ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनांची मागणी लक्षात घेत सातारा जिल्ह्यातील रेवडी येथील हणमंत व कांचन या कुचेकर दांपत्याने आपल्या शेतातील कढीपत्त्यावर प्रक्रिया करीत पावडर तयार केली. याला जोड म्हणून रेडी टू इट व रेडी टू कूक या संकल्पनेतून मोड आलेली कडधान्ये तसेच पालक, पुदीना, चाकवत आदी भाजीपाला पावडर तसेच विविध प्रकारच्या चटण्या तयार केल्या आहेत. सात्विक ग्रीन गोल्ड या ब्रॅडने या उत्पादनांना बाजारपेठ देण्यात हे दांपत्य यशस्वी झाले आहे. सातारा जिल्ह्यातील रेवडी (ता. कोरेगाव) येथील हणमंत कुचेकर हे एसटी महामंडळ खात्यातून नुकतेच सेवानिवृत्त झाले. नोकरीत असताना देखील ते वेळ काढून शेती करायचे. त्यांच्या बरोबरीने पत्नी कांचन शेतीची सर्व जबाबदारी पार पाडतात. कुचेकर कुटुंबियांना वडिलोपार्जित साडेचार एकर जमीन आहे. दुष्काळी भाग असल्याने पारंपरिक शेती केली जात होती. कालव्याचे पाणी उपलब्ध होऊ लागल्यावर त्यांनी बागायत शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र पारंपरिक पिके न घेता वेगळी पिके घेण्याचा निर्णय घेतला. कढीपत्त्याचा प्रयोग
यादरम्यान मित्राच्या शेतीला भेट दिली असताना कडीपत्ता शेतीबद्दल माहिती मिळाली. त्याची लागवड व उत्पादन याविषयी माहिती घेऊन ५० गुंठे क्षेत्रात लागवड केली. यावर रासायनिक पध्दतीपेक्षा जीवामृत व शेणखताचा वापर करण्यावर भर दिला. प्रत्येक तीन महिन्याला कढीपत्त्याची कापणी करण्यास सुरूवात केली. सुरवातीच्या काळात मुंबई येथील बाजारपेठेत कढीपत्ता पाठवला. बाजारपेठांची फारशी माहिती नसल्याने मुंबई येथील व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाली. तरीही न खचता हा प्रयोग सुरूच ठेवला. यानंतर जेजुरी येथील कंपनीत कढीपत्ता पाठवला जात होता. यातून चांगले अर्थाजन होत होते. पुढील काळात दर कमी मिळू लागल्याने यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. दरांचा बेभरवसा पाहाता प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पणनतज्ज्ञ सायली महाडिक यांनी त्यांना त्याविषयी मार्गदर्शन केले. 'आत्मा' विभागाच्या अनुदानातून ड्रायरची खरेदी केली. पत्नी कांचन यांनी सर्व जबाबदारी घेऊन काम सुरू केले. सोबतीला जाऊ उषा, नणंद संजीवनी या कुटूंबातील सदस्यांना मदतीला घेतले. प्रक्रियेत कढीपत्त्याची कापणी करून तो स्वच्छ धुतला जातो. त्यानंतर यांत्रिक पध्दतीने त्याची पावडर तयार केली जाते. सात्त्विक ग्रीन गोल्ड नावाने ब्रँडिंग करून पॅकिंग करण्यात येते. मागील चार वर्षांपासून पावडरची निर्मिती सुरू आहे. कढीपत्ता चटणीचीही निर्मिती केली जात आहे. त्याची पावडर आरोग्यकारक असल्याने लंडनच्या बाजारात मागणी असल्याचे कुचकेर सांगतात. निर्यातदारामार्फत त्याची निर्यातही केली आहे. आता पालक, पुदीना, कोथिंबीर, चाकवत या भाज्यांची पावडरही केली जाते. कढीपत्त्याची शेती सेंद्रिय पद्धतीने केली जात असल्याने पावडर ही सेंद्रिय तयार होत आहे. सध्या वर्षाकाठी अडीच टनांपर्यत एकूण पावडर निर्मिती केली जाते. यामध्ये सर्वाधिक कढीपत्त्याची सव्वा टन पावडर तयार केली जाते. सध्या प्रगती फूड नावाने युनिट सुरू आहे. प्रकिया व्यवसायातील ठळक बाबी
युनिटमध्ये सध्या तीन सोलर ड्रायर, व्हेजिटेबल कटर, सेन्ट्रीफ्युगल यंत्र, पल्व्हराजयर, पापड तयार करायचे यंत्र आदींचा वापर केला जातो. लेबलसह दर्जेदार पॅकिंग करून बाजारात विक्री केली जाते. कढीपत्ता, पुदीना, चाकवत, शेवगा यांची पावडर तर तीळ, जवस, मटकी, हरभरा, चवळी, सोयाबीन, मूग आदी मोड आणलेली व वाळवलेली कडधान्ये उत्पादित केली जातात. पन्नास, शंभर ग्रॅम पासून ५०० ग्रॅम पर्यंतची पॅकिंग्ज आहेत. या व्यवसायातून वार्षिक १२ ते १३ लाख रूपयांची उलाढाल होते. २५ ते ३० टक्के नफा शिल्लक रहातो. व्यवसायासाठी लागणारी सर्व प्रमाणपत्रे तसेच प्रयोगशाळांमध्ये तपासण्या करून घेण्यात आल्या आहेत. यामध्ये एफएसएसएआय नोंदणी, स्मॅाल स्केल इंडस्ट्री, पीजीएस सेंद्रीय शेती प्रमाणपत्र आदीचा समावेश आहे. लंडन तसेच अन्य बाजारपेठांत सात्त्विक उत्पादनांची माहिती व्हावी या दृष्टीने इंटरनेटवर संकेतस्थळ निर्माण केले आहे. निर्यातदाराच्या माध्यमातून पावडर लंडनला दोन वेळा पाठवली आहे. तसेच मुंबई, पुणे व सातारा जिल्ह्यात तसे अन्य ठिकाणी होणारी विविध प्रदर्शने केंद्रस्थानी ठेऊन ग्राहकांत वाढ केली आहे. स्थानिक बाजारपेठांतही चांगली मागणी असल्याचे कुचेकर सांगतात. रेडी टू कूक संकल्पना सध्या धकाधकीच्या जीवनात कमी वेळेत जेवण तयार करण्यासाठी रेडी टू इट वा रेडी टू कूक ही संकल्पना आली आहे. या संकल्पनेवर कुचेकर दांपत्याने पूर्वीच काम सुरू केले. या पदार्थांपासून काही मिनिटांत भाजी तयार होते. मार्गदर्शन व मदत
प्रक्रिया उद्योगात पत्नीचा मोठा वाटा असल्याचे कुचेकर सांगतात. उत्पादने तयार करण्यापासून ते पॅकिग, ब्रॅंडिंग, विपणनापर्यंत बहुतांश कामांत तिचा हातभार असल्याचे ते सांगतात. कढीपत्ता शेतीस तसेच सध्या सुरू असलेल्या प्रक्रिया उद्योग ॲग्रोवनची मोलाची मदत झाली आहे. सन २०१० पासून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे विशेषांक तसेच महत्त्वाच्या लेखांचे कात्रण करून त्यांनी स्वतंत्र फाईल तयार केली आहे. व्यवसायात तत्कालीन आत्मा संचालक गणेश घोरपडे, पणन तज्ञ सायली महाडीक, उपसंचालक विजय राऊत, कृषी विज्ञान केंद्राचे भूषण यादगीरवार यांचे मार्गदर्शन व मदत झाली. भविष्यात कांदा व लसूण पावडर करण्याचा विचार आहे. संपर्क- हणमंत कुचेकर- ९४२२०३३३५७