अधिक क्षारयुक्त जमिनीत प्रयोगशील शेती, बहुविध, आंतरपीक पद्धतीचे कुशल व्यवस्थापन

विद्राव्य क्षार, सामूवर नियंत्रण कुंभार पाणी व माती परीक्षण नियमित करतात. जमिनीत चुनखडीचे प्रमाण असून, पाण्यातील विद्राव्य क्षारांचे (टीडीएस) प्रमाण १४०० ते १५०० पर्यंत गेले आहे. सामू साडेआठ ते पावणे नऊच्या आसपास आहे. पाण्यातील क्षार व पीएचचे प्रमाण मोजण्यासाठी टीडीएस मीटर आणि पीएच मीटरचा वापर होतो. ही समस्या दूर करण्यासाठी ‘आरओ’ तंत्रज्ञानाचा वापर होतो. पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर होतो. क्षार कमी करण्यासाठी ताग, धैंचासारखी हिरवळीची पिके घेतली जातात.रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यासाठी ठिबक सिंचनासह विद्राव्य खतांवर भर देण्यात येतो.
उसात विविध हंगामात विविध आंतरपिके घेण्याची कुंभार यांची पध्दत आहे.
उसात विविध हंगामात विविध आंतरपिके घेण्याची कुंभार यांची पध्दत आहे.

क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासूवृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट व्यवस्थापन यातून कुंभार यांनी आपली शेती फायदेशीर, सक्षम व अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक बनवली आहे.   पुणे जिल्ह्यातील मंगरूळ पारगाव (ता. जुन्नर) येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी आपली ओळख पंचक्रोशीत प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून तयार केली आहे. २००३ पर्यंत त्यांची शेती पारंपरिक होती. अभ्यास वाढवल्याशिवाय शेतीत प्रगती होणार नाही, असे त्यांना वाटले. मग अभ्यासू वृत्ती वाढली, विविध भागातील शेतीच्या पाहणीसह कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यांतही भाग घेतला.  प्रयोगशील शेतीची वाटचाल  १९७८ साली कुकडी नदीच्या कालव्यातून पाणी आले आणि मंगरूळ पारगाव भागात शेती वाढत गेली. पुढे पाणी, रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्याने जमिनी क्षारयुक्त, चोपण झाल्या. आता या भागात ही मोठी समस्या बनून राहिली आहे. परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे. आपली शेती सुधारण्यासाठी कुंभार यांनी पुणे-मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले. ऊस व आंतरपीक, बहुविध पीकपद्धती समजावून घेतल्या. त्यातून आदर्श शेती उभी केली.  कुंभार यांची आदर्श शेती 

 • सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा संतुलित वापर 
 • उसाचे पाचट जाळले जात नाही. कापसाची झाडे, नारळाच्या झावळ्या यांची यांत्रिक कुट्टी करून त्यांचा पुनर्वापर. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने वाढला आहे. सध्या त्याचे प्रमाण ०.८ टक्के. 
 • दहा एकर शेती. मात्र क्षारयुक्त असल्याने क्षार सहन करू शकणाऱ्या पिकांची निवड. यात ऊस, कोबी, फ्लॉवर, बीट, चारा पिके यांवर भर. 
 • लागवडीचा तसेच खोडव्याचा ऊस. दोन्हीतही आंतरपिके. 
 • बीटरूट पिकात मधुमका (स्वीट कॉर्न) 
 • एक एकरांत हिरवळीचे पीक धैंचा 
 • उर्वरित क्षेत्रात जनावरांसाठी चारा 
 • कुंडलिक यांना वडील विठ्ठल, आई सौ. देऊबाई, पत्नी सौ. अश्‍विनी, भाऊ प्रदीप आणि वहिनी कविता यांची मदत. 
 • एकात्मिक बहुपीक पद्धती 

 • नुकत्याच लागवड केलेल्या आडसाली उसात फ्लॉवर, राजमा आणि मूग लागवड. साडेचार फुटी सरीत ऊस. बाजूला आंतरपिके. 
 • उसाच्या दीड एकरांत कलिंगड आणि मिरची. ऊस आठ महिन्यांचा झाला असून, सध्या मिरचीचे उत्पादन सुरू आहे. त्याला किलोला १२ रुपयांपासून ते कमाल ६० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. 
 • ऊस तुटून गेलेल्या दीड एकरात धना घेतला. 
 • आंतरपिके घेताना एकमेकांना स्पर्धा होणार नाही अशा पिकांचा विचार 
 • द्विदल धान्य म्हणून मूग आणि राजमाचे आंतरपीक. त्यातून फेरपालट. ही पिके नत्र स्थिरीकरणासही मदत करतात. 
 • राजमाच्या शेंगा तोडणीनंतरचे अवशेष खत म्हणून उपयोगात. त्याचा उसाला लाभ. नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रणासाठी सापळा पीक म्हणून मधुमका उपयुक्त ठरते. 
 • कुकडी नदी, कालव्यामुळे पाण्याची भरपूर उपलब्धता. मात्र ५० टक्के क्षेत्रात ठिबक सिंचन 
 • गाव परिसरात ठिबकचा अवलंब करण्यास सुरवात करणाऱ्यांमध्ये कुंभार यांचे नाव अग्रस्थानी. 
 • माल, मंचर, ओतूर या स्थानिक बाजारांसह नगर, पुणे, मुंबई येथील बाजारांमध्ये स्वत: पोचविला जातो. सर्व बाजारातील व्यापाऱ्यांशी संवाद ठेवून अधिक दर मिळेल तेथे विक्री.  ऊस वगळता उर्वरित तीन एकरांत कांदा. त्यानंतर मधुमका, बीट 
 • पावसाळ्याच्या तोंडावर कोबी, फ्लॉवरसारख्या पिकाला चांगला दर मिळतो. 
 • बीटरूटमधूनही अडीच महिन्यात चांगले उत्पादन मिळते. 
 • आंतरपिके घेताना बाजाराचा अंदाज घेऊन पिकांची निवड होते. 
 • आंतरपिके उसातील उत्पादन खर्च वसूल करतात. उसाचे उत्पन्न बोनसच ठरते. 
 • ऊस कारखान्याला तसेच रसवंतीसही दिला जातो. 
 • विद्राव्य क्षार, सामूवर नियंत्रण  कुंभार पाणी व माती परीक्षण नियमित करतात. जमिनीत चुनखडीचे प्रमाण असून, पाण्यातील विद्राव्य क्षारांचे (टीडीएस) प्रमाण १४०० ते १५०० पर्यंत गेले आहे. सामू साडेआठ ते पावणे नऊच्या आसपास आहे. पाण्यातील क्षार व पीएचचे प्रमाण मोजण्यासाठी टीडीएस मीटर आणि पीएच मीटरचा वापर होतो. ही समस्या दूर करण्यासाठी ‘आरओ’ तंत्रज्ञानाचा वापर होतो. पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर होतो. क्षार कमी करण्यासाठी ताग, धैंचासारखी हिरवळीची पिके घेतली जातात. रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यासाठी ठिबक सिंचनासह विद्राव्य खतांवर भर देण्यात येतो.  उल्लेखनीय उत्पादन  १- परिसरातील उसाचे उत्पादन सरासरी ४० ते ५० टन असताना कुंभार यांनी हे उत्पादन एकरी ८० ते ८५ टनांपर्यंत नेले आहे. एक एकर उसातील कलिंगडाचे २० टन उत्पादन मिळाले. तर मिरचीचे आत्तापर्यंत तीन ते चार टन उत्पादन हाती आले आहे. अजून उत्पादन सुरू आहे. आठ फूट उंच वाढलेल्या उसामुळे मिरचीला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे फळाची चकाकी व प्रत चांगली आहे.  २) बीटरूटमध्ये घेतलेल्या मधुमक्याचे एकरी तीन टन तर सलग अर्धा एकर क्षेत्रात सहा टन उत्पादन मिळाले. सध्या या पिकाला चांगले दर म्हणजे किलोला १२ रुपयांपासून ते २२ रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. 

  पशुपालनाची जोड 

 • सात गायी. यात दोन गीर, पाच जर्सी. दररोज २० लिटर दूध मिळते. यातून खर्च वजा होता दरमहा आठ ते दहा हजारांचे उत्पन्न 
 • शेतीला आवश्‍यक शेणखतही उपलब्ध 
 • चार शेळ्या. त्यातून वर्षाकाठी पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न 
 • रासायनिक खतांच्या खर्चात बचत 

 • हिरवळीची खते, सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर 
 • जीवामृत, दशपर्णी अर्क, कारखान्याकडील जिवाणू खतांचा वापर 
 • फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंध सापळ्यांचा 
 • यातून खते व कीडनाशकांवरील खर्च ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. उत्पादनाचा दर्जाही सुधारला आहे. 
 • संपर्क- कुंडलिक विठ्ठल कुंभार- ९८९०३२८५५६ 

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com