागवड करण्यावर त्यांचा भर असतो. ‘संदीप प्याज’ जातीविषयी...

  • सिंगल रिंगचा कांदा. फुटत नाही. ओलसरपणा कमी असतो. असा कांदा बियाण्यासाठी योग्य असल्याचं संदीप सांगतात. फुटीचे आणि दुबाळ कांद्याचा उपयोग बियाण्यासाठी केल्यास तो टिकण्यास योग्य नसतो. ओलसरपणा अधिक असतो. त्यामुळे लवकर खराब होतो.
  • आकर्षक लाल रंग
  • संदीप रब्बी हंगामात लागवड करतात. १२० दिवसांत पक्व होतो.
  • उत्पादकता- एकरी १६ ते २० टन. २२ टनांपर्यंतही उत्पादन घेतल्याचे संदीप सांगतात.
  • रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे. करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो.
  • कांदा चाळीत सुमारे पाच महिन्यांपर्यंत टिकू शकतो.
  • गोडसर- तिखट स्वाद
  • कृषी विद्यपीठात चाचण्या दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात संदीप यांच्या कांदा बियाण्याची चाचणी झाली आहे. त्यात संदीप प्याज हेक्टरी ३७. ५ उत्पादनासह पहिल्या क्रमाकांवर आले होते. या वेळी त्यांच्या तुलनेत अन्य एका शेतकऱ्याचे तसेच राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा, लसूण संशोधन संचालनालयाकडील जातीही होत्या. जातीचा प्रसार आपल्या जातीचे कायदेशीर मालकी हक्क घेण्यासाठी संदीप यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार राजगुरुनगर येथील कांदा- लसूण संशोधन संचालनालयाकडे आवश्‍यक माहिती पाठवली आहे. आपल्या जातीचा प्रसार शंभर शेतकऱ्यांपर्यंत झाल्याचे संदीप सांगतात. गुजरात राज्यातील ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’च्या माध्यमातून त्याचे बियाणे राज्यासह परराज्यांतील शेतकऱ्यांकडे चाचणीसाठी पाठवण्यात आले. जातीची उत्पादनक्षमता, टिकवणक्षमता व अन्य बाबींच्या निकषांत संदीप यांची जात अव्वलस्थानी राहत सर्व निकषांत योग्य बसली. एक गाव एक वाण दर्जेदार बियाण्याबाबत संदीप सांगतात, की आपण ज्या कांदा जातीची लागवड करीत आहे त्यापासून काही निश्‍चित अंतरावरील क्षेत्रातही त्याच जातीचा कांदा असला पाहिजे. यामुळे परागीकरणाचा धोका राहत नाही. याच कारणासाठी ‘एक गाव एक वाण’ उपक्रम राबवण्याचा माझा संकल्प आहे. अशा उपक्रमातून एकसमान पद्धतीने सिंगल रिंगचा कांदा सर्व शेतकऱ्यांना मिळेल. अन्य पिकांतही प्रयोगशीलता संदीप यांनी उसाच्या एकरी १०० टन उत्पादनाचा पल्लाही यापूर्वी गाठला आहे. मागील वर्षी १०९ टनांपर्यंत ते पोचले आहेत. अन्य शेतकऱ्यांना देखील व्हॉट्सॲप व अन्य सोशल मीडियाद्वारे ते पीक सल्ला आणि पाणी व्यवस्थपानविषयी माहिती देत असतात. आपल्या यशाचे श्रेय ते राहुरी नजीक मानोरी येथील प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय वने यांना देतात. विविध प्रयोग करण्याचे धाडस त्यांनीच दिल्याचे संदीप सांगतात. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसे वाढवता येईल यावर त्यांचा भर असतो. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार ऊसशेती व कांदा जातीबाबत केलेल्या कार्याची दखल घेऊन संदीप यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुजरात येथे सन्मानित करण्यात आले आहे.

    संपर्क- संदीप विश्राम घोले, ९६०४७०९७५१

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.