सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र द्राक्ष शेतीसाठी ठरले फायद्याचे

पलूस (जि.सांगली) येथील ऋषिकेश चव्हाण यांनी द्राक्ष बागेचे नियोजन ठेवले आहे. द्राक्ष काडी तपासणीसाठी सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) तसेच स्वयंचलित हवामान केंद्राच्या वापरामुळे द्राक्ष बागेचे काटेकोर व्यवस्थापन शक्य झाले आहे.
Use of microscope and laptop for eye examination of grape sticks
Use of microscope and laptop for eye examination of grape sticks

तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते, हे लक्षात घेऊन पलूस (जि.सांगली)  येथील ऋषिकेश चव्हाण यांनी द्राक्ष बागेचे नियोजन ठेवले आहे. द्राक्ष काडी तपासणीसाठी सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) तसेच स्वयंचलित हवामान केंद्राच्या वापरामुळे द्राक्ष बागेचे काटेकोर व्यवस्थापन शक्य झाले आहे. सांगली जिल्ह्यात तासगाव-कराड राज्य मार्गावर असलेल्या पलूस तालुक्यातील प्रयोगशील द्राक्ष बागायतदारांनी वेगळी ओळख तयार केली आहे. काही बागायतदार द्राक्ष निर्यातदेखील करतात. या भागातील प्रयोगशील शेतकरी सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. यापैकीच एक आहेत पलूस (जि.सांगली) येथील मारुती चव्हाण. गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन वाढीसाठी चव्हाण प्रयत्नशील आहेत. याचबरोबरीने त्यांचा मुलगा ऋषिकेश हा देखील बागेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतो. द्राक्ष बागेच्या नियोजनाबाबत ऋषिकेश चव्हाण म्हणाले की, आमची १८ एकर द्राक्ष बागायती आहे. यामध्ये नऊ एकरावर काळ्या रंगाच्या दोन प्रकारच्या जाती आणि नऊ एकरावर हिरव्या रंगाच्या दोन प्रकारच्या जातींची लागवड आहे. वडिलांची गेल्या २६ वर्षांपासून टप्याटप्याने द्राक्ष शेती वाढविली. द्राक्ष शेती करायची म्हटले की, सातत्याने आधुनिक तंत्रज्ञान शिकणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे आम्ही शेतीमध्ये सुरवातीपासून नवीन तंत्रज्ञानावर भर दिला. आमच्याकडे ट्रॅक्टर, फवारणीसाठी ब्लोअर अशी यंत्रे आहेत. माझे वडील दरवर्षी परदेशात जाऊन द्राक्ष मार्केट तसेच नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करतात.  दुबई, अबुधाबी, जॉर्डन, इस्राईल आदी देशांना भेटी देवून त्यांनी तेथील द्राक्ष बाजारपेठ समजून घेतली आहे. मला व्यवसाय करायचा असल्यामुळे  एमबीए तसेच बी. एससी.अ‍ॅग्री (अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) बहिःस्थ शिक्षण घेतले. माझे वडील द्राक्ष शेतीच्या अभ्यासासाठी परदेशात फिरतात. तेथील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा वापर द्राक्ष शेतीच्या नियोजनात केला जातो. दरम्यानच्या काळात वडिलांनी इस्राईलमधील प्रयोगशाळेमध्ये द्राक्ष काडी तपासणीसाठी उपयोगी असलेला आधुनिक सूक्ष्मदर्शक पाहिला. त्याची सविस्तर माहिती घेतली. याचा वापर बागेच्या नियोजनामध्ये करायचे आम्ही ठरविले. द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन आणि एकसारखे मणी हवे असतील तर त्यासाठी काडी,पान, देठ परिक्षण महत्त्वाचे असते. काडी तपासणी केली तर फळ छाटणी कोणत्या डोळ्यावर करायची हे कळते.त्यानुसार विविध प्रकारच्या सूक्ष्मदर्शकांची माहिती इंटरनेटवरून शोधण्यास आम्ही सुरु केली. त्यावेळी इटली देशातील एका कंपनीने तयार केलेला सूक्ष्मदर्शक आम्ही पाहिला. रक्कम ठरवून इटलीमधून हा सूक्ष्मदर्शक  आयात केला आहे. सूक्ष्मदर्शक  वापराचे घेतले प्रशिक्षण  सूक्ष्मदर्शक  वापराबाबत ऋषिकेश चव्हाण म्हणाले की, मला पहिल्यांदा सूक्ष्मदर्शक  कसा वापरायचा याची माहिती नव्हती. द्राक्ष वेलीतील डोळ्यांचे काप कसे घ्यायचे हे जुजबी माहिती होते. सूक्ष्मदर्शक  तंत्रज्ञान वापरासाठी शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेणे आवश्यक होते. इंटरनेटवरून याबाबतची माहिती समजाऊन घेतली. तसेच अनुभवी द्राक्ष बागायतदार, तज्ज्ञांच्याकडून तांत्रिक माहिती घेतली. त्यानुसार द्राक्ष काडीचे परिक्षण सुरु केले. सध्या माझ्या बागेतील द्राक्ष काडी तपासणीबरोबर मित्र परिवारातील द्राक्ष बागेतील काड्यांची तपासणी मी करतो.  यामुळे या बाबतचा अभ्यास पक्का होत आहे. सध्या काडी तपासणी सुरु केली आहे. पुढे माती, पाणी आणि पान, देठ परिक्षणासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणार आहे. यामुळे द्राक्ष शेती अधिक सुलभ करता येईल. अनावश्यक खर्चामध्ये बचत करणे शक्य होणार आहे.  सूक्ष्मदर्शकाची वैशिष्ट्ये 

 • कॅमेरा असल्याने फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करता येते.
 • संबंधित माहिती संग्रहित ठेवता येते.
 • विविध टप्प्यात काडीची तपासणी केलेल्या डोळ्यांची माहिती असल्याने  फळछाटणीसाठी नियोजन करता येते.
 • काडी तपासणीचे फायदे 

 • फळ छाटणीच्या अगोदर आठ ते दहा दिवस काडी तपासणी.
 • घड कोणत्या डोळ्यात आहे, याची माहिती होते. त्याचा आकार समजतो.
 • फळ छाटणी करण्यास सोपे, त्यानुसार सबकेनच्यावरील दोन ते चार डोळ्यांना हायड्रोजन सायनामाईडची पेस्ट लावणे शक्य. द्रावण कमी लागत असल्याने खर्चात बचत.
 • द्राक्ष काडीबरोबर पानावरील रोगांची स्थिती समजण्यास मदत.
 • दर्जेदार घड निर्मितीसाठी फायदेशीर.
 • अशी घेतले जाते काडी 

 • तपासणीसाठी एका एकरातून ५ काड्यांची निवड.
 • ८० टक्के सुर्यप्रकाशातील सरळ चार काड्या याचबरोबरीने सावलीतील एक काडी घेतली जाते
 • एकूण सात डोळ्यांची तपासणी.
 • स्वयंचलित हवामान केंद्राचा वापर कृषी विभागाच्या साह्याने द्राक्ष विभागामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी  झाली आहेत. पाच वर्षापूर्वी  एक केंद्र चव्हाण यांच्या द्राक्ष बागेत उभारण्यात आले. या केंद्रामध्ये हवामानाच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात. या नोंदीवरून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत  पीक व्यवस्थापन सल्ला मोबाईलवर मिळतो. त्यानुसार बागेतील काटेकोर नियोजन केले जाते. वेलीवर मनुका निर्मिती  कोरोना लॉकडाउनमुळे बंद असलेली वाहतूक, द्राक्ष विक्रीमध्ये अडचणी आल्या. यावर मात करण्यासाठी मार्ग काढणे गरजेचे होते. त्यानुसार चव्हाण यांनी अभ्यास केला. तज्ज्ञांच्या सल्याने काळ्या रंगाच्या द्राक्षाचे वेलीवरच मनुका तयार करण्याचा प्रयोग केला. त्यामुळे द्राक्ष विक्रीपेक्षा मनुका निर्मिती केल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान वाचले. थेट व्यापाऱ्याला १२० रुपये किलो या दराने मनुक्यांची विक्री केली. मनुका निर्मितीचा हा प्रयोग नवे आर्थिक उत्पन्न करून देणार ठरला आहे. कमी गुंतवणुकीत दर्जेदार मनुका तयार होत असल्याने नफ्यात वाढ होणार आहे. संपर्क- ऋषिकेश चव्हाण, ८००७४७९००१

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
  Agrowon
  agrowon.esakal.com