
मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा येथील ‘पीपल्स फॉर ॲनिमल’(करुणाश्रम) या संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासोबतच संस्थेच्या प्रकल्पात बेवारस आणि जखमी प्राण्यांची शुश्रूषा केली जाते. सेवाभावातून संस्थेने जंगल परिसरातील गावांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यास केली आहे. वर्धा येथील आशिष गोस्वामी यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे आणि ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्यासोबत काम केले. सोमनाथ येथील श्रम संस्कार शिबिरात अनेक वेळा सहभागी झालेल्या गोस्वामी यांना बाबा आमटे यांनी प्राणीसुरक्षेचा सल्ला दिला होता. आमटे यांच्या सामाजिक कार्यापासून प्रेरित झालेल्या गोस्वामी यांनी १९९९ मध्ये ‘पीपल फॉर ॲनिमल्स’ या संस्थेची उभारणी केली. बेवारस प्राण्यांची सेवा शुश्रूषा करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचे नामकरण ‘करुणाश्रम’ असे करण्यात आले. सहायक धर्मदाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी आहे.
प्रकल्पाची उभारणी तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद म्हैसकर यांना ‘पीपल फॉर ॲनिमल्स’ या संस्थेच्या प्रकल्पाची माहिती मिळाली. त्यांनी पुढाकार घेत या प्रकल्पासाठी वर्ध्याजवळील पिप्री मेघे येथे पाच एकर शासकीय जागा नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली. त्यासोबतच गाईसाठी गोठा आणि इतर बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मदत केली. अशा प्रकारच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभा झाला. सुरुवातीला जनावरे ठेवण्यासाठी पुरेशा सोयी नव्हत्या. त्यामुळे मर्यादित स्वरूपामध्ये संस्थेतर्फे जनावरांची सोय करण्यात येत होती. हळूहळू हा प्रकल्प विस्तारित होत गेला. जागा आणि शेड बांधकामाकरिता मिळालेल्या मदतीशिवाय इतर कोणतेही शासकीय अनुदान प्रकल्पाला नाही. प्रकल्पस्थळी असलेल्या उपचारासाठी असलेले वन्यजीव, बेवारस जनावरांचा आहार, उपचार आणि देखभालीवर दररोज दहा हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च होतो, हा खर्च कसाबसा भागविला जातो. या ठिकाणी तयार होणाऱ्या शेणखत, गोवऱ्या आणि गोमूत्राची विक्री केली जाते. परिसरातील शेतकऱ्यांना साडेतीन रुपये लिटर दराने गोमूत्र विकले जाते. त्यातून काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. याचा उपयोग दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी केला जातो. उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने जनावरांचा सांभाळ करणे ही मोठी कसरत आहे. सध्या काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने आर्थिक खर्च भागविला जातो, असे गोस्वामी यांनी सांगितले.
प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता ‘करुणाश्रम’ प्रकल्पाला केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा प्रकल्प कार्यान्वित आहे. डॉ. संदीप जोगी हे रोज दोन तास आपली सेवा या ठिकाणी देतात. कौस्तुभ गावंडे हे देखील या ठिकाणी प्राण्यांवर उपचार करतात.
जनावरे आणि वन्यप्राण्यांची सोय संस्थेच्या प्रकल्पामध्ये १६३ जनावरांपैकी सध्या १० गायी दुधाळ आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधाचा उपयोग मोकाट वासरे, आजारी प्राण्यांची दुधाची गरज भागविण्यावर होतो. संस्थेच्या एक एकर प्रक्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये पालक, आंबट चुका, टोमॅटो, मिरची, कांदा, लसूण, अंबाडी या पिकांची लागवड केली जाते. संस्था परिसरातील मजुरांची गरज भागल्यानंतर ससे, पोपट, माकडांची पिल्ले यांना उर्वरित भाजीपाला खाद्य म्हणून दिला जातो. गोमूत्र, पंचगव्य यांसारख्या जैविक घटकांचा वापर पीक व्यवस्थापनात होतो. सध्या प्रकल्पामध्ये दोन अस्वल, एक मगर, काळवीट, चौशिंगा, चितळ, चिंकारा असे एकूण ३५ वन्यप्राणी उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. संस्थेतर्फे वर्धा भाजीपाला बाजारात रोज सायंकाळी एक मालवाहू वाहन उभे केले जाते. विकला न गेलेला किंवा दुसरा दिवशी फेकून द्यावा लागेल, असा भाजीपाला या वाहनात टाकावा, असे आवाहन भाजीपाला विक्रेत्यांना केले जाते. याला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रोज मोठ्या प्रमाणावर भाजीपाला संकलित होतो, तो प्रकल्पातील जनावरांना आहार म्हणून दिला जातो. त्यासोबतच एका खासगी बेकरी व्यावसायिकाकडून ब्रेडचे कट उपलब्ध करून दिले जातात. त्याचा प्रकल्पातील आजारी कुत्र्यांसाठी आहार म्हणून वापर होतो. काही दानदात्यांकडून हिरवा चारा मिळतो, त्यासोबतच प्रकल्पस्थळी देखील दीड एकरावर हिरवा चारा लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती आशिष गोस्वामी यांनी दिली. ‘वनश्री पुरस्कारा’ने गौरव मोकाट, बेवारस आणि जखमी प्राण्यांचे संगोपन आणि उपचार करून भूतदयेचा आदर्श करुणाश्रमाने जपला आहे. संस्थेच्या या सेवाभावाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूर विभागात पहिल्या क्रमांकाच्या वनश्री पुरस्काराने या संस्थेच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. त्यासोबत इतरही खासगी संस्थांच्या वतीने देखील संस्थेला गौरविण्यात आले आहे. वन्यजीवांवर उपचार राज्यात १२ वन्यप्राणी बचाव केंद्र कार्यरत आहेत. त्यातील एक केंद्र वर्धा येथील करुणाश्रम हे आहे. गावशिवारात आपत्कालीन परिस्थितीत एखादा वन्यजीव आढळल्यास त्यावर संस्थेच्या प्रकल्पामध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकांमार्फत शुश्रूषा केली जाते. वनविभागाकडून जखमी अवस्थेतील वन्यप्राणी या ठिकाणी उपचारासाठी आणले जातात. लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातून देखील उपचारासाठी प्राणी या प्रकल्पाच्या ठिकाणी आणण्यात येतात. दर महिन्याला सरासरी वीस वन्यप्राणी उपचारासाठी या प्रकल्पामध्ये आणले जातात. गाव परिसरातून उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांची संख्या वर्षाला ३५० पेक्षा अधिक आहे, असे आशिष गोस्वामी यांनी सांगितले. प्राण्यांसाठी रुग्णालयाचा संकल्प करुणाश्रमाने प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे. प्राण्यांमध्ये माणसाप्रमाणे गंभीर आजार उद्भवतात. जखमी प्राण्यांवर मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात, पण तशी सोय उपलब्ध नसल्याने प्राणी दगावतात. त्यांना वाचवण्यासाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा संस्थेचा प्रस्ताव आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपाचे औषधोपचार, लहान शस्त्रक्रिया, निगा राखण्याची सोय संस्थेकडे आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील दानशूरांनी पुढे येत संस्थेच्या प्रकल्पाला निधीच्या माध्यमातून हातभार लावण्याचे आवाहन केले जात आहे.
मानव- वन्यजीव संघर्षावर जागृती गेल्या काही वर्षांत जंगल परिसराच्या जवळच्या गावांमध्ये मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये संस्थेने लोकांमध्ये वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत जागृतीवर भर दिला आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. - आशिष गोस्वामी, ९४२२१४१२६२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.