

सोलापूर जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी गुलाबाचे फुललेले मळे पाहण्यास मिळतात. दररोज ताजे उत्पन्न देणाऱ्या या गुलाबावर गावातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. गावात सुमारे सव्वाशेहून अधिक एकरांवर गुलाबशेती असावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ गुलाब घेणारे वडजी हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.. सोलापूर- हैदराबाद महामार्गावर दहिटणेपासून आत १० किलोमीटरवर वडजी (ता. दक्षिण सोलापूर) हे अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे. सोलापूर शहराची बाजारपेठ हाकेच्या अंतरावर असल्यानं भाजीपाला, कांदा अशी पिके जास्त प्रमाणात होतात. एकेकाळी पडवळासाठी गाव प्रसिद्ध होते. परंतु अलीकडील आठ-दहा वर्षांत बाजारपेठेचं गणित बदललं. भाजीपाला- फळभाज्यांच्या दरांतील चढ-उतारामुळे वडजीतील शेतकरी गुलाब, झेंडू, शेवंती यासारख्या फुलशेतीकडे वळले. शिवारात छोट्या- छोट्या बागांमधून लालचुटूक, पाकळ्या पसरून फुललेली देखणी गुलाब फुले आपले लक्ष वेधून घेतात. परिसरातील पिंजारवाडी, तांदूळवाडी या गावांतही फुलशेती चांगलीच वाढली आहे. वर्षभर मार्केटमध्ये चालेल या पद्धतीने ही शेती होते. वडजीत सुमारे सव्वाशे एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र या पिकाखाली असावे. बहुतांश शेतकरी दसरा, दिवाळीसाठी उपलब्ध होईल या पद्धतीने झेंडू लागवडही करतात. सुमारे ५० एकर त्याचे क्षेत्र असावे. गुलाब काड्यांची उपलब्धता गावात केवळ देशी गुलाबाचे उत्पादन घेतले जाते हे मुख्य वैशिष्ट्य. हा गुलाब सुगंधी आणि अधिक देखणा आहे. त्याची टिकवणक्षमता चांगली आहे. हारांमध्येही त्याचा वापर अधिक होतो. लागवडीसाठी बाहेरून रोपे वा काड्या न आणता गावातीलच शेतकरीच एकमेकांना देवाणघेवाण करतात. सहा इंचांची काडी असून, दोन ओळींत पाच- सहा फूट अंतर आणि दोन रोपांत अर्धा फूट अंतर ठेवून लागवड होते. कीडनाशकांच्या किरकोळ फवारण्या वगळल्या तर बाकी मोठा कोणता खर्च करावा लागत नाही. उत्पादन वर्षभर कमी जास्त प्रमाणात सुरू राहतंच. शिवाय ‘हार्ड प्रूनिंग’ करून पुढील सहा ते सात वर्षे प्लॉट सुरू राहतो. किमान अर्धा एकर लागवड गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आणि पुढे लग्नसराई आदी काळात गुलाबाला चांगला उठाव मिळतो. तोडणी रोजच्या रोज आणि पहाटे करावी लागते. मजुरांच्या भरवशावर ते शक्य होत नाही. त्यामुळे घरच्या घरी काढणी सोपी जावी या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्याकडे मर्यादित अर्धा एकर ते एक एकर क्षेत्र असते. गुलाबावरच अर्थकारण गावापासून अवघ्या १०-१२ किलोमीटरवर सोलापूर बाजार समिती आहे. पहाटे तोडणी केलेला गुलाब सकाळी सातच्या सुमारास घरातील एक सदस्य विक्रीसाठी या बाजारात घेऊन येतो. तास-दोन तासांत लिलाव होतात. रोखपट्टी घेऊन शेतकरी माघारी परततो. त्यामुळे दररोज ताजा पैसा हाती येतो. घरखर्चासह शेतीतील अन्य खर्च अर्धा वा एकर एकर शेतीतून भागविणे शक्य होते. दररोज २० किलोपासून ते ३०, ४० किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते. वर्षभराचा हिशेब पकडला तरी प्रति किलो १०, १५ रुपयांपासून सरासरी ३० रुपये व सणासुदीच्या काळात कमाल दर १०० ते १५० रुपयांवरही जातो. एकरी सव्वा लाखापासून ते दीड, दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती येते. गावातील क्षेत्र व शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता या फुलपिकातून किमान एक कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल होत असावी हे निश्चित आहे. शेतकरी कंपनीद्वारे गुलाबाचे मूल्यवर्धन गुलाबाच्या दरांमध्ये वर्षभरात चढ-उतार असतात. अनेकवेळा दरांत मोठी घसरण होते ही बाब लक्षात घेऊन गावातील परमेश्वर कुंभार आणि सहकाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी गुलाब उत्पादकांची ‘खंडोबा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली. त्याचे ३५० सभासद आहेत. या माध्यमातून गुलकंद आणि गुलाबजल उत्पादन सुरु केले आहे. दर पडतात त्यावेळी कंपनी शेतकऱ्यांकडून २० रुपये प्रति किलो दराने गुलाब खरेदी करते. त्यामुळे बाजारावर विसंबून न राहता या कंपनीचा खात्रीशीर, विश्वासार्ह आधार शेतकऱ्यांना मिळाला आहे. प्रतिक्रिया शेतकरी कंपनीमुळे गावातील शेतकऱ्यांना गुलाबविक्रीची समस्या उरलेली नाही. त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही अशी काळजी आम्ही घेतो. बिगरहंगामी किंवा बाजारातील पडत्या काळात मोठा आधार आम्ही देतो. भविष्यात गुलाबावर आधारित आणखी काही उत्पादने वाढवता येईल का याचा विचार करतो आहोत. - परमेश्वर कुंभार, अध्यक्ष, खंडोबा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी माझी तीन एकर शेती आहे. पैकी २० गुंठ्यांत गुलाबशेती आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून गुलाबशेतीचा अनुभव घेतो आहे. चार दुभती जनावरे सांभाळून जेवढे उत्पन्न मिळते तेवढी कमाई या फुलशेतीतून मिळवणे शक्य होते. शिवाय दररोज रोख पैसे मिळत असल्याने रोजच्या खर्चासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. - रमेश म्हेत्रे माझी दोन एकर गुलाबशेती आहे. आठ ते दहा वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले आहे. फळे-भाजीपाला उत्पादन, त्यांचा उत्पादन खर्च आणि मिळणारे दर या अर्थकारणाचा विचार केल्यास गुलाबशेती किफायतशीर असल्याचे अनुभवास आले आहे. - कुंडलिक कुंभार - परमेश्वर कुंभार ८७८८३७३५०३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.