पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप काळाने कुटुंबाने प्रयोगशील शेतीत आपली ओळख तयार केली आहे. परिश्रम, विचारपूर्वक आखलेली फळबाग केंद्रित पीकपद्धती, पीक अवशेष, जैविक घटकांचा भरपूर वापर, कुटुंबातील सर्वांचा शेतीत राबता अशा विविध वैशिष्ट्यांमुळेच त्यांना उल्लेखनीय प्रगती करणे शक्य झाले. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील धालेवाडी येथे संदीप काळाने यांची एकत्रित १९ एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी कुटुंबाची ११ एकर शेती होती. मात्र कष्टांची तयारी व प्रयोगशील वृत्ती यातून पीक पद्धतीत बदल करीत दोन एकर डाळिंबाची लागवड केली. पुढे ती पाच एकरांपर्यंत नेली. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने विविध प्रयोगांचा अनुभव घेत आज फळबाग केंद्रित शेतीचे स्वरूप ठेवले आहे. त्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रात सहभाग असे प्रयत्न केले. सध्याची पीक पद्धती
सीताफळ- दोन एकर- सुमारे ११ वर्षांपासून पेरू- चार एकर- १२ बाय ८ फुटावर लागवड. शेती व्यवस्थापनाची वैशिष्ट्य़े
माती परीक्षण करून पिकांची निवड चोपण जमिनीवर समान पातळी, बांध बंदिस्ती. पाण्याचा निचरा होण्यासाठी दगडी सांडवे बांधून पिकांचे नियोजन डाळिंबासाठी मध्यम पोताची, निचऱ्याची तर पेरू, सीताफळासाठी कसदार, उत्तम निचरा होणारी जमीन निवडली. पेरूची रत्नदीप वाणाची रोपे कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथून आणली. शेणखत, लेंडीखत, कोंबडीखत अशा अधिकाधिक सेंद्रिय खतांचा व गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर. दरवर्षी पेरू व सीताफळासाठी एकरी ३ ते ४ ट्रेलर प्रमाणात खतांचा वापर जीवामृत, स्लरीचा ड्रीपद्वारे वापर. यात अझोटोबॅक्टर, पीएसबी, केएसबी, ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस आदींचा वापर. इएम द्रावण एकरी ६ ते ८ लीटर ड्रीपद्वारे. बेसल डोसमध्ये निंबोळी व करंज पेंडीचा वापर पेंडी बनवणाऱ्या कारखान्यात जाऊन खरेदी करण्यावर भर किडींच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क. रसशोषक किडींच्या प्रकारानुसार निळे, पिवळे चिकट कार्डस, ट्रॅपच्या बाटल्या तसेच कामगंध सापळे स्वतः बनवून वापर. बाजारपेठेच्या मागणीनुसार सकाळी मध्यम पक्वता अवस्थेत मालकाढणी. शेतात पॅकहाऊस. दोन ते तीन प्रकारांत प्रतवारी. जमिनीला उतार देऊन, झाडांना भर लावून बेड बनवून शेताच्या कडेने पूर्ण उतार करून पाण्याचा निचरा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी फळपिकांत द्विदल आंतरपिके. सीताफळ, पेरूत घेवडा, भुईमूग. उसात कांदा. बेवड बदलल्याने उत्पादन चांगले मिळण्यास मदत. पिकांच्या गरजेनुसार पाण्याचे शास्त्रीय नियोजन. दीड कोटी लीटरचे शेततळे. त्यात मत्स्यपालन. ७० ते ८० रुपये प्रति किलो दराने विक्री. पेरू बागेत खोडापासून तीन फूट अंतरावर ठिबकची लॅटरल. जेणेकरून झाडाला दोन्ही बाजूंनी पाणी मिळू शकेल. सीताफळाला खोडापासून अडीच फूट अंतरावर रिंग पद्धतीने लॅटरल. त्यामुळे झाडांना सर्व बाजूंनी ओलावा. पिकांना गरजेनुसार पाणी देणे शक्य. पाण्याचा अतिरिक्त निचरा होत नाही. अन्नद्रव्ये वाया जात नाहीत. आंतरमशागतीसाठी ट्रॅक्टर आणि पॉवर टीलरचा वापर. हातकोळप्याद्वारे आंतरमशागत. कोणत्याही पिकाचा पाला वाया जाऊ न देता त्याचा खत म्हणून वापर. त्यासाठी दोन रोटाव्हेटर्स. त्याद्वारे कुट्टी केली जाते. त्यामुळे सेंद्रिय खत जमिनीला मिळते. जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. विविध कामांसाठी १३ ते १४ अवजारे. बांधावर फळझाडांची लागवड बांधावर पंधरा वर्षांपासून नऊ प्रकारच्या फळझाडांची लागवड. यात नारळ, जांभूळ, कालीपत्ती चिकू, चार प्रकारचे पेरू व आंबे, लिंबू, सीताफळ, रामफळ, फणस. सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन होते. त्यामुळे चव व प्रत चांगली. उत्पादन
बाजारात केव्हा अधिक दर मिळतील हे लक्षात घेऊन त्यानुसार बाजारात फळ आणण्याच्या दृष्टीने दोनवेळच्या बहाराचे नियोजन. पेरूची टप्प्याटप्प्याने छाटणी. जेणेकरून त्याची सलग विक्री सुरू राहिली पाहिजे. सीताफळाचे प्रति झाड ४० ते ५० किलो तर पेरूचे पहिल्या बहारात प्रति झाड २५ ते ३० किलो तर दुसऱ्या बहारात १५ किलोपर्यंत उत्पादन. पेरूला प्रति किलो ३० ते ५० रुपये तर सीताफळाला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर. मागील वर्षी हाच दर १०० रुपयांपर्यंत. आडसाली उसाची सहा बाय दोन फुटांवर लागवड. एकरी ९५ ते १०० टन उत्पादन. या पिकातही हिरवळीची खते, पाचट कुट्टी, शेणखत यांचा वापर. पुणे येथील आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांना शेताच्या बांधावर तर जेजुरी आणि सासवड येथे आठवडे बाजाराच्या दिवशी थेट ग्राहकांना विक्री. काही फळविक्रेत्यांनाही पुरवठा. ॲग्रोवन म्हणजे अमृत संदीप म्हणतात की ॲग्रोवन म्हणजे शेतीतील अमृत आहे. त्यातील अनेक बाबी कुटुंबातील सदस्यांना ‘शेअर’ करतो. विविध संकटांमध्ये शेतकरी प्रयत्नांमधून पुढे जाऊ शकतो तर आपण का नाही अशी प्रेरणा त्यातून मिळते. कृषी विभागाचे मेळावे, कृषी विज्ञान केंद्रे, विद्यापीठे, संशोधन केंद्रे याठिकाणचेही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न असतो. शेतात राबणारे वारकरी कुटुंब काळाने कुटुंब वारकरी संप्रदायाचे आहे. शेतात शक्यतो कमीतकमी मजूरबळ वापरले जाते. आई शकुंतला, वडील महादेव, पत्नी मनीषा असे कुटुंबातील सारे सदस्य राबतात. उत्कर्षा, सिध्दी व संदीप ही नव्या पिढीची मुले शिक्षण घेत असली तरी सुट्टीच्या दिवशी त्यांना शेतात श्रम करण्यास सांगितले जाते. जेणेकरून त्यांना श्रमांची प्रतिष्ठा समजते. पैशांची किंमत लहान वयात कळून येते. संपर्क-संदीप काळाने- ९८८१३०९०४३