
ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी जलकुंडांची निर्मिती वरदान ठरली आहे. या भागात कार्यरत आरोहण स्वयंसेवी संस्थेने ‘फळझाड वाडी तेथे जलकुंड’ ही संकल्पना येथे राबवली. कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले. ऑक्टोबरनंतर पाण्याचा शाश्वत स्रोत तयार होऊन शेतकऱ्यांसाठी बारमाही शेती करणे शक्य झाले आहे. रोजगारासाठीचे स्थलांतरही थांबले आहे. ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार या भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. परंतु जमिनीला असलेला तीव्र उतार, डोंगर-दऱ्या आणि खडकांमुळे पाणी साठवण न होता पाणी वाहून जाते. पावसाळ्याच्या चार महिन्यांनंतरची तीव्र पाणीटंचाई, त्यामुळे होणारी हंगामी शेती, रोजगार उपलब्ध नसणे यामुळे बरीच कुटुंबे ऑक्टोबरनंतर रोजगारासाठी स्थलांतर होतात. पाण्याचे स्रोत उपलब्ध असले तरी शेतापासून जास्त दूर आहेत. पाणी आणणे खर्चिकही आहे. परिणामी वर्षानुवर्षे काही जमिनी पडीकच राहिलेल्या दिसून येतात. फळबाग लागवडीला चालना आदिवासी बहुल भागातील बहुतांश कुटुंबे अल्पभूधारक आहेत. शेतीत नवे तंत्रज्ञान अवलंबण्याची त्यांची क्षमताही कमी आहे. मोखाडा तालुका आर्थिक गरिबी व कुपोषणाच्या अडचणींनी ग्रासला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आदिवासींच्या मदतीला आरोहण संस्था धावली. सन २००६ पासून जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर आदी भागांत संस्था शेती, जलसंधारण व पाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, आदी विषयात कार्य करते आहे. सन २०११ मध्ये संस्थेने बारमाही पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्यांचे गट तयार केले. फळबाग, भाजीपाला, फूलशेती लागवडीला चालना दिली. त्यातून शेती हा बारमाही उपजीविकेचा शाश्वत स्रोत होऊ शकतो हे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले. प्रयोगशील शेतकऱ्यांकडे अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले. जलसंधारणावर भर मोखाडा दुर्गम तालुका असल्याने शेतमाल १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील बाजारपेठेत विक्रीस नेण्यात अनेक अडचणी होत्या. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी गटशेतीचा आधार घेण्यात आला. अर्थात पाणी ही मुख्य समस्या होतीच. बऱ्याच गावांमध्ये वर्षातील अर्धा काळ पिण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होतो. अशा परिस्थितीत दुबार शेती करणे आव्हानाचे होते. यासाठी अभ्यास करून काही गावांमध्ये छोटे बंधारे बांधण्यात आले. बारमाही नद्या किंवा तलाव असलेल्या ठिकाणी सौरपंपाच्या माध्यमातून पाणी आणण्यात आले. जलकुंडांची निर्मिती अजूनही डोंगर-टेकडीवर जमीन असलेले मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी बाकी होते. त्याचबरोबर ओसाड-पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी संस्थेने वाडी लागवड कार्यक्रमात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तयार करण्याकडे लक्ष दिले. कोकणातील जांभ्या जमिनीत निचऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फळझाडांचे पाणी व्यवस्थापन करणे अवघड जाते. कोरडवाहू फळझाडांना सुरुवातीच्या तीन वर्षांत सिंचनाची गरज असते. यासाठी ‘फळझाड वाडी तेथे जलकुंड’ ही भूमिका संस्थेने घेतली. पाण्याचा ताळेबंद
जलकुंडाचे फायदे
केव्हीकेचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथील तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रशिक्षण. यात रोपांना आधार देणे, कीड-रोग, खते, पाणी व्यवस्थापन आदींचा समावेश. झालेले सर्वेक्षण
जलकुंड साठवण क्षमता | फेब्रु-मार्चमधील साठा लिटरमध्ये | जलकुंड संख्या |
३० हजार लिटर | १०, ००० च्या आत | ३५ |
१०,००० ते १४,००० | ६५ | |
१५,००० ते २०,००० | ६० | |
२०,००० ते २५,००० | ९० |
संपर्क- उत्तम सहाणे-७०२८९००२८९ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.