महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला चालना

पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता.वेल्हा, जि.पुणे) या गावामध्ये महिला बचत गटाच्या सहकार्याने कृषी पर्यटन उपक्रमाला चालना दिली.यामुळे शहरी लोकांना ग्रामीण जीवन आणि महिला बचत गटांना शेतीमाल, प्रक्रिया उत्पादन विक्रीचा नवा मार्ग सापडला आहे.
भात रोप काढणीमध्ये पर्यटकांचा सहभाग.
भात रोप काढणीमध्ये पर्यटकांचा सहभाग.
Published on
Updated on

पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता.वेल्हा, जि.पुणे) या गावामध्ये महिला बचत गटाच्या सहकार्याने कृषी पर्यटन उपक्रमाला चालना दिली.यामुळे शहरी लोकांना ग्रामीण जीवन आणि महिला बचत गटांना शेतीमाल, प्रक्रिया उत्पादन विक्रीचा नवा मार्ग सापडला आहे. पुण्यापासून ४५ किमी अंतरावर राजगडाच्या पायथ्याशी मार्गासनी (ता. वेल्हा, जि.पुणे) हे गाव. आस्कवडी ही तेथील मुख्य वाडी. येथील प्रत्येक कुटुंबातील एक जण पुण्यात रोजगारासाठी आहे. कुटुंबाकडे दुभत्या गाई,म्हशी असल्याने दुग्ध व्यवसाय देखील चांगल्याप्रकारे वाढलेला. महिन्याला येणारे दुधाचे पैसे हाच घराचा पूरक पगार. पण गेल्या वर्षी कोरोनामुळे पुण्यावर अवलंबून असणाऱ्या गावाला आर्थिक फटका बसला. उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीतून मिळणारे उत्पन्न पुढे भातशेतीला भांडवल म्हणून उपयोगी पडायचे. परंतु पुणे बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला लागवड आणि विक्रीचे चक्र विस्कळित झाले, कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले. महिला बचत गटाचा उपक्रम  पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या भारतीताई खासबागे यांनी मार्गासनी गावातील तेरा महिला गटांना एकत्र करून ‘शाश्वत बचत गट’ विभाग तयार केला होता. गरजू कामासाठी कर्ज मिळणे आणि ते मुदतीत परत करणे अशी विभागाची रचना आहे. या उपक्रमाला बजाज कंपनीने सीएसआर फंडामधून अर्थसाहाय्य दिले. यामुळे शेतकरी महिलांना खरिपासाठी खेळता निधी मिळाला. यंदा मार्गासनी शिवारात चांगला पाऊस झाल्याने भात लागवडीला गती मिळाली. कोरोनाचे वातावरण निवळले असले तरी सावट पूर्ण गेले नव्हते. त्यामुळे पुढे काय होईल? याची धास्ती होती. भात रोपवाटिकांमुळे शिवार हिरवंगार झालं. याच दरम्यान बचत गटाच्या बैठकीत महिलांना एक कल्पना सुचली की, सारी हॉटेल बंद आहेत आणि पुण्यातल्या लोकांना फिरायला बाहेर पडायचं आहे. यांना आपल्याच शेतावर एक दिवसासाठी कृषी पर्यटनाला बोलावायचं का? आपल्यालाही आर्थिक उत्पन्न होईल, त्यांना निसर्ग पर्यटन घडेल. ज्ञान प्रबोधिनीचा पुढाकार  गेल्या वीस वर्षांपासून ज्ञान प्रबोधिनी संस्था मार्गासनी गावकऱ्यांसोबत कार्यरत आहे. गावातील बचत गटाच्या कृषी पर्यटन संकल्पनेला संस्थेने पाठिंबा दिला. पुणे शहरातल्या कुटुंबांना मार्गासनी गावात ‘शेती अनुभव घ्यायला, शेतकरी कुटुंबात या’ असे आवाहन केले. या उपक्रमाला पुणे शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मार्गासनी गावाशिवारात भात लावणी तोंडावर आली होती. हे लक्षात घेऊन महिला गटाने कृषी पर्यटन योजना आखली. शहरातल्या एका कुटुंबाने आस्कवाडीतील एका शेतकऱ्याच्या शेतावर यायचे.त्याला शेतीकामात मदत करायची, त्याच्याच घरी जेवायचे,गावात फिरायचे आणि संध्याकाळी चहा पिऊन परतायचे. महिन्यातून एकदा असे चार महिने कुटुंबातल्या चार जणांनी शेतकऱ्याच्या घरी पर्यटनाला येण्यासाठी पाच हजार रुपये कुटुंबाला द्यायचे. या रक्कमेमध्ये शेतकरी कुटुंबाच्या घरी आल्यावर एक आणि निघताना एक असे चार वेळचे चार जणांचे मिळून एकूण ३२ चहा आणि १६ जेवणाचा हिशेब मांडला गेला. गटातल्या महिलांना वाटले एका दिवसाला चार जणांना सव्वा हजार रुपये कोण देणार? पण कृषी पर्यटनाची आवड असणाऱ्या पुणे,मुंबई शहरातील बऱ्याच कुटुंबांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला. ठरल्याप्रमाणे शहरी कुटुंबांनी नावे संस्थेकडे नोंदविली. ठरले कृषी पर्यटनाचे नियोजन  मार्गासनी गावातील महिला गटाचा कृषी पर्यटन हा पहिलाच प्रयोग होता. ५० शहरी कुटुंबांची निश्चिती झाल्यावर नाव नोंदणी थांबवली. प्रत्यक्ष भातलावणीपासून शहरी पर्यटकांची पहिली भेट सुरु झाली. त्या अगोदर गटातील सदस्यांनी प्रशिक्षण घेतले. शेतातील उत्पादित तांदळाची दोन मोठी घावन आणि चटणी असा नाष्टा ५० रुपयांना ठरला. जेवणाचा साधाच पण पोटभर मेनू. जेवणात दोन भाज्या, पोळी किंवा भाकरी आणि सोबत शिरा, खीर असं ठरलं.पर्यटकांना शेतात कसे न्यायचे, शेतीची काय माहिती द्यायची, हे देखील सदस्यांनी ठरविले. घरातली बाई स्वयंपाकात गुंतली आणि पुरुष मंडळी किंवा बचत गटातील मैत्रिणीने एकमेकींच्या मदतीने शेत दाखवायचे, शेतीकामाची कामाची माहिती द्यायची. लोकांचे जेवण झाले की, गावातील शाळा,मंदिर दाखवायचे असं नियोजन झाले. ज्यांच्या शेतावर पाहुणे येणार त्यांचा व्हॉटस अप गट तयार झाला आणि गाड्यांमधून पत्ते शोधत पुणे, मुंबईचे पाहुणे गावामध्ये यायला लागले. पाहुणे रमले शेतीत... घरी आलेल्या पाहुण्यांपैकी कोणाला चूल आवडत होती तर कोणी जात्यावर दळून बघत होतं. जेवायला पोळी नको भाकरीची मागणी झाली. दावणीला बांधलेल्या गाई,म्हशी पाहून मुलांना मज्जा येत होती. कोणी कोंबडीचे पिल्लू पकडायचा प्रयत्न करत होते, तर कोणी शेळीला हात लावू का? विचारात होते. शेतामध्ये कोणीतरी झाडावर चढायला शिडी आहे का? विचारात होते, तर कोणी म्हशी, शेळीला तुमचे घर नेमके कसे सापडते? असे प्रश्न विचारात होते. शेतात काम करून दमल्यावर बसायला खुर्ची नसते, हे लक्षात येत होते. शाळा गावात नसते, त्यासाठी लांबवर मुलांना चालत जावे लागते हे मात्र समजत नव्हते. पाहुण्यांना नदीवर गेल्यावर काहीतरी ‘भारी’ पाहतोय असे वाटायचे, त्यात पाय सोडून बसायची पण हौस वाटते हे लक्षात आलं. कोणी गोट्या खेळून लहानपण आठवलं, तर कोण्या आजोबांनी पाहुण्यांच्या पोरांना गोष्ट सांगून नातवांची भेट झाल्याचं समाधान व्यक्त केलं. गावाची समृद्धी कशात आहे हे या पाहुण्यांनी अनुभवले. गावशिवारात फिरणारे शहरी पाहुणे बघून गावकरी देखील खूष झाले. शेतीतील भातलावणी, शेतकऱ्याच्या घरी जेवण आणि गावाचा फेरफटका झाल्यावर शहरी ग्राहक बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या स्टॉलवर हमखास भेट देत होते.यातून उत्पादनांची जोरदार विक्री सुरू झाली. महिलांना मिळाला आत्मविश्वास  अनोळखी पाहुणे घरी येणार म्हणून आधी आलेला ताण तणाव रमलेल्या शहरी पाहुण्यांना बघून निघून गेला. पर्यटन उपक्रमासाठी आधी वाडीतील ३ ते ४ जणींनीच नावे दिली होती, पण ग्रामीण जीवनात रमलेले शहरी पाहूणे बघितल्यावर बचत गटातील २३ सदस्या ‘येऊ द्या आमच्याकडे पाहुणे’ असे म्हणायला लागल्या. हे या उपक्रमाचे यश म्हणावे लागेल. शहरी पाहुण्यांनी बचत गटाने केलेल्या उत्पादनांची गावातच खरेदी केल्याने वीस हजाराहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. कोरोनामुळे रिकामा खिसा भरायला शेतकऱ्याला सन्मानाचा मार्ग सापडला. पुणे,मुंबई शहरातील ४३ कुटुंबांनी कृषी पर्यटन उपक्रमात सहभाग नोंदविला. यामुळे २३ कुटुंबांची अडीच लाखांहून अधिक उलाढाल झाली. पाहुण्यांना आपुलकीचे घरगुती जेवण मिळाले. सोबत शेतीतील कष्ट आणि खेडेगावातील ‘जगणं’ जवळून पाहता येऊ लागले. शहरी पाहुणे शेतीवर येणार म्हणून गावात बैठका झाल्या. यासाठी सासू- सुना एकत्र येत होत्या. बायका घरी स्वयंपाक करत होत्या, तेव्हा घरची पुरुष मंडळी पाहुण्यांना शेतावर घेऊन जात होती. पाहुण्यांनी धान्य तसेच प्रक्रिया पदार्थांची खरेदी केल्याने चांगली आर्थिक उलाढाल सुरू झाली आहे. - सुनीता दसवडकर, आशा दसवडकर संपर्क ःसुवर्णा गोखले, ९८८१९३७२०६ (लेखिका ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे कार्यरत आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com