Agriculture Innovation: रेठरे हरणाक्ष (जि. सांगली) येथील कृषी विषयातील पीएचडीधारक व प्राध्यापक अजित पवार यांनी नोकरी सांभाळून घरच्या ४५ एकर शेतीलाही समृद्ध, संपन्न, सुपीक व उत्पादनक्षम बनविले आहे. विविध देशी गाईंचे संगोपन, शेतावरच विविध सेंद्रिय स्लरी व खत निर्मिती, आधुनिक तंत्रज्ञान वापर, ऊस व २५ गुंठ्यांत विविध भाज्या उत्पादनाचे मॉडेल अशी विविध वैशिष्ट्ये त्यांनी जपली आहेत. त्यामुळेच त्यांची ही शेती शेतकऱ्यांसह तज्ज्ञांसाठीही आदर्श, अनुकरणीय ठरली आहे. .सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या कुशीत रेठरे हरणाक्ष गाव वसले आहे. ऊस, सोयाबीन, गव्हासारख्या पिकांनी गावची समृद्धी फुलली आहे. शेतीतून आलेली सुबत्ता इथल्या प्रत्येक घराकडे पाहिल्यानंतर दिसून येते. याच मातीने महाराष्ट्राला पठ्ठे बापूराव (श्रीधर कृष्ण कुलकर्णी) यांच्या रूपाने प्रतिभावान लोककलावंताची देणगी दिली. याच मातीत जन्मलेले ‘महाराष्ट्र केसरी’चा दुसरा किताब पटकावणारे पैलवान भगवान मोरे यांनीही क्रीडा क्षेत्रात गावाचे नाव उज्ज्वल केले. रेठरे हरणाक्ष गाव प्राचीन पशुपतिनाथ मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे..संयुक्त पवार कुटुंबाची शेतीयाच गावातील अजित पवार यांच्या कुटुंबाची ४५ एकर शेती आहे. त्यांचे वडील मोहन श्यामराव पवार. तर चुलते शंकर, सर्जेराव व प्रकाश यांच्यासह ३३ सदस्यांचे हे सामाईक कुटुंब आहे. संपूर्ण शेती बागायती. ऊस हे त्यांचे मुख्य पीक. तर सोयाबीन, हरभरा. गहू (खपलीसह) ही हंगामी पिके. अजित यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून एमएस्सी तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पीएचडी घेतली आहे. गावापासून आठ किलोमीटरवरील कृषी महाविद्यालयात विस्तार शिक्षण विषयात ते प्राध्यापक पदी कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून ते घरच्या वडीलधाऱ्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्य सदस्यांच्या मदतीने शेती देखील पाहतात..Farmer Success Story: वीस वर्षांपासून शेतीत ‘बिनहाती’ झुंज....तंत्रज्ञान, शास्त्रीय ज्ञानाचा वापरजमिनीचे आरोग्य, सुपीकता व उत्पादकता जपणे. शेतीतील खर्च कमी करणे. पिकांची उत्पादन क्षमता वाढवणे, आरोग्यदायी अन्नाची निर्मिती हे उद्देश ठेवून पवार कुटुंबाने शेती व्यवस्थापनात सुधारणा सुरू केल्या. कृषी क्षेत्रातील पीएचडी असल्याने अजित यांनी शास्त्रीय व तांत्रिक ज्ञानाचा पुरेपूर वापर केला. पूर्वी दावणीला दुभती जनावरं होती. मात्र एचएफ गाईंची संख्या हळूहळू कमी केली. त्या जागी गीर, साहिवाल, कांकरेज, राठी, खिलार आदी जातिवंत देशी गाईंच्या संगोपनाला सुरुवात झाली. आजमितीला २९ पर्यंत देशी पशुधन आहे. केवळ दूध उत्पादन नव्हे, तर शेतीला आवश्यक शेण व गोमूत्र यांचा शाश्वत स्रोत निर्माण करणे हा गोसंगोपानचा उद्देश ठेवला..सेंद्रिय घटकांची निर्मितीमाती परीक्षणानुसारच खतांचे नियोजन केले. बाहेरून सेंद्रिय घटक विकत आणण्यापेक्षा जास्तीत जास्त निविष्ठा, दशपर्णी अर्क आदी घटक शेतातच तयार केले जातात. ताग, धैंचा यासारखी हिरवळीचे पिके घेऊन फुलोऱ्यात आल्यानंतर ती जमिनीत गाडली जातात. पिकांची फेरपालटही केली जाते. या सर्व प्रयत्नांमधून मातीचा सेंद्रिय कर्ब ०.५ टक्क्यावरून ०.९ टक्क्यापर्यंत पोहोचल्याचा दावा अजित यांनी केला आहे. खर्चातही ३० टक्के बचत झाली आहे. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी, त्यांच्या अनुभवांचा व प्रयोगांचा सखोल अभ्यास सुरू केला. .अहमदाबाद (गुजरात) येथील एका युनिटच्या आधारे ‘लिक्विड फरमेंटेड मॅन्युअर’ तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. तसे युनिट उभारून त्याची निर्मितीही सुरू केली. नारायणगाव- जुन्नर (जि. पुणे) भागातील दहा ड्रम थेअरी तंत्राचे प्रशिक्षण घेऊन विविध स्लरींची निर्मिती सुरू केली. त्याचबरोबर स्फुरदयुक्त खताचे म्हणजे ‘प्रोम’ निर्मितीचेही युनिट उभारले आहे. त्यामध्ये दिवसभरात संकलित झालेल्या शेणाचा वापर होतो. तयार झालेली स्लरी साठवण टाकीत येते. यामध्ये ती आठ दिवस असते..दरम्यान मडपंपाच्या साहाय्याने ‘मिक्सिंग’ केले जाते. यंत्राद्वारे चोथा वेगळा आणि स्लरी वेगळी होते. द्रवरूप आणि घनरूप असे पदार्थ तयार होतात. वर्षभर पुरेल इतके कुजलेले शेणखत तयार होते. त्याचेही मूल्यवर्धन केले जाते. त्यामध्ये वेस्ट डी कंपोजर कल्चर व अन्य कल्चरचा वापर केला जातो. त्याच्या वापराने शेतात जिवाणूंची संख्या वाढीस मदत होते. शेतात नेहमी वाफसा टिकून राहतो. शेती एका विचारातून होत नाही. पवार कुटुंबातील सर्व जण एकत्रित चर्चा करतात. एकमेकांच्या संवादातून ज्ञानाची देवाणघेवाण होते. प्रत्येक जण आपापल्या कामाची जबाबदारी घेतो त्यामुळे शेतीत अपेक्षित यश मिळवता येते..Pickle Business Success Story: जिद्दीतून साकारले ‘सुगरणीचे लोणचे’.२५ गुंठ्यांत विविध भाजीपालाउसाचे एकरी ८०, ९० ते १०० टनांच्या पुढेही उत्पादन मिळवण्यात पवार यशस्वी झाले आहेत. लहरी हवामानामुळे उत्पादनात चढ उतार होत राहतात इतकेच. ऊस खोडवा तुटून गेल्यानंतर रब्बीसाठी शेत मोकळे होते. त्यापैकी २५ गुंठ्यांचे क्षेत्र केवळ भाजीपाला पिकांसाठी राखीव ठेवले जाते. सहा फूट रुंद व २३० फूट लांब आकाराचे बेड तयार केले जातात. त्यातील थोड्या थोड्या जागेत कांदा, लसूण, बीटरूट, मेथी, चाकवत, पालक, कोथिंबीर, कोबी, फ्लॉवर, भेंडी, पावटा, गवार, काकडी, कोहळा अशा विविध भाज्यांची लागवड केली जाते. ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी थंड हवामानाचा असतो. हे हवामान अनेक भाजीपाला पिकांसाठी पोषक ठरते. पावसाळ्याच्या तुलनेत रोग- किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो असा पवार यांचा अनुभव आहे. .अशा नियोजनातून गुणवत्ता व उत्पादनही चांगले मिळते. घरी संयुक्त कुटुंबासाठी खाण्यासाठी भाज्यांची विविधता तयार होते. कुटुंबातील सर्वांसाठी भाजीपाला मुबलक मिळत असल्याने केवळ भाजी न करता पराठा, सूप किंवा अन्य मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासही वाव मिळतो. त्यातून जेवणाची लज्जत वाढते. सेंद्रिय पद्धतीचे उत्पादन असल्याने गावातील विक्रेते थेट खरेदी करतात. त्यांना एकाच जागी भाज्यांची विविधता मिळते. कमी कालावधीतील पालेभाज्यांची दुसऱ्यांदा लागवड केली जाते. रेन पाइपद्वारे पाण्याचा वापर होतो..दूध विक्री, गूळ निर्मितीअजित सांगतात, की कोरोना काळानंतर ग्राहकांकडून देशी दुधाला मागणी वाढली आहे. त्यानुसार काही ग्राहकांना दुधाचा पुरवठा करण्यात येतो. ग्राहकांकडून सेंद्रिय गुळालाही पसंती असल्याने मागील वर्षापासून एक किलो, पाऊण किलो अशा वजनाचे गुळाचे उत्पादन घेण्यात येत आहे. चॉकलेटच्या आकाराच्या गुळाच्या वड्याही तयार केल्या आहेत. पवार यांची शेती शेतकऱ्यांसाठी आदर्श व अनुकरणीय ठरली आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार शेतकऱ्यांनी तसेच कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, शास्त्रज्ञ आदींनीही ताला भेट देऊन प्रयोग समजून घेतले आहेत.अजित पवार ९१५८८७४१४१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.