आंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर कुटुंबाने अनेक वर्षांपासून डांगी जनावरांचे संवर्धन करण्याचे व्रत पाळले आहे. सध्याच्या खर्चिक शेतीतही त्यांच्याकडे सुमारे ८० गायी पाहण्यास मिळतात. चाऱ्यासाठी काही महिने कोकणात घेऊन जाण्याचे कष्टही कुटुंबाला सोसावे लागतात. याच जनावरांवर त्यांचे अर्थकारण अवलंबून राहिले आहे. . नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाले आहे. येथील डोंगरदऱ्यांमधून वसलेल्या भागातील शेतकरी भात व अन्य पिकांची पर्यावरणाला अनुकूल शेती करतो. तालुक्यातील आंबेवाडी हे देखील निसर्गाच्या कुशीत असलेले गाव आहे. येथील एकनाथ महादू बिन्नर यांचे नाव डांगी या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनासाठी परिचित आहे. बिन्नर कुटुंबाने वाडवडिलांपासून संवर्धनाचा हा वारसा जपला आहे. या कुटुंबाची सुमारे अडीच एकर शेती आहे. चार भावांच्या कुटुंबाची गुजराण त्यावर चालते. संवर्धनाचे व्रत जपले डांगी पशुधन हे अकोले भागातील आदिवासी भागाचे वैभव असून आपल्या दारातील ती लक्ष्मी असल्याची श्रध्दा इथले शेतकरी बाळगतात. या जनावरांची संख्या सध्या कमी होत चालली असून शेतकऱ्यांनाही त्यांना सांभाळणे दुरापास्त होत चालले आहे. अशा वेळी त्यांच्या संवर्धनासाठी बिन्नर कुटुंबाने उपसलेले कष्ट उल्लेखनीय आहेत. गोऱ्हे, कालवडी, गायी अशी सारी मिळून सुमारे ८० पर्यंत संख्या आहे. त्यांना चरण्यासाठी दररोज आंबेवाडी ते अलंग, कुलांग, मलंग गड परिसर असा त्यांचा पायी प्रवास होतो. एका विशिष्ट हाकेत ही जनावरे एका ठिकाणी विश्रांती करतात. त्यानंतर ‘हुईके’ असा आवाज व शीळ घातल्यावर ती पुन्हा वाट धरतात. दहा सदस्यांचे कुटुंब या जनावरांच्या माध्यमातून चालते. दररोज शेण काढणे ,दूध काढणे, घरापुरते बाजूला ठेऊन उर्वरित विक्री करणे हा नित्यक्रम अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. जनावरांना एखादा आजार उद्भवला तर परिसरातील झाडपाल्याचा उपचार देखील एकनाथ यांना ठाऊक आहे. वडील लहानू मागील वर्षी वारले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. कोकणातील कष्टप्रद प्रवास पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मार्चच्या सुमारास एकनाथ पत्नी आशाबाई यांच्यासह आपली जनावरे कोकणात म्हणजे जव्हार, मोखाडा भागात घेऊन निघतात. या प्रवासात मजल दरमजल करीत दररोजचा प्रवास सुमारे १० ते १५ किलोमीटर वा त्याहून अधिकचा असतो. वाटेत एकेक शेतकरी शोधायचे, त्यांच्या शेतात आपली जनावरे बसवायची असा शिरस्ता असतो. त्या बदल्यात बिन्नर दांपत्याला जेवण, चहा-पाणी, जनावरांसाठी चारा अशी सुविधा मिळते. रात्री निवारा करून राहताना अचानक जंगली जनावर आसपास आल्याची चाहूल लागली तर गाय कान फडफड करून हंबरते. अशावेळी एकनाथ सावध होतात. संरक्षणासाठी आवाज करतात. कुत्रे सोबत ठेवतात. दसऱ्याच्या कालावधीत आपली जनावरे घेऊन हे दांपत्य गावी याच पद्धतीने परतते. आई चांगुणा, मुले साहिल व स्वराज देखील वडिलांना शक्य ती मदत करतात. डांगीवरच अर्थकारण एकनाथ सांगतात की डांगी गाय दररोज दोन ते पाच लिटरपर्यंतच दूध देते. आम्ही दूधविक्री करण्यापेक्षा खवा तयार करण्यावर भर देतो. किलोला ६० ते ७० रुपये दराने त्याची विक्री करतो. डांगी बैल हे शेतीसाठी अत्यंत उपयोगी असतात. मात्र ते तयार होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यांची तसेच शेणाचीही विक्री होते. सर्व मिळून वर्षाला ५० हजार रुपयांचं उत्पन्न हाती पडते. अलीकडील काळात शेतीतील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज आमच्याकडे ८० पर्यंत गायी असून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना सांभाळणे आर्थिक दृष्ट्या कष्टाचं होत आहे. डांगी गायीची वैशिष्ट्ये
डांगी जनावरांचे स्थानिक अभ्यासक विजय सांबेरे म्हणतात की म्हणाले सह्याद्री खोऱ्यातील अति पावसाच्या व दुर्गम परिसरात टिकाव धरणारे पशुधन म्हणून डांगी जनावराची ख्याती आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा डांगीचे मुख्य केंद्र आहे. या पशुधनाचे संवर्धन करण्याचे काम लोकपंचायत संस्थेने हाती घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून चाळीसगाव डांगाणात 'डांगी गोवंश संवर्धक व पैदासकार संघ' स्थापन केला आहे. संपर्क- एकनाथ बिन्नर-९३०७७१३९९२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.