
श्रीगोंदा तालुक्यातील (जि. नगर) कोळगाव येथील अभिजित दळवी आणि सुरडी येथील संजय वागसकर यांनी एकत्र येऊन पाच वर्षांपासून शेततलावात मत्स्यपालन सुरू केले. योग्य व्यवस्थापनातून रोहू, कटला, सायप्रिनस, पंगस आदींचे संगोपन करून त्यांना जागेवरच ‘मार्केट’ तयार केले आहे. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील अभिजित राजेंद्र दळवी हे उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचे वडील राजेंद्र व चुलते बाळासाहेब यांचे मिळून एकत्रित कुटुंब आहे. तीस एकर शेतीत लिंबू, कांदा, फुलशेती व हंगामी पिके घेतली जातात. याच तालुक्यातीलच सुरडी येथे कैलास व संजय बाळासाहेब वागसकर हे दोघे भाऊ राहतात. वागसकर यांची १३ एकर शेती आहे. त्यात ऊस, कांदा आहे. सात वर्षांपासून लिंबूबाग शेततळ्याच्या पाण्यावर जोपासली आहे. अभिजित हे संजय यांचे भाचे आहेत. दोघांनीही शेततळ्यात मासेपालन सुरू केले असून, पंचक्रोशीत त्यांची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळाली आहे. संजय यांनी २०१३-१४ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने तीस गुंठ्यांत शेततळे उभारले. त्या वर्षी त्यात मस्त्यबीज सोडण्याचा प्रयोग केला. मत्स्यपालनाची प्रेरणा सन २०१८ मध्ये ‘आत्मा’ विभागाचे तत्कालीन प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शेततळ्यात मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम राबवला. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. संजय, अभिजित यांनीही त्याचा लाभ घेतला. त्यातून आत्मविश्वास वाढून प्रत्यक्ष संगोपन सुरू केले. कृषी विभागामार्फत मस्त्यबीज, जाळी उपलब्ध झाली. सुमारे तीन वर्षांपासून संजय आपल्या सुरडी गावात ३० गुंठ्यांत, तर अभिजित आपल्या कोळगावी एक एकरात मस्त्यपालन करतात. व्यवस्थापनातील बाबी
दर, विक्री व उत्पन्न माशांच्या जातीनुसार दर मिळतो. यात किलोला तिलापिया ६० ते ७० रुपये, पंगस ९० ते १०० रुपये तर रोहू, कटला यांना १०० ते १२० रुपयांपर्यंत दर मिळतो. मासे भिगवण (जि. पुणे) येथे पाठवले जातात. पुण्याचे व्यापारीही बांधावर येऊन खरेदी करतात. प्रति १०० माशांमागे सुमारे ३० टक्के मरतूक असते. हवामान व दर चांगले राहिले तर वर्षाला ७० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. त्यासाठी खर्च ९० हजार रुपयांपर्यंत येतो. या व्यवसायापासून पूरक उत्पन्न तयार होतेच. शिवाय शेततळ्यातील पाणी सेंद्रिय घटकांचे असल्याने त्याचा लाभ होतो, त्यातून पीक उत्पादन वाढीस फायदा होत असल्याचे संजय सांगतात. यंदा कोळगाव येथील शेततळ्यातील माशांची विक्री सुरू आहे. चार ते साडेचार टनांपर्यंत उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. मरळ माशाचाही प्रयोग खवय्यात अधिक मागणी असलेल्या मरळ जातीच्या माशाचेही प्रायोगिक पालन केले आहे. मात्र हा मासा शेततळ्यातील पॉलिथिन पेपरला नुकसान पोचवतो. त्यामुळे विना पेपर व काळी माती वापरून तीन शेततळी उभारली आहेत. त्यासाठी पूर्वी शेतात असलेल्या नैसर्गिक नाल्याचाही वापर केला. पहिल्या वर्षी या माशाला चारशे रुपये प्रति किलो दर मिळाला. संजय व अभिजित यांना तत्कालीन तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ मस्के, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, ‘आत्मा’चे समन्वयक नंदकुमार घोडके यांनी व्यवसायासाठी पाठबळ दिले आहे. कृषी विभागाच्या पुढाकारातून श्रीगोंद्यासह तालुक्यासह परिसरातील शंभरहून शेतकऱ्यांना मत्स्यपालनासाठी सुमारे पंचवीस लाख मस्त्यबीज वाटप केले आहे. श्रीगोंदा तालुक्यात तीनशेपर्यंत शेततळ्यांतून मत्स्यपालन केले जात आहे.संजय यांच्या अध्यक्षतेखाली ‘आत्मा’ अंतर्गत गोडा मासा शेतकरी उत्पादक गटही स्थापन झाला आहे. संजय यांनी एक वर्षापासून अडीच हजार पक्ष्यांचे संगोपनही सुरू केले आहे. श्रीगोंदा येथे अंड्यांची विक्री होते. - संजय वागसकर ८८०५२४०९८५, अभिजित दळवी ९३०९५०४४१३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.