देगलूर भागात दरवळतोय धन्याचा सुगंध

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका धने लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. देशी जातीचे बियाणे असल्याने त्याला वेगळा सुगंध आहे. साहजिकच त्याला मागणी चांगली आहे. नजीकची धर्माबाद येथील बाजारपेठ त्यासाठी ओळखली जाते. परराज्यांतील व्यापारीदेखील येथे खरेदीसाठी येतात.
देगलूर (नांदेड) भागात विलास यालावार यांचे फुलांवर आलेले धन्याचे पीक.
देगलूर (नांदेड) भागात विलास यालावार यांचे फुलांवर आलेले धन्याचे पीक.
Published on
Updated on

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका धने लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. देशी जातीचे बियाणे असल्याने त्याला वेगळा सुगंध आहे. साहजिकच त्याला मागणी चांगली आहे. नजीकची धर्माबाद येथील बाजारपेठ त्यासाठी ओळखली जाते. परराज्यांतील व्यापारीदेखील येथे खरेदीसाठी येतात. अलीकडील वर्षात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी धने (कोथिंबीर) शेतीला आपलेसे केले आहे. महाराष्ट्र, तेलंगण व कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर हा तालुका येतो. तालुक्यात वार्षिक सरासरी ८७५ मिलिमीटर पाऊस पडतो. खरिपात मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस तर रब्बीत प्रामुख्याने हरभरा असतो. एकूण क्षेत्राच्या साठ टक्के क्षेत्रावर रब्बी पिके असतात. परंतु वारंवार हरभरा पेरल्यामुळे मर व अन्य समस्या उद्‍भवून उत्पादनात घट येऊ लागली. त्यामुळे फेरपालट करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून होऊ लागले. त्यास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. विक्रीसाठी धर्माबाद बाजारपेठ उपलब्ध असल्याने क्षेत्रात वाढ होण्यासही मदत झाली. मागील वर्षी तालुक्यात एक हजार हेक्टरवर लागवड झाली होती. शाहापूर, आलूर, नंदूर, शेखापूर, लिंबा, कोटेकल्लूर, रामपूर आदी परिसरातही धने लागवड मोठ्या प्रमाणात होते. धन देणारे धने खरे तर धने शेती नांदेड जिल्ह्यासाठी नवी नाही. मागील सत्तर वर्षांपासून या भागात लागवड होते. रब्बीतील कोरडवाहू पीक म्हणून त्याकडे अनेक शेतकरी वळले. त्या काळी देगलूर व मदनूर (तेलंगणा) या धने विक्रीसाठी बाजारपेठ होत्या. शेतकरी बैलगाडीव्दारे धने येथे घेऊन येत. परत येताना काही जण काही वेळा मदनूर बाजारातून सोने खरेदी करीत. त्यामुळे धन देणारे धने अशी ओळख झाली. किफायतशीर पीक शेतकरी घरचेच म्हणजे देशी बियाणे वापरतात. त्यामुळे खर्चात बचत होते. काळी कसदार जमीन आणि शेणखत जास्त असलेल्या जमिनीत उत्पादन अधिक मिळते असे शेतकरी सांगतात. या पिकास पाणीही कमी लागते. कोथिंबीर विक्रीचा दुसरा पर्यायही उपलब्ध असतो. देशी वाण असल्याने विशिष्ट सुगंध असतो. बाजारात त्याचा दरवळ असल्याने ग्राहकांची त्वरित पसंती मिळते. पूर्वमशागतीत शेणखत आणि निंबोळी खत मिसळण्यात येते. ऑक्टोबरच्या दरम्यान पेरणीचे नियोजन होते. यात ट्रॅक्टरचलित यंत्राचाही वापर होतो. एकरी १२ ते १३ किलोच्या दरम्यान बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे रबर अथवा चामडीद्वारे रगडले जाते. पेरणीवेळी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश वापरले जाते. फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण पडणारा नाही याची दक्षता घ्यावी लागते. तुषार सिंचन केल्यास चांगले उत्पादन येते. तण दिसल्यास एखादी निंदणी होते. काढणीचे नियोजन पीक फुलोऱ्यात असताना धन्याचा सुगंध परिसरात पसरतो. या काळात मधमाश्‍या आकर्षित होऊन परागसिंचन चांगल्या प्रकारे होते. सुमारे ९० दिवसांच्या कालावधीत पीक तयार झाल्यानंतर मजुरांच्या साह्याने अथवा ‘कम्बाइन हार्वेस्टर’च्या साह्याने काढणी होते. तुरे करड्या रंगाचे झाल्यावर पीक कापून घेतले जाते. एकरी सरासरी चार ते पाच क्विंटलची उत्पादकता या भागात आहे. धर्माबाद, देगलूर, बिलोली भागांतील शेतकरी एकरी सहा ते आठ क्विंटलपर्यंतही उत्पादन घेतात. धर्माबाद बाजारपेठ मिरचीसाठी प्रसिद्ध धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत मोंढा बाजारात धने विक्री होते. डाळ, पावडर यासह मसालावर्गीय पदार्थांत धन्याचा उपयोग होत असल्याने त्याचा दरवळ परराज्यांपर्यंत पोहोचला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडूमधील बिरुदनगर येथील खरेदीदार या बाजारपेठेत येतात. येथे दहा ते पंधरा अडत्यांकडून खरेदी होते. त्यामुळे अलीकडील काळात या बाजारपेठेची ओळख धन्याचा बाजार म्हणूनही झाली आहे. धर्माबाद बाजारपेठेतील व्यापारी आनंद शिंदे म्हणाले, की अनेक वर्षांपासून येथे धने खरेदी होते. तेलंगणामधील निर्मल, मुधोळ, म्हेसा, कुबेर, तानूर, बासर आदी ठिकाणीदेखील बाजारपेठ आहे. परंतु धर्माबाद बाजारात तुलनेने अधिक दर मिळतो. मागील वर्षी ५० हजार क्विंटल धन्याची आवक झाली होती. देशी वाण असल्याने दरांत फायदा होतो. सन २०१६- १७ मध्ये प्रति क्विंटल ११ हजार रुपये, त्या पुढील वर्षी आठ ते नऊ हजार रुपये, तर मागील वर्षी सात हजार रुपयांपर्यंत दर मिळाले. धने प्रक्रियेतील संधी धने पावडरीला बाजारात चांगली मागणी आहे. आकर्षक पॅकिंग, ब्रॅंडिंग केल्यास शेतकऱ्यांना अधिक दर मिळविण्याची संधी आहे. कृषी विभागाची पोकरा योजना तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत पावडरनिर्मितीसाठी युनिट उभारता येते. त्यासाठी कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येते. शेतकरी अनुभव देगलूर तालुक्यातील शाहापूर येथील विलास यालावार यांची शेखापूर शिवारात सुमारे २५ एकर शेती आहे. त्यांनी मागील वर्षी तब्बल २२ एकरांत धने लागवडीचा प्रयोग केला. ते म्हणाले, की आमच्या गावात बहुसंख्य शेतकरी धने घेतात. प्रत्येकाचे क्षेत्र साधारण पाच एकर तरी असते. आम्ही १९७५ च्या दरम्यान धने घ्यायचो. मात्र १९९० च्या दरम्यान सोयाबीन व हरभरा या पिकांकडे वळलो. अलीकडे एकच पीक पद्धती व मर रोग समस्या जाणवू लागली. त्यामुळेच मागील वर्षी धने पिकातून फेरपालट केली. एकरी सरासरी सात क्विंटल उत्पादन मिळाले. धर्माबाद बाजारात प्रति क्विंटल सात हजार ते ७४०० रुपये दर मिळाला. एकरी खर्च सुमारे दहा हजार रुपये आला. धन्यावर यंदा पुन्हा धने घेण्यापेक्षा तूर पिकास प्राधान्य दिले. यंदा धने चार एकर असून, सध्या आठ हजार रुपये दर सुरू आहे असे त्यांनी सांगितले. - विलास यालावार, ९५२७२०७८७० शाहापूर येथील यल्लारेड्डी कोत्तावार यांनी मागील १० एकरांत धने पेरले होते. एकरी साडेसात क्विंटल उत्पादन मिळून धर्माबाद बाजारात साडेसात हजार रुपये दर मिळाला. यंदा त्यामुळे यंदा २५ एकरांत पेरणी केली असून पीक परिस्थिती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. - यल्लारेड्डी कोत्तावार : ९६८९०८०९२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com