बाजारपेठ अोळखून सेंद्रिय भाजीपाला, कडकनाथ संगोपनावर दिला भर 

आज ग्राहकांना खात्रीचा रसायन अवशेषषमुक्त माल मिळणे गरजेचे आहे. तर शेतकऱ्यांनाही ग्राहकांची गरज आहे. पुण्यातील ग्राहकांच्या पसंतीस आमच्या भाज्या उतरल्यास मागणीत चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे. -भारत रानरूई
भारत रानरूई यांची सेंद्रिय कारल्याची शेती
भारत रानरूई यांची सेंद्रिय कारल्याची शेती
Published on
Updated on

आढीव (जि. सोलापूर) येथील भारत रानरूई यांनी शेतीची बदलती परिस्थिती लक्षात घेत तसेच बाजारपेठेची मागणी लक्षात घेत आपल्या शेतीपद्धतीत बदल केला आहे. अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती त्यांची सुरू आहेच. आता ग्राहकांची मागणी अोळखून एक एकरांत वर्षभर चार भाजीपाला पिकांच्या पद्धती त्यांनी अंगीकारली आहे. कडकनाथ कोंबडीपालनाला असलेली मागणी लक्षात घेऊन संगोपन व विक्री व्‍यवस्था मजबूत केली आहे.  सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरपासून अवघ्या दहा किलोमिटर अंतरावर भारत रानरूई परिवाराची साधारण ३८ एकर बागायती शेती आहे. यात द्राक्षे, डाळिंब, केळी, मका, भाजीपाला आहे. सुमारे २० ते २५ वर्षांपासून ते सेंद्रिय पद्धतीने शेती करीत आहेत. शेतीला शेणखताची व कुटुंबाची दुधाची गरज भागावी म्हणून पाच देशी गायींचा सांभाळ केला आहे. मुक्त गोठ्यामध्ये चार गायी, चार वासरे, एक म्हैस, एक रेडी व एक घोडा असे पशुधन त्यांनी सांभाळले आहे.  बदलत्या स्थितीनुसार शेतीत बदल  रानरूई अत्यंत प्रयोगशील शेतकरी आहेत. विविध पिकांचे प्रयोग करताना सेंद्रिय शेतीतही त्यांनी अनेक  प्रयोग केले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी पॉलीहाउस उभारले. मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यात मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. आता काळाची गरज व बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन त्यांनी आपल्या प्रयोगांची दिशा ठेवली आहे.  ‘कडकनाथ’साठी तयार केले मार्केट  दोन वर्षांपासून कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात स्थिर होताना दिसत आहेत. सध्या त्यांच्याकडे साधारण चारशे कोंबड्या आहेत. मागील वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत त्यांनी कोंबडी व अंडी विक्रीतून चांगले उत्पन्न मिळवले. सुमारे १५० कोंबड्यांची विक्री त्यांनी यशस्वी केली. कडकनाथ कोंबडीला बाजारात चांगली मागणी असल्याचे ते सांगतात. दर दहा दिवसांनी सुमारे ३०० अंडी विक्रीस उपलब्ध होतात. पुणे शहरात त्यांनी आपले ग्राहक तयार केले आहेत. बॉक्समधून ते नियमित अंडी पाठवतात.  असे मिळतात दर  एका अंड्याची किंमत तब्बल ३० रुपये असते. ग्राहक घरी आल्यास २० रुपये दराने विक्री केली जाते. काही परिस्थितीत किंवा टंचाईच्या काळात ६० ते ७० रुपये प्रतिनग दरानेही देखील अंड्यांना मार्केट मिळाल्याचे रानरूई यांनी सांगितले. साधारण सव्वा ते दीड किलो वजनाच्या कोंबडीला ६०० रुपये तर पावणेदोन ते दोन किलो वजनाच्या कोंबड्याला १००० रुपये दर मिळतो. एक दिवसाचे पिलू ६० रुपये तर १० दिवसांचे पिलू ८० रुपये दराने विकले जाते. या व्यवसायातून स्थिरतेकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  भाजीपाला लागवड  द्राक्ष, डाळिंब, बेदाणा आदी प्रकारांमधून आर्थिक बळकटीकरण करण्याचा रानरूई यांचा प्रयत्न असतोच. यापूर्वी सेंद्रिय पद्धतीने टोमॅटो, मिरची आदी पिके त्यांनी सलगपणे घेतली. त्यामुळे भाजीपाला शेतीचा अनुभव त्यांचा गाढा आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वीपासून त्यांनी एक एकरांत चार भाजीपाला पिकांची पद्धत अवलंबण्यास सुरवात केली आहे. यात दोडका, कारले, काकडी, दुधी भोपळा यांचा समावेश आहे. पंढरपूर येथील एका शेतकरी गट संस्थेतर्फे पुण्यात सेंद्रिय विक्री केंद्रांना माल पाठवला जातो. या संस्थेच्या मागणीनुसार रानरूई यांनी ही पद्धत अवलंबिली आहे. विशेष म्हणजे पत्नी विद्या यांनी या भाजीपाला शेतीची जबाबदारी उचलली आहेत. बीएससीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. कडकनाथ कोंबड्यांच्या अंड्यांची विक्री पुणे शहरात केल्याचा अनुभव या दांपत्याच्या पाठीशी होताच. त्यामुळे भाजीपाला विक्रीही सुलभ होईल असा त्यांना आत्मविश्वास आहे.  या भाजीपाल्याला जागेवरच हमीभाव मिळाला आहे. प्रतिकिलोसाठी भोपळा २० रुपये, काकडी २५ रुपये व अन्य भाजी ३५ रुपये दर निश्चित झाला आहे. बाजारात दरात तेजी-मंदी झाली तरीही या दरात फरक पडणार नाही. रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी भाजीपाला पुण्यातील  ग्राहकांना पाठवला जातो. अन्य दिवशी हा भाजीपाला पंढरपूरच्या बाजारपेठेत विकला जातो. या बाजारपेठेत दररोजचे दर बदलत असले तरी ताजा व दर्जेदार माल असल्याने पुण्याच्या तुलनेत पंढरपूरच्या बाजारपेठेतही इतरांपेक्षा चांगला दर त्यांना मिळतो आहे.  सेंद्रिय निविष्ठांचा वापर  रानरूई सेंद्रिय निविष्ठांमध्ये शेणखत, गोमूत्र, गूळ, दूध व अंडी यांचा प्रामुख्याने वापर करतात. फळमाशी तसेच अन्य किडीनिहाय कामगंध, प्रकाश सापळे तसेच चिकट सापळ्यांचा वापर ते करतात. घरच्या जनावरांपासून दररोज सुमारे ५० किलो शेणखत उपलब्ध होते. रोगांच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर ते करतात. डाळिंबात त्यांचा जुना अनुभव आहे. सध्या ७० ते ९० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बेदाण्याचा देखील ‘बीएसआर’ हा ब्रॅंड त्यांनी लोकप्रिय केला आहे.  संपर्क-भारत रानरूई- ९८५०९३४००० 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com