मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय शेती, शुगरबीट, रेशीमशेती, दुग्ध व्यवसाय तसेच शेती व्यवस्थापनातील आदर्श बाबींचे पालन करून संघटित शेतीचा आदर्श तयार केला आहे. बदलत्या शेतीचा वेध घेत सातत्याने नवे काही करण्याचा ध्यास या शेतकऱ्यांनी बाळगला आहे. ज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करीत त्यांची वाटचाल सुरू आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.
बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत एकता गटाची निर्मिती केली आहे. त्याद्वारे पिके आणि पूरक व्यवसायांचे विविध प्रयोग करून त्यांनी शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. गावातीलच प्रगतिशील शेतकरी प्रशांत वामन शेंडे हे गटाचे अध्यक्ष आहेत. गटाची वाटचाल एकता या नावाने गटाची स्थापना जानेवारी २०११ च्या दरम्यान झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गटाचा विस्तार होत त्यातून एकता महिला शेतकरी पशुपालन गट २०१६, सेंद्रिय गट (‘आत्मा’अंतर्गत) तर रेशीम गट स्थापना २०१८ मध्ये झाली. गटात अनेक अभ्यासू व प्रगतिशील शेतकरी असल्याने सुधारीत तंत्र, विचारांची देवाणघेवाण होणे अधिक शक्य झाले. त्यातूनच सोयाबीन, रेशीम व सेंद्रिय शेतीशाळा, मधुमक्षिका पालन, हरभरा बीजोत्पादन प्रकल्प, ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांची लागवड व वापर, जैविक घटकांचा वापर, उसाचे पाचट, पीक अवशेष शेतातच गाडून जमिनीचा पोत सुधारणे आदी उपक्रम राबवण्यास गती आली. बारामती कृषी विज्ञान केंद्राकडून या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते. सेंद्रिय व नव्या पिकांना चालना गटात विविध पिकांमध्ये सेंद्रिय प्रयोग सुरू आहेत. यात हरभरा, गहू, ज्वारी आदींचा समावेश आहे. घरी खाण्यापुरते सकस, आरोग्यदायी धान्य असा सध्या तरी त्यामागील हेतू आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्यामार्फत वार्षिक धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यातूनही या शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळते. यावेळी सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवण्यात गटातील शेतकरी यशस्वी झाल्याचे गटाचे अध्यक्ष शेंडे सांगतात. यंदाच्या वर्षी गटातील एकाने साबूदाणा तर एकाने दोन एकरांत शतावरीची लागवड केली आहे. ती प्रायोगिक तत्त्वावर असून यशस्वी झाल्यास पुढे क्षेत्र वाढवण्याचा विचार राहील. सुमारे १२ शेतकऱ्यांनी शुगरबीट अर्थात शर्कराकंदाचाही प्रयोग मागील वर्षी सुमारे दहा गुंठ्यात प्रायोगिक तत्त्वावरच केला. परिसरातील कारखान्याकडून त्याची खरेदी होत प्रति टन दोनहजार रूपये दर मिळाला. शेंडे निर्यातक्षम भेंडी व बेबीकॉर्नचेही उत्पादन घेतात. दोन ते तीन जणांकडे शेततळ्यांची सुविधा आहे. सोयाबीनमध्ये प्रत्येकी सात फुटांवर तूर घेण्याचाही प्रयोग झाला आहे. पाणी निचऱ्यासाठी मोल नांगराचा वापर रासायनिक खते व पाण्याच्या अनियंत्रित वापराने जमिनी क्षारपड होण्याची समस्या वाढली आहे. त्याचा फटका परिसरातील ऊस उत्पादकांना बसला आहे. यावर उपाय म्हणून केव्हीकेमार्फत मोल नांगराचा वापर करून निचरा प्रणालीचे तंत्र देण्यात आले आहे. सुमारे २५ शेतकऱ्यांनी या नांगराचा वापर केला आहे. ज्या भागात कडवळ घेणेही शक्य होत नव्हते, तेथे या तंत्रवापराचा चांगला फायदा झाला आहे. दुग्ध व्यवसाय व पूरक व्यवसायास चालना गटातील शेतकऱ्यांनी देशी गोसंगोपनावर भर दिला आहे. साहजिकच जीवामृत बनवण्यासाठी देशी गोमूत्र, शेणाचा वापर चांगला होत आहे. गटाचे अध्यक्ष शेंडे म्हणाले की, सुमारे २० महिला शेतकरी दूध उत्पादक आहेत. पाच लाखांच्या अर्थसाह्यातून १० शेतकऱ्यांना गायींचे वाटप झाले आहे. एकता बचत गटाच्या माध्यमातून अनेक शेतकरीदेखील बायोगॅस प्रकल्पासाठी परावृत्त झाले आहेत. सध्या सहा जणांकडे हा प्रकल्प सुरू आहे. सध्या चारा टंचाई सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या अनुषंगाने सात ते आठ शेतकऱ्यांनी मूरघास निर्मितीवर भर दिला. शेंडे यांच्याकडे मूरघासाच्या चार बॅग्ज आहेत. एक बॅग सुमारे पंधरा दिवस पुरते. गटातील तीन ते चारजणांकडे गांडूळखत निर्मितीचे युनीट आहे. रेशीम व्यवसायास सुरवात एकता गटातील काही शेतकरी आता रेशीम व्यवसायाकडे वळले आहेत. सध्या दोन ते तीन बॅचेसपर्यंत त्यांनी उत्पादन घेतले आहे. प्रति बॅच सुमारे ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली आहे. बारामती येथेच प्रति किलो ३०० रुपये ते त्याहून अधिक दर मिळत आहे. गटातील प्रयोगशील शेतकरी एकता गटातील तीन शेतकऱ्यांचा शेतीतील प्रयोगशीलतेसाठी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. यात रामचंद्र निवृत्ती मदने, प्रशांत शेंडे व नानासो फरांदे यांचा समावेश आहे. फरांदे यांनी आले पिकात एकरी १५ टन उल्लेखीन उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीत अवतीभवती होणारे बदल लक्षात घेऊन सतत नवे काहीतरी करण्याचा या मंडळींचा ध्यास असतो. गटाची नियमित बैठक होते. तसेच नियमित बचतदेखील होते. दरवर्षी गटाचे लेखा परीक्षणही करण्यात येते. मदने पूर्वी शेणखतावर प्रक्रिया न करता त्याचा वापर शेतात करायचे. त्यांच्या ऊस शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता. योग्य मार्गदर्शनानंतर त्यांनी शेणखतावर प्रक्रिया सुरू केली. मेटॅऱ्हायझियम ॲनीसोप्ली या मित्रबुरशीचा वापर सुरू केला. आज हुमणीवर नियंत्रण मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. गटातील महादेव गावडे यांनी देखील जून व जुलैमध्ये ऊस पिकाच्या बांधावर रात्रीच्या वेळी लिंबाच्या झाडाखाली प्रकाश सापळ्यांचा वापर चालू केला. झाडावरील हुमणीचे भुंगेरे गोळा केले. त्यांनाही योग्य नियंत्रण मिळाले आहे.
एकता गटाची उद्दिष्टे
- प्रशांत शेंडे, ९४०४६८४७२० (लेखक बारामती कृषी विज्ञान केंद्रात विषय विशेषज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.