
अमेरिकन लष्करी अळीने मका पिकात संपूर्ण राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. अळीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने तातडीची पाऊले उचलली. महाविद्यालयातील कीटकशास्त्र विषयातील प्राध्यापकांनी आपल्या सुमारे १३२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या मदतीने तीन तालुक्यातील २० गावांत ‘आयपीएम स्कूल’ नावाने एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन प्रकल्प राबवला. त्यातून सहाशे ते आठशे शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व प्रबोधन झालेच. शिवाय त्यांच्या शेतात प्रात्यक्षिके राबवून पुढील कीड नियंत्रणाचा मार्गही सुकर करण्यात आला. अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या अळीने राज्यातील मुख्य मका व सोबत ऊस, ज्वारी, बाजरी आदी पिकांतही आक्रमण केले आहे. या अळीने मका उत्पादकांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. नाशिक जिल्हाही त्यास अपवाद नाही. अनेक शेतकऱ्यांना अळीच्या गंभीर प्रादुर्भावामुळे मक्याचे प्लॉटच काढून टाकणे भाग पडले. नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने ही गंभीर स्थिती लक्षात घेतली. केवळ मार्गदर्शन करण्यापुरते न राहाता शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवून या अळीचे आक्रमण थोपवण्यासाठी पावले उचलली. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम- नाशिक जिल्हा- मका पीक दृष्टिक्षेपात -
जिल्ह्यातील तीन तालुके व त्यातील २० गावे कार्यक्रमासाठी निश्चित केली. ती अशी.
असा राबवला प्रकल्प- पहिला टप्पा- पूर्वनियोजन, विद्यार्थी प्रशिक्षण महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ व सहायक प्राध्यापक तुषार उगले यांनी संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व रूपरेषा तयार केली. मागील वर्षीही लष्करी अळीचा प्रादुर्भाव होताच. त्याचा सारा अभ्यास करून यंदाच्या खरिपातही प्रादुर्भाव होणार ही शक्यता गृहीत धरली. त्यानुसार मे महिन्यातच पूर्वनियोजन सुरू केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची युवा ऊर्जा वापरण्यास मोठी संधी होती. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) विद्यार्थ्यांना गावे व शेतकरी वाटप करण्याचे ठरले. अळीचे नियंत्रण करण्यासंबंधीचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांनाही देण्यात आले. यामध्ये प्रा. उगले यांच्यासह कीटकशास्त्र विभागातील अशॊक मोची, कांचन शेटे यांनी मार्गदर्शन केले. लष्करी अळीचा प्रसार, तिचा जीवनक्रम, विविध अवस्थांची ओळख, नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना आदी माहिती देण्यात आली. खासगी कंपनीच्या प्रतिनिधींची मदत घेऊन त्यांचेही लेक्चर आयोजित केले. कार्यक्रमाला ‘आयपीएम स्कूल’ (एकात्मिक कीड व्यवस्थापन) असे नाव देण्यात आले. दुसरा टप्पा – साहित्य उपलब्धता माहितीपत्रके शेतकऱ्यांना तांत्रिक माहितीपत्रके देण्याची गरज होती. मात्र, त्यासाठी बराच खर्च लागणार होता. नाशिक येथील अनंतवर्षा फाउंडेशनचे अनंत व सौ. वर्षा या बनसोडे दांपत्याने भित्तीपत्रके, घडीपत्रिका आदी स्वरूपाच्या साहित्यासाठी खर्च उचलला. अळीच्या सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे व त्यासाठी ल्यूर्सची गरज होती. नाशिक येथील उद्योजक महेश सोनकुळ यांनी ही या बाबी मोफत पुरवण्याची जबाबदारी उचलली. तिसरा टप्पा- प्रकल्पाचे कामकाज १) यंदा नाशिक भागात पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून मका लागवड सुरु झाली. द्राक्षपट्ट्यातील मका उत्पादकांसाठी बैठका व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यासाठी महाविद्यालयाच्या कृषी विस्तार विभागाच्या प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. नेहल भोकनळ, प्रा. विक्रम कोरडे यांचे सहकार्य लाभले. २) वीस गावे कार्यक्रमात निश्चित केली होती. प्रत्येक गावात पाच असे वीस गावांमध्ये शंभर सापळे लावण्यात येणार होते. त्यासाठी गावातील प्रत्येक समूहातील एक विद्यार्थी गटप्रमुख म्हणून नेमला. कामाच्या जबाबदाऱ्या व कार्यपद्धती समजावून त्यांना समजून देण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सापळे उभारण्यास व शेतकऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. ३)गावनिहाय व सापळानिहाय अळी प्रादुर्भावाची शास्त्रीय निरीक्षणे घेण्यात येऊ लागली. दर चार दिवसांनी सापळ्यात अडकलेल्या पतंगांची संख्या मोजण्यात येऊ लागली. त्यांच्या नोंदी ठेवण्यात आल्या. काही ठिकाणी सापळ्यात सहा, सात काही ठिकाणी १० तर काही ठिकाणी १५ ते ३० पर्यंतही पतंग अडकल्याचे आढळले. ४) प्रत्येक सापळा कोणत्या क्षेत्रात लावला आहे त्याची निश्चिती होण्यासाठी ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यासाठी विशिष्ट ॲपचा वापर करण्यात आला. प्रत्येक भागातील सापळ्यात सापडलेले पतंग, त्या वेळची हवामान स्थिती हा अभ्यासही करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील संशोधन संस्था हवामान केंद्रांकडील तपशीलाचा आधार घेण्यात येणार आहे. वापरण्यात आलेले घटक
विद्यार्थ्यांचा राहिला मुख्य सहभाग
सोशल मीडियाचा प्रभावी वापर : कार्यक्रमांतर्गत गावांतील कामाचा दैनंदिन अहवाल, नोंदी व अन्य माहिती यांचे आदानप्रदान होण्यासाठी ‘IPM School for FAW’ (लष्करी अळीसाठी आयपीएम स्कूल) नावाने व्हॉटस ॲप ग्रुप तयार करण्यात आला. यामध्ये प्रत्येक गावातील समूहाचा गटप्रमुख, तज्ज्ञ व महाविद्यालयातील प्राध्यापक समाविष्ट आहेत. त्यामुळे दैनंदिन संवाद सुलभ झाला. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही तत्काळ होण्यास मदत झाली. कार्यक्रमातील निरीक्षणे
कार्यक्रमाचे फलित
प्रतिक्रिया मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अक्षरशः बेजार झाले होते. यावर कामगंध सापळ्यांचा वापर व फायदे समजले. सापळ्यांचा वापरामुळे नेमके कोणते कीटक त्याकडे आकर्षित होतात याचा अभ्यास करता आला. सापळ्यामुळे अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे शक्य झाले. - संजय आवारे, मका उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड संपर्क- ९९२२८५२८१९ लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर व जैविक फवारण्या किती उपयुक्त आहेत त्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यनी केले. त्यातून कमी खर्चात वापरात येणारे तंत्रज्ञान माहित झाले. -पंडितराव चौरे, मका उत्पादक , धोंडगव्हाण, ता. चांदवड संपर्क-तुषार उगले- ९४२०२३३४६६ (सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, के. के. कृषी महाविद्यालय, नाशिक) साडेसातशे एकरांत साडेसात हजार गंध सापळे उत्कृष्ट कापूस सुधार प्रकल्पांतर्गत कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण प्रभावी करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या अनुषंगाने एकाच गावात साडेसातशे एकर कपाशी क्षेत्रावर कामगंध सापळे उभारून पतंगांना मोठ्या प्रमाणात अडकवण्याचा (‘मास ट्रॅपींग’) प्रयोग झाला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. सुरवातीला सापळ्यात तीन- चार संख्येने अडकणाऱ्या पतंगांची संख्या आता महिन्याला दहा-बाराच्या पुढे गेली आहे. कायमस्वरूपी नियंत्रणाकडे गुलाबी बोंड अळीचं दरवर्षी येणारं संकट पाहाता जालना- खरपूडी कृषी विज्ञान केंद्राने सजगता बाळगली. गेल्यावर्षी वखारी येथे चार ते पाच एकरांत लावलेल्या सापळ्यांपैकी काही सापळे उन्हाळ्यात पीक नसतांनाही कायम ठेवले. शिवाय बदनापूरच्या जिनिंग मिलमध्येही त्यांची उभारणी केली. वखारी येथील शेतातील सापळ्यातं उन्हाळ्यात गुलाबी बोंड अळीचा एकही पतंग आढळून आला नाही. परंतु, साधारणत: २८ जूनच्या सुमारास पाऊस झाल्यानंतर १२ जुलैपासूनच सापळ्यांमध्ये पतंग अडकायला सुरवात झाली. हा धोका ओळखून मग वखारी येथेच साठ एकरांत व वानडगाव येथेही एकाच वेळी 'मास ट्रॅपींग' चा प्रयोग राबविला. त्यानुसार १८ जुलैला गावशिवारा एकूण साडेसातशे एकरांवर प्रति एकरी दहा या प्रमाणात एकाच वेळी साडेसातहजार गंध सापळे लावण्यात आले. सुरवातीला त्यात तीन ते चार संख्येने पतंग अडकायचे. परंतु, पुढे ही संख्या दहा-बारांवर पोचली. आता गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाबाबत जागरूक झालेले वानडगावचे शेतकरी सापळे, त्यामधील ल्यूर्स व शिवारात होणाऱ्या किडींच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून आहेत. गरजेनुसार ल्यूर बदलण्याचे कामही ते करताहेत. या प्रयोगातील ठळक बाबी
संपर्क- अजय मिटकरी विषय विशेषज्ज्ञ, कीटकशास्त्र, केव्हीके, खरपूडी, जि. जालना. संपर्क- ७३५००१३१४७ चार एकरांत गंध सापळे लावले. त्यातून बोंड अळीच्या आक्रमणावर मोठं नियंत्रण आलं. कपाशी सध्या पाते अन् बोंड अवस्थेत आहे. आतापर्यंत केवळ दोनच फवारण्या केल्या आहेत. -अंकुश नागवे-९५५२०५९९६४ वानडगाव, जि. जालना. लष्करी अळीचे नियंत्रण मराठवाड्यात मका पिकाखाली अडीच लाख हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यात व त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात आहे. दोन्ही जिल्हे मका पिकाचे आगर मानले जातात. या भागातही अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले आहे. खरपूडी कृषी विज्ञान केंद्रातर्फे या अळीलाही रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्या घनसावंगी तालुक्यांतर्गत दैठणा बु. येथील गोरख धांडे या युवा शेतकऱ्याने त्यासंबंधी केलेले नियोजन असे. गोरख यांची १५ एकर शेती आहे. सहा एकर कपाशी व चार एकर सोयाबीन आहे. यंदा पहिल्यांदाच खरिपात एक एकर मक्याची जोड दिली. पंधरवड्यातच लष्करी अळीने आक्रमण केल्याचे त्यांना कळले. केव्हीकेचे अजय मिटकरी यांनी किडीची ओळख, जीवनक्रम, नुकसान व नियंत्रणासाठी करावयाच्या उपायांची माहिती गोरख यांना दिली. केवळ माहिती देण्यापुरते मर्यादीत न राहता एकरात दोन कामगंध सापळे अळीसाठीच्या ल्युरसह दिले. थायामेथोक्झाम व लॅंबडा साहहॅलोथ्रीन या संयुक्त कीटकनाशकाचे ५ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणीचा सल्ला दिला. पुन्हा पंधरा दिवसांनी तीच फवारणी घेतली. सध्या अळीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आहे. त्यातून मक्याचं उत्पादन चांगलं मिळेल अशी गोरख यांना आशा आहे. संपर्गोक- गोरख धांडे- ९६७३१६७५०५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.