पापड, बेकरी उद्योगात तयार केली ओळख

भादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा नासिरहुसेन मुल्ला यांनी पापड उद्योगातून आर्थिक स्वयंपूर्णता मिळवली. गेल्या सहा वर्षांपासून महिला बचत गटाच्या साथीने वैविध्यपूर्ण चवीच्या पापडांची विक्री करत त्यांनी पापडनिर्मिती आणि बेकरी व्यवसायात वेगळी ओळख तयार केली आहे.
papad production with the help of machine
papad production with the help of machine
Published on
Updated on

भादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा नासिरहुसेन मुल्ला यांनी पापड उद्योगातून आर्थिक स्वयंपूर्णता मिळवली. गेल्या सहा वर्षांपासून महिला बचत गटाच्या साथीने वैविध्यपूर्ण चवीच्या पापडांची विक्री करत त्यांनी पापडनिर्मिती आणि बेकरी व्यवसायात वेगळी ओळख तयार केली आहे. भादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा नासिरहुसेन मुल्ला यांचे सासर इचलकरंजी. तिथे त्यांच्या पतीची गाड्यांची एजन्सी होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. अचानक आघात झाल्याने नसीमा यांना यापुढे आयुष्य कसे जगायचे, याची चिंता सतावू लागली. शिक्षण कमी असल्याने नोकरीचा देखील प्रश्‍न होता. या काळात त्यांना माहेरच्या मंडळींचा मोठा आधार मिळाला. पती निधनानंतर त्या माहेरी भादोले येथे आल्या. इचलकरंजीत असतानाच त्या किरकोळ प्रमाणात पापड तयार करण्याचे काम करत होत्या. माहेरी आल्यानंतर मात्र त्यांनी अर्थार्जनासाठी व्यावसायिक पद्धतीने पापडनिर्मितीवर भर दिला. गेल्या सहा वर्षांपासून त्या पापड व्यवसायात सक्रिय आहेत. मागणी वाढल्याने पापडनिर्मितीसाठी त्यांनी स्वयंचलित यंत्र घेतले. दोन्ही मुले आणि माहेरच्या लोकांच्या साथीने त्यांनी पापडनिर्मितीमध्ये चांगली गती पकडली आहे. त्याचबरोबरीने बेकरी उद्योगाला देखील सुरुवात केली आहे. बचत गटांची मिळाली साथ  भादोलेसारख्या ग्रामीण भागात पापडाची विक्री करणे हे एक आव्हान होते. पण नसीमा मुल्ला यांना विविध गावांतील महिला बचत गटांनी मोठा आधार दिला. पापडांचे विविध प्रकार आणि गुणवत्ता चांगली असल्याने ग्राहकांकडूनच मागणी वाढत गेली. बचत गटांकडून आलेली मागणी हाच त्यांचा पापड विक्रीचा मुख्य स्रोत आहे. परिसरातील गावांमध्ये फूड फेस्टिव्हल आणि प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये बचत गटांचे विविध पदार्थ विक्रीस असतात. काही बचत गट लोकांकडून घरगुती पदार्थ घेऊन त्यांची विक्री करतात. या बचत गटाचा फायदा नसीमा यांना व्यवसायवृद्धीसाठी झाला. त्यांनी केलेले पापड अनेक बचत गट विक्रीसाठी घेऊन जातात. नामवंत बचत गटांकडून त्यांच्या पापडाला वर्षभर मागणी असते. बचत गटांच्या बरोबरच थेट ग्राहक आणि गावातील पाहुण्यांमार्फत ही पापड विक्रीचे नियोजन त्यांनी केले आहे. बहुतांश पापड विक्री जागेवरच होते. प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी स्वामी सेवानंद महाराज यांनी देखील चांगले मार्गदर्शन केल्याचे नसीमा मुल्ला आवर्जून सांगतात. विविध चवीचे नावीन्यपूर्ण पापड  नसीमा मुल्ला या पोहा पापड, नाचणी, बाजरी आदी धान्यांपासून पापड तयार करतात. हंडी पापडांमध्ये पालक, टोमॅटो, तिखट, साबुदाणा- बटाटा, वरी पापड तयार केले जातात. उडीद आणि मूगडाळीचे पापड मागणीनुसार तयार करण्यात येतात. पापड तयार करताना त्यामध्ये कोणत्याही पदार्थांचा इसेंस न वापरता मूळ पदार्थ वापरला जातो. त्यामुळे पापडाला नैसर्गिक चव येते. परिणामी सातत्याने ग्राहक अशा पापडांची मागणी करतात. साधारणपणे प्रकारानुसार दीडशे ते अडीचशे रुपये किलो प्रमाणे पापडाचे दर आहेत. उपवास आणि उडीद पापडांना इतर पापडांपेक्षा थोडा अधिकचा दर मिळतो. स्वच्छता आणि गुणवत्तेचे सर्व नियम पाळून पापडनिर्मिती केली जाते. पापडासाठी लागणारा कच्चा माल हा दर्जा पाहूनच खरेदी केला जातो. कच्चा माल जरी महाग मिळाला तरी त्यात तडजोड केली जात नाही. यामुळे पापडाचा दर्जेदारपणा वाढतो. ते अनेक दिवस टिकून राहतात. गुणवत्तेमुळे अजूनपर्यंत ग्राहकांकडून एक ही तक्रार आली नसल्याचे नसीमा अभिमानाने नमूद करतात. पापडनिर्मितीतून मिळाला आत्मविश्‍वास पापड व्यवसायातून शिकलेल्या नसीमा यांना मोठा आत्मविश्‍वास मिळाला. व्यवसायाच्या मिळकतीतून दोन्ही मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले आहे. त्यांची मुलगी हीना हिने एमसीए केले आहे. मुलगा समीर बीएस्सी केमिस्ट्रीचे शिक्षण घेऊन एका कंपनीमध्ये नोकरीस आहे. नसीमा यांना प्रामुख्याने ५० किलो ते १०० किलो या प्रमाणात पापडाच्या घाऊक प्रमाणात ऑर्डर येतात. यामुळे मागणीनुसार पापडनिर्मिती आणि पॅकिंगमध्ये खूप वेळ जातो. परिणामी, स्वतःच्या ब्रँडने पापड विक्री करणे त्यांना अजूनपर्यंत शक्य झाले नाही. मात्र येत्या वर्षभरात स्वतःचा ब्रँड तयार करण्याचे त्यांनी ठरविले आहे. उन्हाळा, लग्नसराईत मागणी साधारणपणे दिवाळीनंतर जूनपर्यंत विविध प्रकारच्या पापडांचा हंगाम असतो. उन्हाळा, लग्नसराई या कालावधीत पापडाला मागणी वाढते. लग्नसराईच्या काळात रुखवतासाठी देखील विविध रंगाच्या पापडांना मोठी मागणी असते. त्यामुळे या कालावधीत रात्री उशिरापर्यंत पापडनिर्मितीचे काम सुरू असते. आठवड्याला दीड ते दोन क्विंटल पापड तयार केले जातात. चार महिन्यांच्या मुख्य हंगामात त्यांच्या व्यवसायाची सरासरी तीन लाखांपर्यंत उलाढाल होते. यामध्ये ४० टक्क्यांपर्यंत नफा होत असल्याचे नसीमा सांगतात. बेकरी व्यवसायाकडे वाटचाल नसीमा यांनी पापड विक्रीच्या बरोबरच आता बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठी ओव्हन घेतला आहे. या माध्यमातून तेरा प्रकारची बिस्किटे आणि खाद्य पदार्थ तयार करून गावस्तरावर विक्रीचे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या काळात मुलगा समीर याच्याकडे बेकरी व्यवसायाची जबाबदारी देण्याचे त्यांनी ठरविले आहे. ‘मविम’चा आधार नसीमा मुल्ला यांच्या प्रक्रिया उद्योगाच्या वाटचालीस महिला आर्थिक विकास महामंडळाने चांगला आधार दिला आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत त्यांनी नुकत्याच सुरू केलेल्या बेकरी व्यवसायासाठी दोन लाखांचा कर्जपुरवठा झाला. बचत गटांशी समन्वय साधणे तसेच विक्री व्यवस्थापनातदेखील त्यांना ‘मविम’चा आधार मिळाला आहे. माविमचे जिल्‍हा समन्‍वय अधिकारी सचिन कांबळे, उमेश लिंगणूरकर, तनुजा मुलाणी, अमृता पाटील, पूजा कांबळे, विनायक कुलकर्णी आदींचे मार्गदर्शन नसीमा मुल्ला यांना मिळते. संपर्क ः नसीमा मुल्ला, ८४०८०५१५६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com