रेशीम शेतीने दिली आर्थिक साथ

पळासखेडा (ता.जामनेर, जि.जळगाव) येथील राहुल पाटील आणि संदीप पाटील या मित्रांनी एकमेकांच्या साथीने पारंपरिक पिकांना रेशीम शेतीची जोड दिली आहे. कमी खर्चात त्यांनी रेशीम कोष उत्पादनासाठी शेड तयार केली.
silkworms and Quality silk cocoons production
silkworms and Quality silk cocoons production
Published on
Updated on

पळासखेडा (ता.जामनेर, जि.जळगाव) येथील राहुल पाटील आणि संदीप पाटील या मित्रांनी एकमेकांच्या साथीने पारंपरिक पिकांना रेशीम शेतीची जोड दिली आहे. कमी खर्चात त्यांनी रेशीम कोष उत्पादनासाठी शेड तयार केली. गेल्या दोन वर्षांपासून दर्जेदार कोष उत्पादन घेत दोघा मित्रांनी रेशीम शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे. पळासखेडा (ता.जामनेर,जि.जळगाव) गावशिवार केळी, कापूस आणि भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. वाघूर धरणाच्या पाण्यामुळे परिसरातील शेतीला सिंचनासाठी व्यवस्था होऊ शकली आहे. अनेक शेतकऱ्यांनी वाघूर धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून जलवाहिनीद्वारे पाणी आणले आहे. गावानजीक कांग नदीदेखील आहे. काळी कसदार, मध्यम स्वरूपाची जमीन या भागात आहे. या गावशिवारात राहुल विश्‍वनाथ पाटील यांची दहा एकर शेती आहे. तर संदीप प्रभाकर पाटील यांची तीन एकर शेती आहे. राहुल हे पूर्णवेळ शेती करतात, तर संदीप हे जळगाव येथील विमानतळात नोकरी करतात. दोघांच्या शेतीमध्ये कापूस प्रमुख पीक आहे. यासोबत मका तसेच हंगामी पिकांची लागवड केली जाते.  रेशीम शेतीला सुरुवात  पारंपरिक पिकांमध्ये अपेक्षित आर्थिक नफा मिळत नसल्याने शेतीला मजबूत वित्तीय स्रोत उभा कसा होईल, या विचारात राहुल आणि संदीप पाटील होते. या दरम्यान जामनेरमधील नातेवाईक देवेंद्र पाटील यांच्याकडून त्यांना रेशीम शेतीची माहिती मिळाली. याचबरोबरीने या दोघा मित्रांनी तुती लागवड, रेशीम कीटक संगोपन, दर्जेदार कोष निर्मिती आणि विक्रीबाबत विविध ठिकाणाहून सविस्तर माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष रेशीम शेती करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत रेशीम उत्पादकांशी सविस्तर चर्चा केली. या अभ्यासातून दोन वर्षांपूर्वी दोघा मित्रांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला.

  • रेशीम कीटक संगोपनासाठी राहुल पाटील यांच्या शेतामध्ये शेड उभी केली. शेड उभारणी खर्चात बचत करण्यासाठी बांबू, मजबूत लाकडी पट्ट्यांचा योग्य पद्धतीने वापर केला. शेतामध्ये ७० फूट बाय २२ फूट आकाराचे शेड उभारले. या शेडसाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला. या शेडमध्ये दहा रॅक आहेत. 
  • दोघा मित्रांनी आपापल्या शेतामध्ये प्रत्येकी दीड एकर अशी तीन एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केली. यासाठी आवश्‍यक बेणे तुरखेडा (ता.जळगाव) येथील वीरेंद्र पाटील यांनी मोफत उपलब्ध करून दिले. तुतीचे पीक चांगले टिकत असल्याने त्याची नव्याने दरवर्षी लागवडीची गरज नाही. कापणीनंतर त्यास फुटवे फुटतात. त्याचा ताजा पाला रेशीम कीटकांना दिला जातो.
  • तुती लागवडीला हिवाळा आणि उन्हाळ्यात वाढीच्या टप्यानुसार पाणी दिले जाते. यासाठी ठिबकची व्यवस्था केली  आहे. आठवड्यातून  पिकाच्या गरजेनुसार तीन ते चार वेळा तुतीला पाणी दिले जाते. 
  • तुती पिकाला कीडनाशक फवारणी, रासायनिक खतांची फारशी गरज नाही. तुती लागवडीच्या वेळेस कंपोष्ट खत दिले होते. तसेच अधूनमधून तुती लागवडीला शेणस्लरी दिली जाते. त्यामुळे चांगली वाढ होते.
  • दर महिन्याला जळगावमधील रेशीम कार्यालयातर्फे अंडीपुंज मिळतात. दर महिन्याला २०० अंडीपुंज आणले जातात. यासाठी १४०० रुपये खर्च येतो. अळ्यांची योग्य वाढ होताच त्यांना रॅकवर सोडले जाते. या अळ्यांना रोज दोनदा ताजा तुती पाला दिला जातो. 
  • मिळाला विक्रमी दर  पाटील यांनी दर्जेदार रेशीम कोष उत्पादनावर भर दिला आहे.  रेशीम कोषांना जालना बाजार समितीत गेल्या वर्षी विक्रमी म्हणजेच प्रति क्विंटलला ५० हजार रुपये दर मिळाला होता.गेल्या तीन वर्षात कुठल्याही रेशीम कोष उत्पादकाला एवढे दर या बाजार समितीत मिळाले नव्हते. वर्षभरात आठ बॅच होतात. दर महिन्याला पाटील यांना रेशीम कोष विक्रीतून  खर्च वजा जाता चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. या उद्योगामुळे आर्थिक स्रोत मजबूत झाले. शेतीकडेही लक्ष देता येते. कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. या व्यवसायासाठी बँका किंवा इतरांकडे कर्जासाठी जाण्याची गरज नसल्याचे राहुल पाटील सांगतात. दर्जेदार कोष उत्पादनावर भर 

  • दर महिन्याला १६० किलो रेशीम कोष उत्पादन मिळते.
  • जालना येथील बाजार समितीत रेशीम कोषांची विक्री केली जाते. जालना पळासखेडापासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर आहे. पळासखेडा व परिसरातील इतर रेशीम उत्पादक एकत्रितपणे जालना येथे कोष विक्रीसाठी घेऊन जातात. यामुळे प्रत्येकाची वाहतूक भाड्यामध्ये बचत होते. दर महिन्याला पाटील यांना ४०० रुपये वाहतूक भाडे लागते. बाजारात लिलाव आटोपून एका दिवसात परतणे शक्य होते. सध्या लॉकडाऊनच्या काळात रेशीम कोष  
  • विक्रीमध्ये अडचणी आल्या होत्या. त्यावर मात करून सध्या कोष विक्री सुरळीत सुरू झाली आहे.
  • कुटुंबीयांची चांगली मदत रेशीम शेती आणि कीटक संगोपनगृहाच्या व्यवस्थापनासाठी पाटील हे सालगडी किंवा मजुरांची मदत घेत नाहीत. राहुल यांची पत्नी सौ.सोनाली आणि संदीप यांची पत्नी सौ. प्राजक्ता यांच्याकडे रेशीम कीटक संगोपनगृहाची जबाबदारी आहे. तुती लागवडीचे व्यवस्थापन तसेच दैनंदिन कीटक संगोपनाची जबाबदारी त्या चांगल्या प्रकारे पाहतात. कोष विक्रीचे नियोजन राहुल आणि संदीप पाहतात. तुती आणि रेशीम कीटक संगोपनाबाबत  चौघांची दररोज चर्चा होते. यामुळे या उद्योगात यश मिळविणे शक्य झाले आहे. येत्या काळात रेशीम शेती वाढविण्याचे नियोजन पाटील कुटुंबीयांनी केले आहे. संपर्क- संदीप पाटील, ८००७६७३७५७, राहुल पाटील, ९६०४८३७७७३

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com