खडकाळ माळरानावर गोडवा काश्मिरी ॲपल बोरांचा

लाड जळगाव (जि. नगर) येथील रावसाहेब व एकनाथ या पाटील पितापुत्रांनी खडकाळ माळरानावर काश्मिरी ॲपलबेरच्या सुमारे तीन प्रकारांसह पेरू, बहाडोली व थाई जांभूळ अशी फळबाग फुलवली आहे. वैविध्यपूर्ण वाणांची निवड, व्यवस्थापन व विक्री व्यवस्थेतून ही शेती दुष्काळी भागात त्यांनी यशस्वी केली आहे.
An attractive and round apple-shaped apple berry fruit that looks like an apple.
An attractive and round apple-shaped apple berry fruit that looks like an apple.
Published on
Updated on

लाड जळगाव (जि. नगर) येथील रावसाहेब व एकनाथ या पाटील पितापुत्रांनी खडकाळ माळरानावर काश्मिरी ॲपलबेरच्या सुमारे तीन प्रकारांसह पेरू, बहाडोली व थाई जांभूळ अशी फळबाग फुलवली आहे. वैविध्यपूर्ण वाणांची निवड, व्यवस्थापन व विक्री व्यवस्थेतून ही शेती दुष्काळी भागात त्यांनी यशस्वी केली आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्याच्या व बीड जिल्ह्याला लागून असलेल्या पूर्व भागात पाण्याचे दुर्भिक्ष असते. त्यामुळे सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात यशस्वी शेती करणे निश्‍चित आव्हानाचे व उल्लेखनीय म्हणायला हवे. तालुक्यातील लाडजळगाव येथील रावसाहेब पाटील यांची २२ एकर शेती आहे. पूर्वी ४ ते ५ एकरांवर २५ वर्षांपासून भाजीपाला, तसेच पारंपरिक भुसार पिके घेत. समाधानकारक दर नसणे तसेच सततचे बदलते वातावरण त्यामुळे हाती म्हणावे तसे उत्पन्न पडायचे नाही. रावसाहेब यांच्या मदतीला पुढे मुलगा एकनाथ आले. ते नगर येथे जलसंपदा विभागात नोकरीस आहेत. शेतीत विचारपूर्वक बदल करायचे त्यांनी ठरवले. माळरान व खडकाळ जमीन, भौगोलिक हवामान या बाबींना अनुकूल पीकपद्धती निवडण्यास सुरुवात केली. अनुभवी व अभ्यासू व्यक्तींच्या सल्ल्याने फळबाग करण्याचा निर्णय घेतला. फळबागांचा विकास

  • पाटील यांनी फळबाग लागवडीला सात वर्षांपूर्वी पेरूपासून सुरुवात केली. सन २०१६ मध्ये ‘लखनौ ४९’ वाणाच्या पेरूची दोन एकरांवर लागवड केली. ॲपल बेर हे पाटील यांचे सध्याचे मुख्य पीक आहे. त्याच्या लागवडीपूर्वी सोलापूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत बोरांच्या बागेची पाहणी केली.
  • वाण निवडीबाबत ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून माहिती घेतली. त्यानुसार बाजारपेठेतील मागणी पाहून काश्मिरी ॲपल बोरांची निवड केली. सुरुवातीला ३०० रोपे पश्‍चिम बंगालमधून आणली.
  • ॲपल बेरचे तीन प्रकारचे वाण आहेत. पैकी २०१९ मध्ये पाच एकरांवर एक वाण,
  • २०२० मध्ये दुसरे वाण व तीन एकरांवर तिसरे वाण आहे. पहिल्या प्रकारातील वाणाचे फळ लांबट, दुसरे गोल, तर तिसरे बिनबियांचे (सीडलेस) आहे. तिन्ही वाणांचा रंग आकर्षक लालसर-भगवा आहे.
  • त्यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. पेरू व ॲपल बेरसोबत दोन वर्षांपूर्वी दोन एकरांत थाई काळ्या जांभूळ वाणाची लागवड केली आहे. यंदा दोन एकरांवर केसर आंबा व काश्मिरी ॲपल बेरमधील गोल वाणाच्या बोरांची एकत्रित लागवडही केली आहे. एकूण सुमारे सोळा एकरांपर्यंत फळबागेचा विस्तार करणारे पाटील या भागातील एकमेव शेतकरी असावेत. एकनाथ यांना वडिलांसह आई सुनीता, पत्नी संगीता यांचीही मोठी मदत होते.
  • व्यवस्थापनातील बाबी

  • बोरांना साधारण जानेवारी, फेब्रुवारीत मागणी असते. मात्र सर्वसाधारणपणे बहुतांश बोरांची आवक या काळात संपलेली असते. त्यामुळे या काळात आपली फळे विक्रीस येतील असे नियोजन करून बहर धरण्यात येतो. विक्री संपल्यानंतर पाणी बंद केले जाते. साधारणपणे जूनच्या सुरुवातीला छाटणी होते.
  • वीस वर्षांपासून ठिबक सिंचनाचा वापर होतो. छाटणी, काढणीसह विविध कामांसाठी साधारण सहा मजूर कायमस्वरूपी राबतात. सन २०१५ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने तीस गुंठे क्षेत्रावर शेततलाव उभारला आहे. दुष्काळाच्या तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबाग जगवण्यासाठी त्याची मदत होत आहे. वन्यजीवांचा होणारा त्रास कमी करण्याची बागेला बाजूने संरक्षण जाळी लावली आहे.
  • उत्पादन व विक्री

  • यंदा बोरांच्या उत्पादनाचे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी प्रति झाड सुमारे १५ किलो उत्पादन मिळाले.
  • पहिल्या वर्षी आठवडी बाजारात बसून सुमारे १० टन विक्री थेट ग्राहकांना केली. त्यास किलोला ५० ते ६० रुपये दर मिळाला. यंदा एकूण ४० टनांपर्यंत विक्री व्यापाऱ्यांना करण्यात आली आहे.
  • त्यास २५ ते ३० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. काही विक्री थेट झाली आहे. यंदा प्रति झाड ३० ते ४० किलो उत्पादन मिळत आहे. पेरूची स्थानिक व्यापारी व बाजारात विक्री होत आहे.
  • यंदा दोन एकरांत २५ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. त्यास प्रति किलोला १५ ते २५ रुपये दर मिळाला आहे.
  • पूरक उत्पन्न

  • ॲपल बेरच्या विविध प्रकारच्या वाणांना मागणी आहे. मात्र रोपे पुरेशी उपलब्ध होत नाहीत.
  • एकनाथ यांनी मात्र ही संधी ओळखून दोन वर्षांपासून रोपांची निर्मिती सुरू केली आहे. आतापर्यंत २० हजार रोपांची पाथर्डी, शेवगाव तालुक्यासह अन्य भागांत विक्री केली आहे.
  • बोराच्या झाडाची छाटणी एक फूट खाली बुंधा ठेवून केल्यास नव्याने फुटवे अधिक मिळतात.
  • जेवढे अधिक फुटवे येतील तेवढे उत्पादन येते. बोराच्या लाकडापासून कोळसा तयार करून तो विक्री करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नियमानुसार परवानगी घेण्याचा प्रयत्न आहे. दहा एकर बोर लाकडापासून दर वर्षाला २० ते ३० टनांपर्यंत कोळसा होऊ शकतो असा त्यांचा अंदाज आहे.
  • पाणी उपलब्ध असलेल्या भागात तीन एकर ऊस व अन्य पिकांतूनही पूरक उत्पन्न घेतले जाते.
  • संपर्क : एकनाथ पाटील, ८२०८९९९४०५ रावसाहेब पाटील, ७७२१८७७४१५

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com