शेतीला शेळीपालन, थेट शेतीमाल विक्रीची जोड

दुर्दम्य आशावाद जपत चिंधीचक (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) या दुर्गम गावातील वर्षा तुळशीदास लांजेवार शेती नियोजनात सातत्य ठेवत आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल केली आहे. महिला समूह, सेंद्रिय शेती व्यवस्थापनातून वर्षाताईंनी वेगळी ओळख तयार केली आहे.
शेतीला शेळीपालन, थेट शेतीमाल विक्रीची जोड
शेतीला शेळीपालन, थेट शेतीमाल विक्रीची जोड

चिंधीचक (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) हे अवघ्या १,३७१ लोकसंख्येचे गाव. तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असून, गावात आदिवासींची संख्या अधिक आहे. गावात सुमारे २१ महिला समूह असून, त्यांचा साईबाबा महिला ग्रामसेवा संघ तयार करण्यात आला आहे. या संघाच्या सचिव म्हणून वर्षा लांजेवार यांनी काम पाहिले आहे. आवडगाव (ता. ब्रह्मपुरी) हे वर्षा लांजेवार यांचे माहेर. त्याचे वडील श्रावण अंभोरकर. कुटुंबात वर्षा यांच्यासह तीन बहिणी, एक भाऊ, आई अशा सहा जणांचा समावेश. वडिलोपार्जित शेतीत हिस्सा न मिळाल्याने वडिलांवर मजुरीची वेळ आली. परंतु मुलांना शिक्षण मिळावे, त्यासोबतच इतरही गरजांची पूर्तता व्हावी याकरिता वर्षाताईंचे आई, वडील शेतीत राबत. या पैशातून त्यांनी मुलांचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. लहान बहिणीची शाळा सकाळच्या सत्रात होती. ती परतल्यानंतर दुपारी शाळेत जाण्यासाठी वर्षाताईंना बहिणीचा शालेय गणवेश वापरावा लागत होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वर्षाताईंचे लवकर लग्न झाले. त्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. मात्र संधी मिळताच २०१३ मध्ये त्यांनी शिक्षणास पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीए आर्टस पदवी घेतली. शिक्षणासाठी पती तुळशीदास लांजेवार यांनी चांगले प्रोत्साहन दिले. वर्षाताईंना दोन मुली, एक मुलगा आहे. सध्या एक मुलगी कृषी डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. सेंद्रिय शेतीला सुरुवात ः लग्नानंतर सासरी आलेल्या वर्षाताईंनी कुटुंबाच्या चार एकर शेतीची सूत्रे आपल्याकडे घेतली. २०१५ पासून कुटुंबाने सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापनाला सुरुवात केली. यावर्षी त्यांना पीजीएस प्रमाणपत्र मिळाले आहे. हरभरा, लाखोरी, तूर, जवस, करडई, भात लागवड त्या करतात. खरिपात तीन एकरांवर चनौर आणि एक एकरावर काळा भाताची लागवड असते. बांधावर तूर लागवड केली जाते. रब्बी हंगामात हरभरा आणि करडईची लागवड असते. सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापनावर भर दिलेला आहे. वर्षाताई दशर्पणी अर्क, घनजिवामृत, जिवामृत यांसारख्या जैविक घटकांचा वापर शेतीमध्ये करतात. शेतात कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर केला जातो. सध्या एकरी हरभरा ५ क्विंटल, लाखोरी ७ क्विंटल, तूर ४ क्विंटल, जवस दोन क्विंटल, करडई सहा क्विंटल आणि भाताचे १५ क्विंटल उत्पादन मिळते. काळ्या भाताचे एकरी पाच क्विंटल उत्पादन मिळते. शहरी बाजारपेठेत काळा तांदूळ ४०० रुपये किलो, हातसडी तांदूळ २०० रुपये किलो याप्रमाणे विकला जातो. विविध कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी तांदळाला बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न केले. आता गावस्तरावरूनच तांदळाला चांगली मागणी आहे. शेती व्यवस्थापनातील वर्षाताईंची प्रयोगशीलता पाहून कृषी विभागाकडून त्यांना विविध अभ्यास दौऱ्यात सहभागी करून घेण्यात येते. शेळीपालनाची जोड वर्षाताईंकडे ४५ शेळ्या आहेत. शेळीपालनाकडे वळण्यापूर्वी एका संस्थेमार्फत शेळ्यांची निगा राखण्यासंदर्भात त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. दोन गाईंचे संगोपनही त्या करतात. शेणखत, लेंडी खताचा वापर शेतीमध्ये केला जातो. यामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे. गांडूळ खत प्रकल्प जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत वर्षाताईंना गांडूळ खतनिर्मितीसाठी ११ टाक्यांचे युनिट मंजूर झाले आहे. एक लाख रुपयांचे अनुदान त्याकरिता दिले जाणार आहे. याचे काम सध्या प्रगतीवर आहे. गांडूळ खताची विक्री ब्रॅण्डच्या माध्यमातून केली जाणार आहे. शेतकरी कंपनीत सहभाग सप्टेंबर २०१९ मध्ये राणी हिराई फार्मर प्रोड्यूसर कंपनीची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये संचालिका म्हणून वर्षाताई जबाबदारी सांभाळतात. या कंपनीचे ५५३ भागधारक असून, त्यांनी साडेतीन हजार शेअर्स खरेदी केले आहेत. एका शेअर्सची किंमत १० रुपये आहे. या कंपनीद्वारे करडई, जवस तेलनिर्मिती कारखाना उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिला समूहाची बांधणी ः वर्षाताईंनी २०१० मध्ये वैष्णवी महिला स्वयंसह्यता समूहाची उभारणी केली. त्यामध्ये ११ महिलांचा समावेश होता. सुरुवातीला ५० रुपये बचतीचे उद्दिष्ट होते. परंतु समूहातील महिलांची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने त्यांच्याकडून दर सहा महिन्याला पैशाचा भरणा होत होता. त्यामुळे बचत रक्कमेत वाढ करून ती १०० रुपये करण्यात आली. उमेद अभियानांतर्गत समूहाची नोंदणी करण्यात आली आहे. वर्षाताई घरच्या शेतीत सेंद्रिय पद्धतीने शेतीमाल उत्पादित करीत होत्या. या सेंद्रिय शेतीमालासह समूहातील इतर महिला सदस्यांच्या शेतीतील उत्पादित धान्य विविध प्रदर्शनात त्यांनी विक्री करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिला शेतकऱ्यांनादेखील चांगला दर मिळू लागला. शेतीमाल विक्रीसाठी त्या मुंबई तसेच दिल्लीमध्ये आयोजित प्रदर्शनात सहभागी होतात. प्रदर्शनातील शेतीमाल विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होतो. ‘निर्मल समूह’ म्हणून गौरव ः वर्षाताईंनी स्थापन केलेल्या समूहातील सहा महिलांकडे स्वच्छतागृह नव्हते. त्या संदर्भाने ग्रामसभेत ठराव मांडण्यात आला. त्यानंतर समूहातील या महिलांना स्वच्छतागृह मंजूर झाले. याची दखल घेत २०१५-१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या समूहाचा ‘निर्मल समूह’ म्हणून गौरव केला. समूहाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन गावातील इतर कुटुंबांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्याकडे देखील स्वच्छतागृहाची सुविधा निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. समूहाने गावात वृक्षारोपण अभियान राबविण्यावर भर दिला आहे. शाळा परिसरात महिलांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात सातत्य ठेवले आहे. कुष्ठरोग, नेत्र तसेच आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनात समूहाने सातत्य राखले आहे. समूहातील सदस्यांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यात येते. त्यामध्ये शेळीपालन, शिवणकाम यासारख्या व्यवसायांचा समावेश आहे. वर्षाताईंनी २०१२ ते २०१४ या काळात नाबार्ड हेल्पलाइन प्रकल्पात तालुकास्तरावर संयोजिका म्हणून महाराष्ट्र व्हिलेज डेव्हलपमेंट या उपक्रमात जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) अंतर्गत गावस्तरावर समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून त्या २०१४ ते २०१९ कार्यरत होत्या. सध्या शेतकरी कंपनीच्या व्यवस्थापनात वर्षाताईंनी लक्ष घातले आहे. विविध पुरस्कारांनी गौरव ः  राजमाता जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्कार (उमेद अभियान)  राजमाता जिजाऊ तालुकास्तरीय पुरस्कार(उमेद अभियान)  केंद्र सरकारच्या ग्रामीण मंत्रालयातर्फे पुरस्कार.  तालुकास्तरीय हिरकणी पुरस्कार. संपर्क ः वर्षा लांजेवार, ७६६६६१७०२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com