नागपूर जिल्ह्यात मोसंबीतून मिळवली ओळख

दुग्धोत्पादनासाठी आघाडीवर चारगाव (जि. नागपूर) परिसरात राजेंद्र नागपुरे यांनी मोसंबी पिकाद्वारे व्यावसायिक शेतीचा आदर्श उभारला आहे. पंचवीस वर्षांपासून मोसंबीचे नेटके संगोपन व व्यवस्थापन करीत टप्प्याटप्प्याने बाराशे झाडांपर्यंत विस्तार केला आहे. उमरेड तालुक्‍यातील जुनेजाणते व कदाचित एकमेव मोसंबी उत्पादक अशी वेगळी ओळख त्यांनी मिळविली आहे.
Rajendra and Rina while grading quality Mosambi.
Rajendra and Rina while grading quality Mosambi.

दुग्धोत्पादनासाठी आघाडीवर चारगाव (जि. नागपूर) परिसरात राजेंद्र नागपुरे यांनी मोसंबी पिकाद्वारे व्यावसायिक शेतीचा आदर्श उभारला आहे. पंचवीस वर्षांपासून मोसंबीचे नेटके संगोपन व व्यवस्थापन करीत टप्प्याटप्प्याने बाराशे झाडांपर्यंत विस्तार केला आहे. उमरेड तालुक्‍यातील जुनेजाणते व कदाचित एकमेव मोसंबी उत्पादक अशी वेगळी ओळख त्यांनी मिळविली आहे. नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुक्‍यातील चारगाव हे शेतीत पुढारलेले गाव म्हणून नावारूपास आले आहे. गावातील जवळपास प्रत्येक कुटुंब दुधाळ जनावरांचे (नागपुरी, मुऱ्हा) संगोपन करते. गावात कधीकाळी ५० लिटरपर्यंत दूधसंकलन व्हायचे. नव्या पिढीने व्यवसायात सातत्य राखत ते ३०० लिटरपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळेच पशुवैद्यक पवन भागवत यांच्या पुढाकारातून प्रसिद्ध खासगी कंपनीचे डेअरीचे संकलन केंद्रही सुरू करण्यात आले आहे.

मोसंबीचे जाणते शेतकरी चारगाव शिवारात राजेंद्र नागपूरे यांची १२ एकर शेती आहे. या संपूर्ण शिवारात केवळ मोसंबीची लागवड करण्यावरच त्यांनी भर दिला आहे. सुमारे २५ वर्षांपासूनची त्याचबरोबर १८, सहा व तीन वर्षे जुनी अशी विविध वयातील झाडे त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. या भागात कापूस व सोयाबीन या मुख्य हंगामी पिकांची शेती आहे. तर नागपूरचा भाग मुख्यतः संत्रा पिकासाठी प्रसिद्ध आहे. असे असताना सुमारे बाराशे मोसंबीच्या झाडांचे संगोपन करणाऱ्या नागपुरे यांची पिकात तालुक्‍यातील जुनेजाणते व कदाचित एकमेव मोसंबी उत्पादक अशी ओळख झाली आहे.

व्यवस्थापनातील बाबी बागेत चार मजूर कायम कामास असतात. मात्र यांत्रिकीकरणाचा पर्याय निवडला आहे. मिनी ट्रॅक्‍टर आहे. जुन्या झाडांची लागवड २० बाय २० फूट अंतरावर होती. आता नव्याने इस्राईल पद्धतीनुसार ती २० बाय १० फूट अंतरावर केली आहे. सिंचनासाठी विहिरीचा पर्याय आहे. जमीन हलकी, मध्यम, काहीशी चुनखडीयुक्त आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा योग्यरीत्या होतो. त्यामुळे बाग निरोगी राहते. लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये डिंक्या व अन्य किडी-रोगांचा प्रादुर्भाव बागेत पाणी साचले किंवा खोडांना पाणी लागल्यास होतो. पाण्यापासून उद्‌भवणाऱ्या रोगांपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी ठिबकचा पर्याय निवडला आहे. १२ एकरांपैकी ८ एकर क्षेत्र आधीच ठिबकखाली आले होते. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आले आहे.

दोन्ही हंगामांत उत्पादन बाजारपेठेची जोखीम कमी करण्यासाठी मृग आणि आंबिया असे दोन्ही बहर घेतले जातात. त्यासाठी प्रत्येकी सहा एकरांचे दोन भाग केले आहेत. एकरी पाचपासून ते सात- आठ टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. मृगातील उत्पादन बहुतांश निसर्गावर अवलंबून राहते. त्यामुळे हा बहर घेण्यात धोके अधिक असतात. या बहराची २० जानेवारीपासून तोडणी होते. आंबिया बहरासाठी नोव्हेंबर महिन्यात बागेचे पाणी बंद करून ताण दिला जातो. त्यानंतर जानेवारीपासून बागेचे पाणी सुरू केले जाते. आंबियाची फळे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत मिळतात. वर्षातून एकदा बोर्डो पेस्ट झाडांच्या खोडांना लावली जाते.

फळांचा राखला दर्जा फळांना चकाकी असेल तर बाजारपेठेत मागणी अधिक राहते व शेणखतामुळे फळांची गुणवत्ता सुधारते असा नागपुरे यांचा अनुभव आहे. त्यानुसार एकरी पाच ट्रॉली याप्रमाणे शेणखताचा वापर होतो. त्याच्या उपलब्धतेसाठी चार गायी आहेत. अधिक खत लागल्यास ते खरेदी केले जाते. बागेतील काडीकचरा न जाळता किंवा बागेबाहेर न काढताच रोटाव्हेटरच्या साह्याने त्याच ठिकाणी कुजविण्यावर भर राहतो. या माध्यमातून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते असे नागपुरे सांगतात.

पपईचे आंतरपीक नव्याने लागवड केलेल्या ६०० मोसंबीच्या झाडांत आंतरपीक घेणे शक्‍य होते. सुरुवातीच्या काही वर्षांत तूर लागवडीला प्राधान्य दिले. या वर्षी पहिल्यांदाच पपईची लागवड केली आहे. मागील ऑक्टोबरपासून दर आठवड्याला पाच क्विंटल याप्रमाणे पपई बाजारपेठेत विक्रीस जात होती. त्यास १५ ते २० रुपये प्रति किलोप्रमाणे दर कळमणा बाजारात मिळाला. अद्याप विक्री सुरू असून काही टनांची विक्री होऊन मोसंबी पिकातील खर्च त्यातून कमी झाल्याचे नागपुरे यांनी सांगितले.

विक्री व्यवस्था मोसंबीच्या विक्रीसाठी कळमणा बाजार समितीचा पर्याय त्यांच्याकडे आहे. नागपूरमधील ही बाजार समिती चारगावपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर आहे. या बाजारपेठेत प्रति टनामागे एक क्‍विंटल काट घेतला जातो. ही पद्धत बंद व्हावी अशी नागपुरे यांची मागणी आहे. मात्र बांधावर माल देण्याच्या तुलनेत बाजारपेठेत नेऊन देणे परवडते. एकरी एक लाख रुपये यानुसार उत्पन्न हे पीक देते असे ते सांगतात. शक्यतो प्रति टन किमान दर २० हजार रुपयांपेक्षा कमी मिळालेला नाही. तो ३० हजार व कमाल ४० हजार रुपयांपर्यंत मिळाल्याचे ते सांगतात.

संपर्क ः राजेंद्र नागपुरे, ९६३७७६१५७०  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com