रेशीम शेतीतील समाधान

किनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथील समाधान भिकन पाटील यांनी आपली व्यावसायिक पीक पद्धती सांभाळून त्यास रेशीम शेतीचा मोठा आधार दिला आहे. चोख व्यवस्थापन, सातत्य, मेहनत याद्वारे दर्जेदार रेशीम कोषांचे उत्पादन घेत त्यांनी या व्यवसायातून शेतीचे अर्थकारण भक्कम केले आहे.
पाटील यांचे रेशीम कीटक संगोपन गृह.
पाटील यांचे रेशीम कीटक संगोपन गृह.

किनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथील समाधान भिकन पाटील यांनी आपली व्यावसायिक पीक पद्धती सांभाळून त्यास रेशीम शेतीचा मोठा आधार दिला आहे. चोख व्यवस्थापन, सातत्य, मेहनत याद्वारे दर्जेदार रेशीम कोषांचे उत्पादन घेत त्यांनी या व्यवसायातून शेतीचे अर्थकारण भक्कम केले आहे.   किनगाव (ता.यावल, जि.जळगाव) शिवारात समाधान भिकन पाटील यांची आठ एकर शेती आहे. वडिलोपार्जित शेतीत प्रगती करीत असताना अन्य ४० एकर शेतीही ‘लीज’ वर कसण्यास घेतली आहे. केळी हे प्रमुख पीक आहे. दरवर्षी १५ एकरांत ३० हजारांपर्यंत झाडे असतात. ऊस सहा एकरांत व कांदा, मका आदी पिकेही असतात. बैलजोडी, चार गायी, मिनी ट्रॅक्टर, दोन कूपनलिका, दोन विहिरी आहेत. शेतीला जोड म्हणून विविध व्यवसायांचा विचार केला. दरम्यान गावातील प्रमोद रामराव पाटील यांच्याकडून रेशीम शेतीसंबंधी माहिती व प्रेरणा मिळाली. विविध भागातील रेशीम उत्पादकांकडे जाऊन ती अभ्यासली देखील. त्यातील बारकावे, धोके, गरजा, बाजार, मजुरी खर्च, गुंतवणूक आदी बाबींवर चिंतन केले. गावात वसुंधरा रेशीम शेती गटाची स्थापना झाली होती. त्यातही समाधान सहभागी झाले आणि रेशीम शेतीला २०१७ मध्ये सुरवात झाली. असे आहे संगोपनगृह आपल्या वडिलोपार्जित शेतात सिमेंट, पत्रे यांच्या साह्याने रेशीम कीटक संगोपन गृह उभारले आहे. आतील भागात काँक्रिटीकरण केले आहे. त्याचा आकार ५० बाय २५ फूट आहे. वरील भागात वायूवीजन करणारे ‘फॅन्स’ आहेत. तापमान नियंत्रणासाठी गृहाच्या पूर्व व पश्चिम भागात वृक्षांची लागवड केली आहे. छतावर हिरवी नेट लावली आहे. मध्य भागाची उंची बारा फूट असून आजूबाजूची उंची आठ फूट आहे. लोखंडी रॉड, सळयांच्या मदतीने ४० बाय सहा फूट आकाराचे पाच मजली ‘रॅक्स’ तयार केले आहेत. व्यवस्थापन बाबी व्यवस्थापनासाठी मजुराची नियुक्ती केली आहे. समाधानही आपल्या विविध पिकांचे व्यवस्थापन सांभाळून रेशीम उद्योगाकडे तेवढेच लक्ष देतात. तुतीची अडीच एकरांत लागवड केली आहे. त्याची अधिकाधिक कापणी करण्यावर भर असतो. त्यामुळे फुटवे जोमात येतात व दर्जेदार पाला कीटकांना उपलब्ध होतो. विनय साहेबराव पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, रेशीम अधिकारी रवींद्र सांगळे, यावल तालुका कृषी विभाग, कृषी अधिकारी एम.डी.पाटील यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. शिवाय गावातील रेशीम उत्पादकांच्या संपर्कातही समाधान असतात. एकमेकांच्या अनुभवांची त्या निमित्ताने देवाणघेवाण होते. ‘व्हॉट्स ॲप ग्रूप’वर सक्रिय असतात. उत्पादन प्रति बॅचमध्ये ३५० अंडीपुंजांपासून उत्पादन घेतले जाते. प्रति शंभर अंडीपुंजांमध्ये ६०९ हजार अंडी असतात. चार हजार रुपये खर्च या अंडीपुंजांसाठी दर महिन्याला येतो. सुमारे २८ दिवसांच्या प्रति बॅचमध्ये एकूण सव्वादोन ते पावणेतीन क्विंटल उत्पादन साध्य करण्याचा प्रयत्न असतो. बॅच संपल्यानंतर संगोपन गृहाची स्वच्छता व सफाई होते. शिफारसीत रसायनांच्या मदतीने निर्जंतुकीकरण होते. या कार्यवाहीसाठी पाच ते सात दिवस लागतात. एकूण पाहिले तर दर ४० ते ४५ दिवसांनंतर रेशीम कोष निर्मिती संगोपनगृहात सुरू होते. विक्री, बाजारपेठ किनगावात रेशीम शेती करणारी सर्व मंडळी एकत्र येऊन मालवाहू गाडी भाडेतत्वावर घेतात. त्याद्वारे कोषांची वाहतूक जालना येथील बाजारपेठेत होते. तेथे लिलाव झाल्यानंतर त्वरित पैसे मिळतात. गुणवत्ता, चांगला दर्जा यामुळे तेथील बाजारपेठेत किनगावच्या रेशीम कोषांना अधिकचा उठाव मिळतो. प्रति किलो २२० रुपये तर कमाल ५४० रुपये दर मिळाला आहे. लॉकडाऊनमध्ये दरांत मोठी घट झाली. त्या काळात हा दर २०० रुपयांवर आला. मात्र सातत्यपूर्ण कामकाज व उत्तम व्यवस्थापनावर भर देत समाधान यांची या व्‍यवसायातील वाटचाल सुरू आहे. वर्षातून सात ते आठ बॅचेस घेण्यात सातत्य राखले आहे. दरवर्षी काही लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळते. कमाल पाच ते सात लाख रुपयांपर्यंतची रक्कमही मध्यंतरी मिळाली होती. वर्षाला मजुरी, अंडीपुंज, वाहतूक आदींवर किमान सव्वा लाख रुपये खर्च येतो. या व्यवसायातील उत्पन्नामुळे केळी, कांदा, उसाच्या शेतीत चांगली गुंतवणूक करता येते. काही वेळेस पिकांमध्ये येणारा तोटाही रेशीम शेतीमुळे भरून काढता येतो असे समाधान सांगतात. मेहनत, कष्टांचा सन्मान समाधान यांच्या शेतीचा पसारा अधिक आहे. ते स्वतः ट्रॅक्टर चालवितात. बाजारात स्वतः जाऊन व्यवहार सांभाळतात. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाबद्दल त्यांचा जालना येथे रेशीम संचालक (नागपूर) भाग्यश्री बाणाईत यांच्या हस्ते रेशीम श्री या पुरस्काराने सन्मान झाला आहे. पीक उत्पादनात हातखंडा रेशीम उद्योगात जसे यश मिळवले तसेच त्यांनी पिकांमध्येही मिळवले आहे. केळीची २२ ते २७ किलो वजनाची रास ते मिळवितात. उसाचे एकरी ७० टनांपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. मक्याचे एकरी ३० क्विंटल तर कापसाचे एकरी किमान आठ क्विंटल उत्पादन ते घेतात. गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टी व गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. मात्र खचून न जाता संकटांशी लढून त्यावर मात करण्याचा समाधान यांचा प्रयत्न असतो. संपर्क- समाधान पाटील- ९०११९१९४६१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com