अवर्षणग्रस्त आटपाडी तालुक्याजवळील मासाळवाडी (जि. सांगली) येथील आबासाहेब नाना मासाळ या तरुणाने काही वर्षे शेतमजुरी केली. प्रतिकूलतेशी संघर्ष करताना स्वतःची शेती विकसित करायचे स्वप्न पाहिले. कष्ट, अभ्यास व जिद्दीने १५ एकरांवर डाळिंब बाग फुलवून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत आबासाहेबांनी उल्लेखनीय प्रगती घडवली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा कायम अवर्षणप्रवण तालुका म्हणून प्रसिद्ध आहे.प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी या गाजलेल्या कादंबरीत या तालुक्यातील भागांचे वर्णन आढळते. दुष्काळाने इथल्या लोकांच्या जगण्याची कसोटी पाहिली आहे. तरीही परिस्थितीवर मात करून इथला शेतकरी शेतीत नेहमीच प्रयोगशील राहिलेला आहे. तालुक्यात टेंभू योजनेतून कृष्णा नदीचं पाणी फिरू लागले आहे. त्यामुळं इथलं चित्र बदलत आहे. अर्थात, पाणी कधी वेळेत मिळते, कधी नाही. तरीही शेतकऱ्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. मासाळ यांची संघर्षमय शेती तालुक्यातील मासाळवाडी गावाची परिस्थितीही वेगळी नाही. येथील आबासाहेब नाना मासाळ या युवा शेतकऱ्याची सुमारे २० एकर शेती आहे. वडील ज्वारी, बाजरी आदी पिके घ्यायचे. त्यांनी डाळिंबाच्या दोनशे झाडांची लागवड केली. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतरच आबासाहेबांना दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जाण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. सन २००६ पासून अलीकडील पाच वर्षांपूर्वीपर्यंत त्यांनी हा संघर्ष केला. त्यानंतर ते पूर्णवेळ आपली शेती विकसित करताहेत. आई श्रीमती पारूबाई, पत्नी शशिकला, मुले जीवन व ओम असं त्यांचं छोटं कुटुंब आहे. वडिलांचे अलीकडेच म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्ये निधन झाले. त्यांच्याकडून शेतीचे धडे घेत आबासाहेब सध्या १५ एकरांवरील डाळिंब बाग विकसित करीत आहेत. संघर्षातून सुरू आहे शेती चार विहिरी आहेत. पण अत्यल्प पाणी. आटपाडी तलाव गावापासून सात ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. तेथून सुमारे ३० लाख रुपये खर्च करून पाइपलाइन करून पाणी आणले. पाणी उचलून मोठ्या विहिरीत सोडले जाते. पाणी साठल्यानंतर तीन विहिरींत साठवले जाते. परिसरातील डाळिंब बागेत बागा छाटणी, खांदण्यासाठी जाण्याबरोबर आबासाहेबांचे आपल्या शेतीत धडे घेणे सुरू होतेच. डाळिंब बागेत व्यवस्थापन सुधारताना व नवी बाग घेताना भगवा वाणाची निवड केली. हळूहळू क्षेत्र वाढवले. शेतीत जिद्द, उद्दिष्ट आणि अभ्यास या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच विजय मरगळे, आणि अक्षय सागर यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. सन २०१७ पासून डाळिंबाची निर्यातही सुरू केल्याचे आबासाहेब सांगतात. यंदाच्या पावसात १२०० झाडांपैकी २०० झाडे खराब झाली. उर्वरित झाडे वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असून खर्चही वाढला आहे. पण संघर्ष कायमच सुरू असून काळ्या मातीतून सोने पिकवण्याची जिद्द सोडलेली नसल्याचे ते सांगतात. डाळिंब बाग व्यवस्थापनाविषयी एकरी सुमारे तीनशे झाडे आहेत. दरवर्षी मृग म्हणजे जून ते ऑगस्ट या तीन टप्प्यांत बहर धरला जातो. त्याची फळे जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान बाजारात येतात. एप्रिल ते मे या कालावधीत छाटणी केली जाते. एक ते दीड महिने बाग ताणावर सोडली जाते. दरवर्षी प्रति झाडाला २५ किलो शेणखताचा वापर होतो. गरजेनुसार बाहेरून त्याची खरेदी केली जाते. ठिबकद्वारे पाणी देताना प्रत्येक झाडाला आठ लिटरचे दोन ड्रीपर अशा पद्धतीने सोय केली आहे. ताशी सरासरी १६ लिटर पाणी दिले जाते. उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊ नये यासाठी पाल्याचे आच्छादन केले जाते. गांडूळ खताचा वापर होतोच. मात्र लेंडी पावडर खरेदी करून शेणखतासोबत तेही प्रति झाड पाच किलो याप्रमाणात देण्यात येते. या पावडरीत ट्रायकोडर्मा, कोकोपीट देखील असल्याचे आबासाहेब सांगतात. उत्पादन, दर व बाजारपेठ दरवर्षी एकरी सरासरी ८ ते १० टन उत्पादन मिळते. प्रति झाड २०, २५ ते ३० किलोपर्यंत माल घेण्यात येतो. एकरी उत्पादन खर्च सुमारे अडीच ते तीन लाख रुपये होतो. डाळिंबाचे वजन २०० ग्रॅमपासून ते ६००, ७०० ग्रॅमपर्यंत मिळते. खासगी निर्यातदार वा व्यावसायिकांना माल देण्यात येतो. त्यास किलोला ८० रुपयांपासून ते १०० रुपये व निर्यातक्षम मालाला १५० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत निर्यातीसाठी २०१८-१९ मध्ये १५ टन, २०१९-२० मध्ये २० टन व २०२०-२१ मध्ये २५ टन माल दिला आहे. एकूण उत्पादनाच्या ७० टक्के निर्यात होते. बांधावरच मालाची प्रतवारी होते. त्यानुसार दर मिळतो. आबासाहेब सांगतात, की गेल्या दोन-तीन वर्षांपासून अति पावसामुळे डाळिंबाचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत असून, देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. दर्जेदार डाळिंबाला सरासरी ९० ते १०० रुपये दर मिळाला. यंदा अन्य देशांना निर्यात करता आली नाही. परंतु देशांतर्गत बाजारात १२५ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. अन्य पिकांची जोड वीस एकर शेतीपैकी डाळिंब व्यतिरिक्त उर्वरित पाच एकरांत कलिंगड, खरबूज व टोमॅटो ही पिके घेण्यात येतात. कलिंगडाचे एकरी २० ते २५ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. डाळिंबाच्या नव्या बागेतही कलिंगडाचे आंतरपीक घेतले आहे. प्रतिक्रिया कोरोना संकटाच्या काळात डाळिंब बागेला आर्थिक फटका बसला. पण हिंमत हारलेलो नाही. संकटातही संधी शोधण्याचा प्रयत्न असतो. एकेकाळी दुसऱ्यांकडे मजुरीला जायचो. पण आता स्वतःच्याच शेतात सहा ते सात मजुरांना रोजगार उपलब्ध केला आहे याचे समाधान आहे. आबासाहेब मासाळ ९०२२३४२१८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.