वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीर

वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीर
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीर
Published on
Updated on

पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाचवेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या दुष्काळातदेखील कोथिंबिरीने त्यांना मोठा आधार दिला आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील अलगरवाडी परिसराची सोयाबीन, तूर, हरभरा हीच मुख्य पिके आहेत. गावातील बालाजी चिटबोने यांची ४० एकर शेती आहे. पारंपरिक पिकांतून मिळणारे जेमतेम उत्पन्न, लागणारा कालावधी व त्यावरील मेहनत यांचा अभ्यास ते करायचे. त्यातून किफायतशीर, नव्या पिकांचा शोध ते घेत होते. त्यातूनच त्यांना कोथिंबीर पिकाविषयी माहिती झाली. सन २०१० मध्ये एक एकरांत त्याची लावण केली. त्या वेळी कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळाले. मग हुरूप वाढला. हळूहळू क्षेत्र वाढवण्यास सुरवात केली. विविध हंगामात त्याचे प्रयोग होऊ लागले. पाहता पाहाता आठ वर्षांचा तगडा अनुभव या पिकात तयार झाला. अन्य नगदी पिकांमधूनही मिळू न शकणारे उत्पन्न ते या पिकातून मिळवू लागले आहेत. चाकूर येथील कृषी पदविकाधारक चंद्रशेखर मुळे यांच्या मार्गदर्शनातून त्यांची शेती अधिक खुलली. कोथिंबिरीची शेती

  • वर्षातून सुमारे पाच वेळा कोथिंबीर - यात मार्च ते सप्टेंबर असा कालावधी
  • पिकाचा कालावधी सुमारे ४५ दिवसांचा.
  • क्षेत्र चार ते पाच एकर - पाणी व हवामान यावर अवलंबून
  • लावणीपूर्वी नांगरट करून तुषार सिंचनाच्या सहायाने जमीन व्यवस्थित भिजवली जाते.
  • जमीन वाफशावर आल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहायाने पेरणी
  • एकरी ३० किलो बियाणे वापर
  • लागवडीपासून १५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये व बुरशीनाशकाची फवारणी
  • लागवडीपासून २५ दिवसांनी पीक संवर्धकाची दुसरी फवारणी
  • सुमारे २५ ते ३० दिवसांदरम्यान खुरपणी
  • खुरपणीनंतर एकरी २५ किलो युरियाचा डोस
  • लागवडीपासून साधारण ४५ व्या दिवशी कोथिंबीर विक्रीसाठी
  • उन्हाळ्यात एक ते दोन दिवसांआड पाणी
  • स्प्रिंकलरद्वारे सिंचन
  • दोन बैल, दोन म्हैस व एक गाय आहे. दरवर्षी पेरणीआधी एकरी सहा ट्रॅक्टर शेणखत वापरले जाते. त्यामुळे जमिनीच्या सुपिकतेत व उत्पादनात वाढ झाल्याचा अनुभव
  • कोथिंबिरीचे अर्थशास्त्र – बालाजी इतक्या वर्षांच्या अनुभवातून सांगतात की मार्च ते मे दरम्यान लावलेल्या कोथिंबीरचे उत्पादन अन्य हंगामाच्या तुलनेत कमी मिळते. मात्र दर चांगले मिळतात. योग्य व्यवस्थापन व हवामानाची साथ मिळाल्यास एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उन्हाळ्यात किलोला ५० रुपयांपासून ते कमाल दर ७०, ८० ते क्वचित ९० रुपयांपर्यंत मिळतात. अर्थात दर आवकेवर, दुष्काळी स्थिती व गुणवत्तेवर अवलंबून असतात. त्या तुलनेत पावसाळा व अन्य काळात हे दर १० ते १५ रुपये प्रति किलो एवढ्या खाली देखील घसरतात. वर्षभरात पाच हंगाम मिळत असल्याने एका दुसऱ्या हंगामात दर कमी मिळाले तरी उर्वरित हंगाम आश्‍वासक ठरण्याची संधी असते. विक्रीसाठी बाजारपेठेत जावे लागत नाही. चाकूर येथील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करत असल्याने काढणी व वाहतुकीच्या खर्चात बचत होते. या पिकाला एकरी सुमारे १० ते १२ हजार रुपयांपर्यंत किंवा त्याआतच खर्च येतो. खते, फवारण्या यांची गरजही कमीच असते. उन्हाळ्यात एकरी ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न हे पीक मिळवून देऊ शकते. बीजोत्पादनातून खर्चात बचत बियाणे १०० ते १५० रुपये प्रति किलो दराने मिळते. त्यावर अधिक खर्च व्हायचा. यावर उपाय म्हणून गेल्या पाच वर्षांपासून बालाजी कोथिंबिरीचे बीजोत्पादन करतात. सप्टेंबरचा हंगाम झाल्यानंतर दोन एकरांत बीजोत्पादनासाठी धना पेरण्यात येतो. मळणी करून तो पुढील हंगामांसाठी वापरला जातो. शिल्लक बियाण्याची विक्री करून त्यातूनही अतिरिक्त नफा कमावण्यात येतो. अर्धा एकरवर नेपियर गवत लातूर जिल्ह्यात अनेकवेळा दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे चारा टंचाईचा सामना करावा लागतो. बालाजी यांनी उपाय म्हणून अर्धा एकरवर संकरित नेपियर वाणाची लागवड केली आहे. त्याद्वारे जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध केला आहे. दररोज दहा लिटर दूध डेअरीला जाते. त्यातूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते. सिंचनाची स्थिती एक विहीर व तीन कूपनलिका असून त्यातील दोन सध्या सुरू आहेत. कूपनलिकेचे पाणी विहिरीत साठवून ठेवले जाते. सर्व ४० एकर क्षेत्रासाठी पाइपलाइन केली आहे. गावातील घरी कूपनलिका असून सहा हजार फूट पाइपलाइनद्वारे त्याचे पाणी शेतातील विहिरीत जमा केले जाते. सध्या दुष्काळामुळे गावातील कूपनलिका बंद पडली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार विहिरीचे पाणी त्याच पाइपलाइनद्वारे घरी वापरले जाते. कोथिंबिरीच्या जोरावर ट्रॅक्टर खरेदी एप्रिल २०१६ मध्ये तीन एकरांत कोथिंबीर घेतली होती. त्यावर्षी भीषण दुष्काळ पडल्याने उत्पादन घटले होते. मात्र बालाजी यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करीत तीन एकरांत ६७ क्विंटल उत्पादन घेतले होते. त्यावर्षी व्यापाऱ्यांकडून जागेवरच किलोला ९० रुपये दर मिळाला होता. त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार घेत बालाजी यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य झाले. शेतीचा केला विस्तार – बालाजी यांची मुले कपड्यांचे व्यापारी आहेत. बालाजी शेती पाहतात. वडिलोपार्जित २० एकर जमीन असताना सुरवातीला आठवडी बाजारात कपडे विक्रीचा व्यवसाय करीत शेतीकडे ते लक्ष देत असत. जिद्द व चिकाटीतून त्यांनी ४० एकरांपर्यंत शेतीचा विस्तार केला. उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन, पीक नियोजन, बाजारभावाचा अभ्यास करीत दुष्काळातही शेतीतून नफा मिळवण्यात त्यांना यश आले.

    पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून कोथिंबीर घेण्याचा निर्णय घेतला. या पिकात जास्त जोखीम नाही. देखभाल खर्चही कमी आहे. योग्य व्यवस्थापनातून याच पिकातून आमचे अर्थकारण सक्षम झाले आहे. बालाजी चिटबोने - ९९२३३९४४७७

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com