गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट ग्राहकांना विक्री

सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश गणेशराव शिंदे हे नैसर्गिक शेती पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतात. शेतकरी गटाच्या माध्यमातून त्यांनी शेती विकासाला चालना दिली आहे. हळद पावडर तयार करून `हिरण्य' ब्रॅंन्डने विक्री करतात.
sale of process products
sale of process products

सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश गणेशराव शिंदे हे नैसर्गिक शेती पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतात. शेतकरी गटाच्या माध्यमातून त्यांनी शेती विकासाला चालना दिली आहे. हळद पावडर तयार करून `हिरण्य' ब्रॅंन्डने विक्री करतात. याचबरोबरीने डाळी तसेच धान्याची थेट ग्राहकांना विक्री करत शेती किफायतशीर केली आहे. 

सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश शिंदे यांनी वनस्पतिशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून नोकरीसाठी प्रयत्न केले. स्पर्धा परिक्षेत यशाने हुलकावणी दिल्यानंतर ते निराश झाले नाहीत. व्यवसायासाठी गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवत परंपरागत शेतीमध्ये बदल घडविण्यासाठी २००१ पासून पूर्णवेळ शेती नियोजनाला सुरवात केली. त्यावेळी संयुक्त कुटुंबाची एकूण ९० एकर एकूण जमिनीपैकी २० क्षेत्र बारमाही बागायती तर बाकीची हंगामी बागायती होते. दोन विहीर, कूपनलिकेच्या जोडीला काही किलोमीटरवर असलेल्या दुधना नदीवरून पाइप लाईनव्दारे सिंचनासाठी पाणी आणले. त्यामुळे केळी,ऊस पिकांसोबत जिरायती क्षेत्रात मूग, तूर, तर रब्बी ज्वारी, गहू, हरभरा लागवडीचे नियोजन ठेवला. भावांच्या मदतीने शेती व्यवस्थापन ठेवले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार  कृषी विभागाची शेतीशाळा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या गाठी-भेटीतून नवीन पीक पद्धती, लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळू लागली. हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे रब्बी ज्वारीच्या होप प्रकल्पांतर्गत गावाची निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थेतील शास्त्रज्ञ गावी येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू लागले. चार वर्षापूर्वी सनपुरी गावात त्यांनी समविचारी शेतकऱ्यांना एकत्र करून आत्मा अंतर्गत हरितक्रांती सेंद्रिय शेतकरी गटाची स्थापना केली.  आंतरपीक पध्दतीचे प्रयोग 

 •   कपाशीच्या दोन ओळीमध्ये मूग किंवा उडीदाच्या दोन ओळी त्यानंतर तुरीची एक ओळ लागवडीचा प्रयोग. मुगाचे एकरी दोन क्विंटल, तुरीचे चार ते सहा क्विंटल आणि कपाशीचे १२ क्विंटलपर्यंत उत्पादन. 
 •   यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी योग्य असणाऱ्या सोयाबीनच्या एमएयुस-६१२  जातीची लागवड. 
 •   सोयाबीनच्या पाच ओळीनंतर तुरीचे आंतरपीक.
 •   वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कपाशीच्या देशी जातीची लागवड. 
 •   हरभऱ्यामध्ये करडईचे आंतरपीक ठरले फायदेशीर. 
 • दहा एकरावर नैसर्गिक पद्धतीने शेती  दरम्यानच्या काळात कुटुंबामध्ये जमिनीची विभागणी झाल्यानंतर नरेश शिंदे यांच्या वाट्याला २० एकर जमीन आली. त्यापैकी १० एकर क्षेत्रात गेल्या सहा वर्षापासून नैसर्गिक पद्धतीने पीक व्यवस्थापन ठेवले आहे. प्रामुख्याने गोखूर खत, जीवामृत, परभणी कृषी विद्यापीठाची जिवाणू खते, लसूण, तंबाखू, मिरचीपासून तयार केलेल्या कीडनाशकाचा वापर केला जातो.   यंदा नैसर्गिक पद्धतीने अडीच एकरावर हळद लागवड आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये खरिपात मूग, उडीद, तूर आणि रब्बीमध्ये हरभरा, बन्सी गहू, ज्वारी लागवड असते. उर्वरित दहा एकर क्षेत्रावर सोयाबीन, कपाशी लागवड असते.

  हळद लागवडीचे नियोजन

 • काही वर्षापूर्वी शिंदे हळदीच्या सेलम जातीची सरी-वरंबा पद्धतीने पाच एकरावर लागवड करत होते. मात्र गेल्या सहा वर्षांपासून सुधारित पद्धतीने अडीच एकरावर हळद लागवडीचे नियोजन.
 •  जूनच्या सुरवातीस चार फूट अंतरावर जोड ओळ . या जोड ओळीतील अंतर एक फूट ठेऊन सहा इंच अंतरावर  हळद बेण्याची लागवड. वखर पाळ्या घालून आंतर मशागत. यामुळे पाणी कमी लागते. आंतरमशागतीचा खर्च कमी होतो.
 • सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बेड रेझरव्दारे हळदीस माती लावली जाते.तयार झालेल्या सऱ्याव्दारे गरजेनुसार पाणी दिले जाते.
 • हळदीमध्ये गहू, झेंडू आदी आंतरपिकांची लागवडीतून अतिरिक्त नफा. 
 • डाळ, हळद लोणचे निर्मिती 

 •   नैसर्गिक पद्धतीने उत्पादित मूग, उडीद, तूर, हरभरा डाळींची घरगुती गिरणीवर निर्मिती.  शिंदे यांच्या पत्नी सौ. सविता यांची प्रक्रिया उद्योगात चांगली मदत.
 •   डाळीचे एक किलो पॅकिंग, लेबलिंग करून १०० ते १४० रुपये प्रति किलो दराने विक्री. 
 •   कच्च्या हळदीपासून लोणचे निर्मिती. यंदा दीड क्विंटल लोणच्याची प्रति किलो ३०० रुपये दराने विक्री.
 • सोलर ड्रायरव्दारे हळद पावडर निर्मिती 

 • हळकुंडापेक्षा हळद पावडर तयार करून विक्री केल्यास अधिक नफा मिळतो ही बाब लक्षात आल्यास नरेश शिंदे यांनी चार वर्षांपासून हळद पावडर निर्मितीला सुरवात केली. घरी पॅकिंग करून प्रति किलो २०० रुपये दराने विक्री सुरू केली. पहिली तीन वर्षे पुढील वर्षी लागवडीसाठी बेणे ठेवून उर्वरित हळकुंडापासून पावडर तयार करून विक्री सुरू केली.  पारंपरिक पद्धतीमध्ये ओली हळद शिजवली जाते.त्यानंतर ती उन्हात वाळवून पॉलिश केले जाते. हळकुंडापासून पावडर तयार करतात. शिंदे देखील याच पद्धतीने हळद तयार करत होते. परंतु ओल्या हळदीचे साल काढून त्याचे तुकडे  वाळवून त्यापासून पावडर तयार केल्यास चांगला दर मिळतो. तसेच गुणधर्मही टिकून राहतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी नवीन पद्धतीने पावडर निर्मितीला सुरवात केली. दोन वर्षापूर्वी सहा क्विंटल ओल्या हळदीपासून त्यांनी पावडर तयार केली. दर्जेदार हळदीला ग्राहकांनी पसंती दिली. या पद्धतीने हळद पावडर तयार करण्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ओल्या हळदीची काढणी केली जाते.
 •   सोलर ड्रायरमध्ये ४ क्विंटलपर्यंत हळदीचे तुकडे वाळण्यास तापमानानुसार ३ ते ४ दिवस लागतात. सोलर ड्रायरमध्ये हळदीच्या तुकड्यांमध्ये ४ ते ५ टक्के आद्रता शिल्लक राहते. त्यानंतर हे तुकडे सोलर ओव्हन मध्ये शंभर टक्के वाळतात. सोलर ओव्हनमध्ये दिवसाला २ क्विंटल हळद तुकडे वाळविता येतात.पल्व्हरायझरमध्ये ३०० मेस जाळीव्दारे हळद पावडर तयार केली जाते.
 •   पेट जारमध्ये २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १ किलो पॅकिंग. यंदा ‘हिरण्य' ब्रॅण्ड ने ४०० रुपये प्रति किलो दराने १४ क्विंटल हळद पावडर विक्री. प्रति किलो मजुरी, पॅकिंग खर्च १५० रुपये. 
 •   सौर वाळवणी यंत्राव्दारे वाळविलेल्या हळद पावडरमध्ये कुरकुमीनचे प्रमाण शिजविलेल्या हळदीच्या तुलनेत अधिक. नैसर्गिक सुगंध,रंग कायम रहातो. श्रम कमी, इंधनात बचत. कोरोना काळात हळद पावडरीला काढा तयार करण्यासाठी चांगली मागणी.
 •   येत्या काळात गटातर्फे हळद वाळवणीसाठी मुंबई येथील सायन्स फॉर सोसायटी या संस्थेच्या तज्ज्ञांनी विकसित केलेले सौर वाळवणी यंत्र खरेदीचे नियोजन. 
 • थेट ग्राहकांना विक्री

 • दरवर्षी प्रभावती समूहातर्फे आयोजित धान्य महोत्सवात नरेश शिंदे  हळद पावडर, डाळी, लोणचे यांची विक्री करतात. या शिवाय मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी आयोजित प्रदर्शनात शिंदे शेतमालाची विक्री करतात. तसेच कृषी प्रदर्शने, शेतकरी मेळाव्यामध्ये विक्री स्टॅाल लावतात. या शिवाय बन्सी गहू, ज्वारीची घरूनच थेट विक्री होते. स्वतःची विक्री व्यवस्था असल्यामुळे नफ्यात चांगली वाढ मिळाली आहे. 
 • अॅग्रोवन दिशादर्शक  नरेश शिंदे हे ‘अॅग्रोवन'चे सुरुवातीपासूनचे वाचक आहेत. अॅग्रोवनमधील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथापासून प्रेरणा घेत त्यांनी शेतामध्ये अनेक प्रयोग केले. दिवाळी भेट म्हणून अनेक शेतकरी मित्रांना शिंदे अॅग्रोवन दिवाळी अंक देतात. नुकतीच नरेश शिंदे यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी रसायन शाखेच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

  - नरेश शिंदे ः ९४२१३८६८३३

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com