पवारवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील रंजना वसंतराव भोसले यांनी जिद्द आणि शेती विकासाचे ध्येय ठेवून ऊस शेतीच्या बरोबरीने डाळिंब फळबाग, शेततळ्यातील मत्स्यशेतीदेखील यशस्वी केली. रंजनाताई गेली ३१ वर्षे शेती नियोजनात रमल्या आहेत. महिला शेतकऱ्यांसाठी त्यांनी तीन शेतकरी गटांची स्थापना केली आहे. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील साप आणि पवारवाडी गावशिवारातील प्रयोगशील महिला शेतकरी म्हणून रंजना वसंतराव भोसले यांची ओळख तयार झाली आहे. त्यांचे माहेर मुंबई, त्यामुळे शेतीची पार्श्वभूमी नव्हतीच. साप येथील वसंतराव भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यावर त्यांचा ग्रामीण भाग आणि शेतीशी सतत संपर्क येऊ लागला. पवारवाडी येथे भोसले कुटुंबांची २२ एकर कोरडवाहू शेती आहे. वसंतराव हे नोकरी करत असल्याने शेतीची जबाबदारी रंजनाताईंकडे आली. पतीच्या मार्गदर्शनानुसार रंजनाताईंनी शेती नियोजन सुरू केले. कोरडवाहू शेती असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाच्या पाण्यावर केवळ दोन एकरावर खरीप, रब्बी ज्वारी लागवडीवर भर असायचा. आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने त्यांनी शेती बागायती करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले. डोंगराळ जमिनीचे सपाटीकरण केले, शेतात विहिरीची खोदाई केली, परंतु खूप कमी पाणी लागले. त्यानंतर काही वर्षांनी दुसरी विहीर खोदली. या विहिरीस पाणी लागले, परंतु ते मार्च- एप्रिल महिन्यात संपायचे. अशा परिस्थितीत पीक नियोजन करत काही वर्षांनी शेतामध्ये तिसरी विहीर खोदली. याला मात्र चांगले पाणी लागल्याने शेती बागायती होण्यास सुरुवात झाली. रंजनाताईंनी मग पारंपरिक पीक पद्धती ऐवजी सुधारित तंत्राने शेती नियोजनाला सुरुवात केली. बागायत शेतीच्या दिशेने विहिरीला पुरेसे पाणी लागल्यामुळे रंजनाताईंनी बागायती पिकांच्या लागवडीचा निर्णय घेतला. शेतीची नव्याने आखणी करून सर्व शेतात पाइपलाइन केली. परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने ऊस, आले लागवडीचे नियोजन केले. या पिकांच्या बरोबरीने बाजारपेठेचा अभ्यासकरून भोपळा, कलिंगड लागवडीस सुरुवात केली. योग्य आर्थिक नियोजन करून टप्प्याटप्प्याने त्यांनी सर्व शेती लागवडीखाली आणली. ऊस उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण लागवड क्षेत्र जास्त असल्याने रंजनाताईंनी नियोजनाला सोपे जाण्यासाठी पहिल्यांदा ऊस लागवडीवर भर दिला. उसाचे उत्पादन वाढीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनुसार सुधारित पद्धतीने ऊस लागवडीस सुरुवात केली. सरीचे अंतर साडे चार फूट ठेवत को-८६०३२, ६७१ या ऊस जातींचे दर्जेदार बेणे त्याचबरोबरीने रोप पद्धतीने लागवडीचे तंत्र त्यांनी स्वीकारले. सध्या दहा एकरांवर ऊस लागवड आहे. रंजनाताई गेल्या २८ वर्षांपासून पाचट न जाळता उसाच्या सरीत आच्छादन करतात. उसाला वरून खते न देता पहारीच्या साह्याने दिली जातात. पिकाला माती परीक्षणानुसार खत मात्रा, गरजेनुसार पाणी नियोजन, पाचट आच्छादन आणि जमिनीची सुपीकता जपत त्यांनी गेल्या दहा वर्षांत एकरी ४० टनांवरून १०० टनांचे उद्दिष्ट गाठले आहे. २०१७-१८ मध्ये को-८६०३२ जातीचा एकरी १२५.८७८ टन ऊस उत्पादनाचा टप्पा गाठला होता. शेततळ्यामध्ये मत्स्यशेती संपूर्ण शेतीला शाश्वत सिंचन आणि पूरक उद्योग म्हणून मत्स्यशेती करता यावी यासाठी रंजनाताईंनी कृषी विभागाच्या योजनेतून २०१७ मध्ये १२५ फूट बाय २५० फूट बाय ४० फूट खोलीचे शेततळे खोदले. या शेततळ्याची दोन कोटी लिटर पाणी साठवणक्षमता आहे. शेततळे हे शेताच्या उंच भागात खोदले असल्याने संपूर्ण शेतीला सायफन पद्धतीने पाणी देता येते. यामुळे विजेचा खर्च कमी झाला. वीज नसतानादेखील पिकाच्या गरजेनुसार पाणी देता येत आहे. मागील दोन वर्षे रंजनाताईंनी शेततळ्यात मत्स्यपालन केले. शेततळ्यात रोहू, कटला, मृगळ या जातींचे दहा हजार मत्सबीज सोडले. या शेततळ्यातून भांडवली खर्च वगळता ८० हजारांचे उत्पन्न मत्स्यशेतीमधून मिळाले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठ विस्कळीत झाल्याने मत्स्यबीज सोडलेले नाही. शेती व्यवस्थापनाची सूत्रे
डाळिंब लागवडीला प्राधान्य ऊस, आले आदी पिकांबरोबर रंजनाताईंनी फळबाग लागवडीवर भर दिला आहे. २०१४-१५ मध्ये त्यांनी पाच एकर क्षेत्रावर डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. लागवडीपासून तीन वर्षांनी बहर धरण्यास सुरुवात केली. मागील तीन वर्षांपासून डाळिंबाचे चांगले उत्पादन सुरू झाले. २०१८-१९ मध्ये ५५ टन उत्पादन मिळाले. या वेळी सरासरी ५० ते ५५ रुपये किलो दर मिळाला. डाळिंब बागेमध्ये काटेकोर खत आणि पाणी व्यवस्थापन तसेच जमिनीची सुपीकता जपत उत्पादनाचा आलेख त्यांनी वाढता ठेवला आहे. शेतीच्या व्यवस्थापनात रंजनाताईंना पती वसंaतराव तसेच बंधू तानाजी पवार यांचे मार्गदर्शन मिळते. तसेच मुलगा अजिंक्य, अक्षय हे देखील मदत करतात. शेती तंत्रज्ञानासाठी सातारा जिल्हा बॅंकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, कृषी विभागातील सुनील यादव, सुजित शिंदे, वैशाली सुतार, सुरेखा पवार यांचे मार्गदर्शन मिळते. पुरस्कार आणि सन्मान
- रंजना भोसले ९६३७६१६८७६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.