शेतीपूरक, प्रक्रिया उद्योगांना ‘संस्कृति’ची साथ

सगरोळी (जि. नांदेड) येथील संस्कृतिसंवर्धन मंडळाने ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी शेतीपूरक उद्योग, गारमेंट उद्योग तसेच शेतीमाल प्रक्रिया उद्योगांना चालना दिली. यातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागल्या आहेत.
Availability of employment to women through Tejaswini Garment Center
Availability of employment to women through Tejaswini Garment Center

सगरोळी (जि. नांदेड) येथील संस्कृतिसंवर्धन मंडळ हे ६१ वर्षांपासून शिक्षण, कृषी, महिला सबलीकरण, आरोग्य इत्यादी क्षेत्रांत कार्यरत आहे. या मंडळाने ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी शेतीपूरक उद्योग, गारमेंट उद्योग तसेच शेतीमाल प्रक्रिया उद्योगांना चालना दिली. यातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागल्या आहेत. सगरोळी (ता.बिलोली,जि.नांदेड) हे महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर वसलेले गाव. या गावातील महिला शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सगरोळी येथील संस्कृतिसंवर्धन मंडळाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. हे मंडळ ६१ वर्षांपासून शिक्षण, कृषी, नैसर्गिक साधन संपत्ती विकास, महिला सबलीकरण, आरोग्य इत्यादी क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेतील विविध विभागांमार्फत आजपर्यंत सुमारे चारशेहून अधिक महिला बचत गटांची बांधणी करण्यात आली. संस्थेमधील कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान विभागामार्फत बचत गटांतील महिलांना आहार व आरोग्य, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि उपजीविकेच्या विविध उद्योगाद्वारे आर्थिक प्रगतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते. याचबरोबरीने शिवणकाम, अन्नप्रक्रिया, डाळ मिल, तसेच अनेक गृहउद्योगांबाबत प्रशिक्षण दिले जाते. प्रक्रिया उद्योगाचे नोंदणीकरण, उत्पादनांचे पॅकिंग, लेबलिंग आणि विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन मिळते. प्रशिक्षणाचा कालावधी सात दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंतचा असतो. या माध्यमातून सगरोळी परिसरात अनेक छोटे पूरक उद्योग सुरू झाले आहेत. तेजस्विनी सीएफसी गारमेंट सेंटर  कृषी विज्ञान केंद्रातर्फे कापडी बॅग उत्पादनांबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यातूनच २०१५ मध्ये शांता गंगासागरे, सुनीता कोलनुरे, मोसिना कोरबो आणि सुषमा मुत्तेपोड यांनी प्रगती टेक्स्टाइल उद्योगाची सुरूवात केली. बाजारपेठेच्या मागणीनुसार या ठिकाणी कापडी बॅग, कापूस वेचणी कोट, सोयाबीन कापणी हातमोजे, किचन ॲप्रन, सन कोट, साडी पेटीकोट आणि शाळेचे युनिफॉर्म शिवून दिले जातात. शिवणकलेबाबत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी शिवणकामातून खर्च वजा जाता दोन लाखांची उलाढाल होते. संस्थेच्या कार्याची दाखल घेऊन जिल्हा मानव विकास मिशन आणि महिला आर्थिक विकास महामंडळाने सहकार्य केले. बचत गटातील महिलांना आर्थिक फायदा होण्यासाठी तेजस्विनी सीएफसी गारमेंट सेंटर स्थापन करण्यात आले. याचे उद्‍घाटन जून महिन्यात नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते झाले. या युनिटमध्ये अत्याधुनिक २२ इलेक्ट्रिक शिलाई यंत्र, चार ओव्हर लॉक यंत्र, काच बटण यंत्र, कटिंग यंत्र, प्रिंटिंग यंत्रणा, तसेच इतर अत्यावश्यक साहित्य उपलब्ध आहे. सध्या तीस महिला तेजस्विनी गारमेंट सेंटरमध्ये कार्यरत आहेत. या तीस महिलांपैकी एक अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक आणि इतर सदस्य अशी महिलांद्वारे निवड करण्यात आली. बचत गटातील महिला सगरोळी व परिसरातील अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गणवेष शिवण्याचे काम नियमित करीत असतात. या महिलांना आधुनिक यंत्रणा मिळाल्याने उत्पादनांच्या निर्मितीचा वेग वाढला आहे. शिवणकामामुळे महिलांना वर्षभर रोजगार मिळतो आहे. कापूस वेचणी कोट, सोयाबीन कापणी हातमोजे निर्मिती  मागील वर्षी कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत महिलांनी दोन हजार कापूस वेचणी कोट आणि दोन हजार सोयाबीन कापणी हातमोजे जोड शिवून मराठवाडा व विदर्भातील कृषी विभागाला यशस्वी पुरवठा केला. या शिलाई कामामधून महिलांना २ लाख २५ हजार रुपयांचा फायदा झाला. आर्थिक मिळकत झाल्याने महिलांमधील आत्मविश्‍वास वाढला. आता महिलांनी प्रगती टेक्स्टाइल हे युनिट तेजस्विनी गारमेंट सेंटरमध्ये समाविष्ट केले आहे. येत्या काळात शाळेचे गणवेश, कापूस वेचणी कोट, सोयाबीन हातमोजे, विविध प्रकारच्या कापडी बॅग, रजई, शर्ट या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणार आहेत. तेजस्विनी गारमेंट सेंटरमुळे झालेल्या फायद्याबाबत शांता गंगासागरे (सचिव) आणि कल्पना जाधव (सदस्या) म्हणाल्या, की या सेंटरच्या स्थापनेमुळे गावातील अनेक महिलांचा फायदा झाला. एकत्रित काम करण्यामुळे शिवणकामातील विविध गोष्टी शिकायला मिळाल्याने आर्थिक प्रगती होऊ लागली आहे. अन्नपूर्णा महिला गृह उद्योग  आर्थिक चणचण, काळाची गरज, आणि काम करण्याची इच्छा असणाऱ्या गंगामनी श्रीकंठवार, गौरी पवार, शकुंतला उस्केलवार आणि सावित्रा कुंभारे एकत्र आल्या. गंगामनी, गौरी आणि शकुंतला या बालवाडी शिक्षिका आहेत. मागील वर्षीपासून कोरोनाच्या प्रसारामुळे यांचे आर्थिक गणित कोलमडले. या संकटावर मात करण्यासाठी त्यांना घरगुती स्तरावर पूरक उद्योग करायचा होता. यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील गृह विज्ञान विभागाला भेट देऊन तज्ज्ञांशी चर्चा केली. संस्थेच्या इंब्रेस प्रकल्पातून आर्थिक मदत मिळाली. डॉ. माधुरी रेवणवार यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी मसालानिर्मितीसाठी यंत्रणा खरेदी केली. ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून अन्नपूर्णा गृह उद्योगाला सुरुवात केली. यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि उपवासासाठी लागणाऱ्या पिठांची निर्मिती केली जाते. येत्या काळात ब्रॅन्डनेमने या महिला उत्पादनांची विक्री करणार आहेत. दूध संकलन केंद्राला सुरुवात  महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध व्हावा तसेच परिसरातील ग्राहकांना पुरेशा प्रमाणात दुधाची उपलब्धता होण्यासाठी संस्थेने सगरोळी परिसरातील अनेक महिलांना पशुपालन व्यवसायाबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची सोय केली. या माध्यमातून गावशिवारातील महिलांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाला सुरू केले. विविध ठिकाणी उत्पादित दुधाचे संकलन आणि वाटप सोपे होण्यासाठी संस्थेने पुढाकार घेऊन केशव दूध संकलन केंद्राची स्थापना झाली. या संकलन केंद्रामार्फत गावातील पशुपालकांकडून दुधाची खरेदी केली जाते. केंद्रामुळे दूध विक्री सुलभ झाली, खात्रीशीर उत्पन्नाचे साधन मिळाले. दूध संकलन केंद्रामुळे झालेल्या फायद्याबाबत संगीता पारटवाड म्हणाल्या, की मी व माझा नवरा शेत मजूर म्हणून काम करतो. आमची मुले मोठी झाल्याने आर्थिक गरजा वाढल्या. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी संस्थेच्या मदतीने एक म्हैस घेतली. शेतमजुरी करत मी म्हैसपालन करत आहे. सध्या दररोज सात लिटर दुग्धोत्पादन होते. त्याची आम्ही विक्री करतो. यातून आमची दरमहा तीन हजार रुपयांनी मिळकत वाढली. संपर्क ; डॉ. माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४ (विषय विशेषज्ज्ञ (गृह विज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com