पॅंगासिअस जातींच्या माशांचे शेततळ्यात संगोपन

दुधड (ता. जि. औरंगाबाद) येथील साईनाथ चौधरी यांनी डाळिंब व पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची शेती करताना सिंचनासाठी शेततळ्याचा पर्याय वापरला आहे.
Shainath Chaudhary's rearing of pangasius fish in the farm.
Shainath Chaudhary's rearing of pangasius fish in the farm.

दुधड (ता. जि. औरंगाबाद) येथील साईनाथ चौधरी यांनी डाळिंब व पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची शेती करताना सिंचनासाठी शेततळ्याचा पर्याय वापरला आहे. त्यातही पॅंगासिअस जातीच्या माशांचे संगोपन व थेट ग्राहक विक्री करून त्यांनी पीक उत्पन्नासोबत पूरक उत्पन्नाचा सक्षम पर्याय शोधला आहे.  मराठवाड्यामध्ये शेततळ्यांमध्ये रोहू, कटला, मृगल, सायपरनस आदी जातींच्या माशांचे संगोपन अनेक शेतकरी करतात. दुधड (ता. जि. औरंगाबाद) येथील साईनाथ चौधरी यांनी मात्र पॅंगासिअस जातीच्या माशाची निवड करून सुमारे तीन वर्षांपासून शेततळ्यात त्याचे संगोपन सुरू केले आहे. बी.ई.(मेकॅनिकल)ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी खासगी कंपनीत सहा वर्षे नोकरी केली. परंतु त्यात त ते रमले नाहीत. नोकरी सोडून  शेतीमध्ये उतरले. त्यांची पाच एकर शेती आहे. यात दोन एकरांवर डाळिंब व अर्धा एकरांत पॉलिहाऊस आहे. त्यात ते डच गुलाब घेतात. मत्स्यपालनाच्या क्षेत्रात चौधरी उतरले ते त्यांच्या आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात असलेल्या मित्रामुळे.  शिक्षण घेत असताना दोघे मित्र बरोबर होते. कृष्णा जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या शेततळ्यांमध्ये विविध जातींच्या माशाचे संगोपन केले जाते. नोकरी सोडल्यानंतर चौधरी आपल्या मित्राकडे गेले. तेथे मत्स्यपालनाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता आला. घरी परतल्यानंतर आपले सीए मित्र सूरज राऊत यांच्याशी एकत्र भागीदारी करून दोन शेततळ्यांमध्ये मत्स्यपालनास सुरवात केली. पॅंगासिअस माशांविषयी  हा मासा मूळ दक्षिण आशियातील असल्याचे समजले जाते. गोड्या पाण्यात संगोपन केली जाणारी ही जात आहे. या माशाचे वजन झपाट्याने वाढत असते. चांगले व्यवस्थापन ठेवल्यास सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीत एक ते सव्वा किलो त्याचे वजन होऊ शकते. देशात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये त्याचे उत्पादन घेतले जाते. या माशाला काटे अत्यंत कमी असल्याने त्याचे तुकडे बनवणे व तो खाणे सुकर असते. या कारणामुळे त्याला बाजारात चांगली मागणी असते. साहजिकच प्रक्रिया उद्योगातही त्याचा वापर जास्त होतो. अन्य माशांच्या तुलनेत त्याच्यात रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे. त्याच्या त्वचेवर खवले नसतात. डोके छोटे, तोंड व डोळे मोठे असते. पाठीवर काळ्या रेषा असतात. खालील भाग चांदीप्रमाणे चमकदार असतो. शरीर लांब असते. कॅट फीश वर्गात हा मासा मोडतो. कारण त्याच्या डोक्यावर चार मिशा असतात.  मत्स्यपालनातील बाबी   चौधरी व मित्र मिळून २४ बाय २४ बाय ९ मीटर आकारमानाच्या एका व अन्य दुसऱ्या शेततळ्यात माशांचे संगोपन करतात. पहिले उत्पादन वा बॅच संपली की पुढील वर्षासाठी शेततळ्यामध्ये नवे मत्स्यबीज सोडले जाते. चौधरी सांगतात, की अडीच ते तीन इंच लांबीचे मत्स्यबीज पश्चिम बंगालहून आंध्रमध्ये येते. तेथून ते मागवतो. विमानामार्गे थेट मागवण्यापेक्षा अशा महामार्गाद्वारे ते किंमतीला स्वस्त मिळते. ‘ऑर्डर’ देताना ७० टक्के व मत्स्यबीज मिळाल्यानंतर उर्वरित ३० टक्के रक्कम पुरवठादाराला दिली जाते. एका वेळेस प्रति शेततळे १० हजार बीजे सोडण्यात येतात. मासा १०० ग्रॅमचा होईपर्यंत पाण्याच्या पृष्ठभागावर ‘बर्डनेट’ अंथरावी लागते.  खाद्य व्यवस्थापन  प्रथिनांचे जास्त प्रमाण असलेले व पाण्यावर तरंगणारे खाद्य दिवसातून दोन वेळा द्यावे लागते. विविध कंपन्या खाद्याची निर्मिती करतात. पाण्यात बुडणारे खाद्य दिले तर ते शेततळ्याच्या तळापर्यंत जाते व ते उपलब्ध होण्यात अडचणी येतात. पाण्यात सूर्यप्रकाश जिथेपर्यंत जातो त्या भागात या माशांचा वावर असतो. तळाला गेलेले खाद्य कुजल्यानंतर अमोनिया तयार होतो व तो माशांस मारक असतो. खाद्य किती द्यायचे व त्याचे आकारमान किती असायला हवे हे माशांच्या वजनावरुन ठरले जाते. जेव्हा मत्स्यबीज पाण्यात सोडले जाते तेव्हा दीड मिमी आकारमानाचे  खाद्य मत्स्यबीज वजनाच्या सहा टक्के द्यावे लागते. १५ दिवसांनी दोन मिमी. आकारमामनाचे खाद्य माशाच्या वजनाच्या ४ टक्के दिले जाते. अशा प्रकारे पुढील खाद्य नियोजन देखील होते. मत्स्यपालनामध्ये सर्वात जास्त खर्च खाद्यावर होतो.  रोगनिदान व उपचार जिवाणूंमुळे माशास रोग होतात. पाठीवरील काळ्या भागात पांढरे ठिपके व खालील चंदेरी भागावर लाल ठिपके येतात. काही वेळेस मासे उलटे पोहतात. ताप आल्याचे हे लक्षण आहे. माशांना अपचनाचा त्रास झाला तर  दिलेले अन्न ते पूर्णपणे खात नाहीत. हे आजार दूषित पाण्यामुळे होतात व त्यावर औषधेही उपलब्ध आहेत.  पाण्यातील प्राणवायू या माशाला अन्य माशाच्या तुलनेने पाण्यामध्ये मिसळलेला प्राणवायू कमी असला तरी चालतो. जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा पाण्यामधील प्राणवायूची पातळी चांगली असते. रात्री दोननंतर ते सकाळी सूर्य उगवेपर्यंत पाण्यातील प्राणवायूची पातळी कमी झालेली असते. अशा वेळी  पॅंगासिअस मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वास घेऊन पाण्यामध्ये जातात. यामुळेच रात्रीच्या वेळी पाण्याच्या वरती येऊन खाली जाण्याचा त्यांचा सतत आवाज येतो. पाण्याची गुणवत्ता  चौधरी सांगतात की या माशाच्या चांगल्या वाढीसाठी विशिष्ट गुणवत्तेचे पाणी लागते. पाण्याचा पीएच ७ ते ८ दरम्यान असावा लागतो. तो नऊच्या पुढे गेल्यास उत्पादनात घट येऊ शकते. पाण्यातील नायट्रेट व नायट्राईटची पातळी दोन पीपीएमपर्यंत असावी लागते. पाण्यात अमोनिया अजिबात नसावा. पाण्याचे गुणधर्म बदलले की मासे खाणे बंद करतात. त्याचा वाढीवर विपरीत परिणाम होतो. साठलेल्या पाण्याचा पीएच सतत वाढत असतो. योग्य रसायनांचा वापर करून तो कमी करता येतो. पाण्याचे गुणधर्म तपासणीसाठी सुमारे तीनहजार रुपये किमतीचे ‘फ्रेश वॉटर टेस्टिंग कीट’ मिळते.   उत्पादन व विक्री सुमारे नऊ महिन्यापर्यंत माशांचे वजन एक किलोच्या आसपास होते. पहिल्या वर्षी पुरेसा अनुभव नसल्याने नुकसान झाले. मागील वर्षी व यंदा उत्पादन व उत्पन्नही चांगले मिळत आहे. व्यापाऱ्यांना मासे दिल्यास किलोला ७० ते ८० रुपये दर मिळतो. त्याऐवजी एक व्यक्ती नेमून ‘एमआयडीसी’ परिसरात थेट ग्राहकांना विक्री केली जात आहे. त्यास १८० ते २०० रुपये प्रति किलो दर मिळतो आहे. चौधरी सांगतात की या माशाचे संगोपन अन्य माशांच्या तुलनेने खर्चिक आहे. थेट विक्री केली तरच यात नफ्याचे प्रमाण वाढते. मात्र डाळिंब व डच गुलाबांची शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यांच्यासाठी असलेल्या शेततळ्याद्वारे पूरक उत्पन्न माशांमधून घेत आहे. त्यांचे चांगले व्यवस्थापन केल्यास व विक्रीचे नियोजन केल्यास कोणत्याही माशांच्या संगोपनातून ५० हजारांपुढे उत्पन्न वर्षभरात मिळू शकते.   - साईनाथ चौधरी  ७३८७२००९५०  (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com