अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी व्हायची. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिने कुटुंबाला सावरले. ‘बायफ’ संस्थेनेही मदतीचा हात दिला.पुढे कष्टातून जिरायती जमीन बागायती झाली. ही जिद्द अन संघर्षाची कथा आहे, वळवाडी (ता.मालेगाव,जि.नाशिक) येथील संगीता ज्ञानदेव पवार या सावित्रीची... पाऊस थांबला की, वर्षभर प्यायला पाणी नाही. पावसाच्या भरवशावर दोन एकर शेतात फक्त दोन-तीन पोती बाजरी पिकायची. त्यामुळे ज्ञानदेव निंबा पवार यांच्यावर मोलमजुरी करण्याची वेळ होती. एकीकडे कर्जाचा डोंगर वाढत गेला अन सोबतीला तणावही. या नैराश्यातून २०१४ साली त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे पत्नी संगीता यांच्या जीवनात मोठा आघात झाला. दोन मुली,एक मुलगा आणि ७५ वर्षांचे वृद्ध सासरे अशी जबाबदारी त्यांच्यावर आली. अशा संकटात पोट भरण्यासाठी रोजंदारी करत संसाराचा गाडा त्यांना ओढावा लागला; मात्र त्या खचल्या नाहीत. मिरची- भाकर खाऊन धैर्याने उभ्या राहिल्या. जीवनातील संघर्षाचा नवा अध्याय त्यांनीच उभा केला. ‘बायफ’ने दिला मदतीचा हात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि कुटुंबीयांना पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी माजी मंत्री वनाधिपती कै.विनायकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून २०१६ साली ‘बायफ’ संस्थेने ‘नवजीवन प्रकल्प’ राबविण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये संगीताताई मोल मजुरी करीत होत्या. वृद्ध सासरे,दोन मुली अन लहान मुलाचा सांभाळ करताना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्यांचे हालाखीचे जीवन समजल्यावर विनायकदादांनी थेट संगीताताईंचे घर गाठले. तेव्हा त्या दीड किलोमीटरवर डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. ही कठीण परिस्थिती पाहून ‘बायफ’ संस्थेने त्यांना प्राधान्याने शेतीमध्ये कूपनलिका करून देण्याचे ठरविले. यास चांगले पाणी लागल्याने त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. विनायकदादांनी लेकीची माया देऊन चांगले मार्गदर्शन केले. संगीताताईंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याने पावसाच्या पाण्यावर फक्त बाजरी पिकवणारे कुटुंब आज तूर, कांदा, मिरची यासह विविध नगदी पिके घेत आहेत. शेतीमध्ये झाल्या ‘कुशल’ २०१४ साली पतीच्या आत्महत्येनंतर संगिताताई रोजंदारीने काम करत होत्या.मुलेही सोबतीला असल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडू लागला. अवघे दिवसभर राबून शंभर रुपये मिळायचे. मे, २०१७ मध्ये ‘बायफ' संस्थेने कूपनलिकेसाठी मदत केल्यानंतर पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण झाला. संस्थेने शेतीविषयी मार्गदर्शन केल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला. विनायक दादा आणि ‘बायफ’ टीमचे मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे, प्रकल्प अधिकारी राहुल जाधव, आश्लेषा देव यांनी संगिताताईंच्या संपर्कात राहून मानसिक आधार देण्याचे काम केले. त्यामुळे फक्त जिरायती बाजरी पीक घेणाऱ्या संगीताताई त्याच शेतात बागायती नगदी पिके घेऊ लागल्या. आता रोजंदारी न करता वर्षभर हक्काचा रोजगार त्यांच्या शेतीमध्ये तयार झाला आहे. नगदी पिकातून उत्पन्न वाढ ‘बायफ’ संस्थेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार संगिताताईंनी विविध पिकांच्या लागवडीला सुरुवात केली. खरीपात बाजरी, मका, कांदा, मिरची तसेच ऑक्टोबरमध्ये तूर लागवड आणि रब्बी हंगामात पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू, हरबरा लागवड सुरू झाली. पीक फेरपालट करून उपलब्ध भांडवलाप्रमाणे सुधारित तंत्राने नगदी पिकांची लागवड होऊ लागली. यंदा त्यांनी मिरची लागवडीमध्ये प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग केला आहे.कीडनाशक फवारणी, तण व्यवस्थापन, अशी सर्व कामे संगीताताई स्वतः करतात. सुरत बाजारात हिरव्या ओल्या तुरीला मागणी असल्याने संगिताताई दरवर्षी एक एकरावर ऑक्टोबरमध्ये तूर लागवड करतात. तज्ज्ञांच्या सल्याने पीक व्यवस्थापन ठेवले जाते. एक तोड्याला २ ते ३ क्विंटल असे सहा तोडे होतात. साधारणपणे १२ क्विंटलच्या जवळपास उत्पादन मिळते. हिरव्या तुरीच्या शेंगांना प्रति किलो ५० ते ६० रुपये किलो दर मिळतो. यात चढ उतार होतात. लागवड, कीडनाशके,मजुरीचा खर्च वजा जाता २५ ते ३० हजार हक्काचे उत्पन्न मिळते. गेल्यावर्षी बुरशीजन्य रोगामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. तरीही २३ हजार रुपये पदरी पडले. कष्टातून आर्थिक प्रगती सुरुवातीला रोजंदारी करताना संगिताताईंनी एकावेळी कधी हजार रुपये पाहिले नव्हते. पहिल्यांदा २०१८ साली तुरीच्या हिरव्या शेंगांचे उत्पादन घेतल्यानंतर पहिल्या तोड्याच्या विक्रीत ९ हजार ६० रुपये हाती आले. एवढी मोठी रक्कम पहिल्यांदा पाहिल्याचे त्या सांगतात. बाजारपेठ आणि हंगामानुसार पीक नियोजन करून वडनेर खाकुर्डी येथील स्थानिक बाजारात भाजीपाला विक्री केली जाते. शेती व्यवहार कळू लागल्याने हजारात येणारे उत्पन्न लाखापर्यंत गेले आहे. शेती उत्पादनाचा जमाखर्च संगीताताई स्वतः पाहतात. मागील वर्षी २५ हजाराची मिरची, २२ हजाराची तूर, २३ हजाराचे खरीप पोळ कांदे असे उत्पन्न हाती आले. यासह भूसारचे उत्पन्न मिळते. यंदाच्या वर्षी मका,बाजरी, पाऊण एकरावर कांदा व मिरची लागवड आहे. याचबरोबरीने भेंडी, वांगी लागवडीचे नियोजन असते. मुली शिक्षित असल्याने जमा खर्च, पिकांना वापरलेली कीडनाशके, कामकाजाच्या नोंदी त्या ठेवतात. स्वप्नांना पाठबळाची गरज: मुलांचे छत्र हरपले, त्यामुळे त्यांच्या जीवनात पुढे कष्टप्रद प्रवास नको. त्यांचे भविष्य सुरक्षित होण्यासाठी मेहनतीने कमवलेल्या एक-एक पैशाचा विनियोग मुलांच्या भविष्यासाठी संगिताताई करत आहेत. मोठी मुलगी दिपाली सध्या प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेणार आहे. तिला पोलीस अधिकारी व्हायचं आहे. मात्र तिच्या पंखात बळ भरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. लहान मुलगी प्रतीक्षा नववी आणि मुलगा गौरव सातवीत आहे. अनंत संकटे असूनही लेकींचे भविष्य घडविण्यासाठी राबणारी ही 'सावित्री' आदर्श आहे. उच्च शिक्षणाचा खर्च वाढत असल्याने मुलींच्या शिक्षणासाठी अडचणी येत आहेत. समाजाने शेतीमध्ये स्वप्न पाहणाऱ्या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असल्याचे त्या आवर्जून आवाहन करतात. दिवस रात्र राबणार;पण लेकीला फौजदार करणारच! माझ्या लेकींचा बाप गेला. त्यामुळे त्या पोरक्या झाल्या. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार आहे. त्या दोघी कष्ट करतात, शेतीत मदत करतात. मुली समजूतदार झाल्या आहेत. त्यांना वडिलांच्या मरणाचे वाईट वाटते. त्यामुळे त्यांचे नाव मोठं करणार असल्याचे मुली सांगतात. ‘ दिवसरात्र शेतीत राबणार, अनं मी लेकीला फौजदार करणारच', असा निर्धार संगीताताईंनी केला आहे. ‘‘शेतात खाण्यापुरती बाजरी व्हायची. पिण्यासाठी पाणी नव्हते अन रोजगारासाठी भटकावे लागे.कूपनलिकेची सोय झाल्यापासून शेती बागायती झाली. येणाऱ्या उत्पन्नातून मुलांचे शिक्षण आणि वृद्ध सासऱ्यांचा दवाखाना करत आहे. पाण्यामुळे आता वर्षभर स्वतःच्या शेतामध्येच रोजगाराची सोय झाली आहे.‘‘ - संगीता पवार, ९०२१५६८६५४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.