अति पावसाच्या आदिवासी पट्ट्यात वाढले सोयाबीन उत्पादन

नाशिक जिल्ह्यातील वडेल (ता. मालेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने कळवण व सटाणा या आदिवासी तालुक्यांत सोयाबीनची सुधारित शेती रुजवण्यास सुरुवात केली आहे. एकात्मिक पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष अंमलबजावणी याद्वारे एकरी पाच क्विंटलपर्यंत उत्पादनवाढ मिळण्यास मदत मिळाली आहे.
Soybean farm in tribal area
Soybean farm in tribal area
Published on
Updated on

नाशिक जिल्ह्यातील वडेल (ता. मालेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने कळवण व सटाणा या आदिवासी तालुक्यांत सोयाबीनची सुधारित शेती रुजवण्यास सुरुवात केली आहे. एकात्मिक पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष अंमलबजावणी याद्वारे एकरी पाच क्विंटलपर्यंत उत्पादनवाढ मिळण्यास मदत मिळाली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावू लागले आहे. आदिवासी भागासाठी ही क्रांतीची सुरुवातच म्हणावी लागेल. नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात कळवण, सटाणा या तालुक्यांत सोयाबीन घेतले जाते. मात्र सुधारित बियाणे, सुधारित लागवड पद्धतीचा योग्य वापर होत नव्हता. दोन ओळी व झाडांत तर योग्य अंतराचा अभाव होता. खतांचा वापर सुनियोजित होणे गरजेचे होते. योग्य पीक कीड- रोगांना बळी पडायचे. काही भागात पर्जन्यमान अधिक असल्याने पाणी साचून राहिल्याने पिकाची वाढ खुंटायची. निंदणी, कोळपणीला मर्यादा यायच्या. एकंदरीत उत्पादन व गुणवत्ता कमी होती. सुधारित शेतीची अंमलबजावणी भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘अटारी’ संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१९-२० मध्ये गळीत धान्य पिकाच्या अनुषंगाने प्रयोग राबविण्याचे ठरले. मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी विज्ञान केंद्राकडे (केव्हीके) ही जबाबदारी देण्यात आली. ‘केव्हीके’ने कळवण व सटाणा या आदिवासी तालुक्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून वडाळे हातगड (ता. कळवण) व मोहळंगी (ता. सटाणा) ही गावे निवडली. मार्गदर्शन व विस्ताराची जबाबदारी केव्हीकेचे कृषिविद्या विषय विशेषज्ञ रूपेश खेडकर यांच्याकडे होती. कळवण तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, कृषी सहायक शरद पालवे यांचाही सहभाग राहिला. सर्वप्रथम समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला. दोन्ही गावांतील मिळून ५० लाभार्थी शेतकरी निवडण्यात आले. त्यांना एकात्मिक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रयोगातील शिफारशी व ठळक बाबी

  • समूह आद्यरेषा पिके प्रात्यक्षिकाची अंमलबजावणी करताना जमीन व हवामान स्वरूप योग्य सुधारित वाणाची निवड, एकात्मिक पीक व्यवस्थापन या प्रमुख बाबी होत्या. पारंपरिक बियाण्याला पर्याय म्हणून ‘फुले संगम’ वाणाची निवड करून शेतकऱ्यांना बियाणे वितरण करण्यात आले. त्यामुळे बियाणे बदल हा महत्त्वाचा मुद्दा ठरला.
  • पेरणीपूर्व बीजप्रक्रिया. यात थायरम बुरशीनाशक तर रायझोबियम, पीएसबी या जिवाणू संवर्धकांचा वापर
  • पावसाचे प्रमाण ११०० ते १३०० मिमी. असल्याने सरी वरंबा टोकण पद्धतीने लागवड दोन वरंब्यांमधील अंतर चार फूट तर दोन झाडांतील अंतर १० ते १५ सेंमी.
  • माती परीक्षण व आरोग्य पत्रिकेच्या आधारे खतांचा वापर
  • ७५:५०:३० किलो प्रति हेक्टर नत्र- स्फुरद- पालाश यांचा वापर
  • नत्रयुक्त खतांचा फोकून वापर टाळला
  • पेरणीनंतर दोन दिवसांच्या आत किंवा उगवणीपश्‍चात १८ ते २५ दिवसांत तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर
  • उत्पादनात झाली वाढ रुंद वरंबा व एकूणच व्यवस्थापानातून उगवण चांगली, वाढ जोमदार झाली. जलसंधारण, खेळती हवा, किडी-रोगांचे वेळीच नियंत्रण, अधिक पावसाच्या दिवसांत पाण्याचा निचरा यातून उत्पादनात एकरी चार ते पाच क्विंटल वाढ दिसून आली. अर्थात, अर्थकारण तपासताना होणारा अपेक्षित खर्चही जमेत धरला आहे. सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ३४०० रुपयांच्या दरम्यान गृहीत धरला आहे. झालेले बदल (हेक्टरी)

    घटक पूर्वी आता
    बियाणे गरज (किलो १००. ६०
    उत्पादन खर्च (रुपये) २२,९३३ २२,०९७
    उत्पादन (क्विंटल) १२.४५ २३.७०
     उत्पन्न (रुपये) ३९,९११ ५७, १८४
     नफा (रुपये) १८,९७८ ३५,०८७

    ‘फुले संगम’ वाण ठरला फायदेशीर प्रयोगात अति पावसाच्या भागात चांगले उत्पादन देण्यात ‘फुले संगम’ वाण फायदेशीर ठरला. ‘एक गाव एक वाण’ संकल्पना रुजविण्यात तज्ज्ञांना यश आले. या वाणाचे वैशिष्ट्य सांगताना केव्हीकेतील तज्ज्ञ रूपेश खेडकर म्हणाले, की सुमारे १०० ते १०५ दिवस हा त्याचा पक्व कालावधी आहे. तांबेरा व मर रोगास तो प्रतिकारक आहे. हेक्टरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत त्याची उत्पादकता आहे. परिसरातील जवळपास १२० हेक्टरपर्यंत क्षेत्रावर या वाणाचा प्रसार आता होऊ लागला आहे. काहींनी बियाण्यांची साठवणूक केली. स्वतःच्या गरजेसह अन्य शेतकऱ्यांनाही चांगल्या दराने बियाणे पुरविणे त्यांना शक्य होऊ लागले. त्यातून शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजला आहे. प्रतिक्रिया सुधारित वाण, बीजप्रक्रिया, एकात्मिक खत व कीड-रोग व्यवस्थापनाचा पूर्वीच्या पद्धतीत अभाव होता. या सर्व बाबी तपासून शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले. बियाणे उपलब्ध करून दिले. त्यातून प्रयोगाचे निष्कर्ष सकारात्मक आढळले. अति पावसाच्या आदिवासी भागात फुले संगम वाण फायदेशीर ठरल्याचे आढळले आहे. आमच्या केव्हीकेच्या प्रक्षेत्रातही या वाणाने एकरी १२ क्विंटलपर्यंत उत्पादन दिले आहे. - रूपेश खेडकर, ८३२९२०७७१५ (विषय विशेषज्ञ- कृषिविद्यान केंद्र) पूर्वी क्षेत्र व उत्पादनही कमी असायचे. आमच्या भागात पाऊस अधिक असल्याने नुकसान व्हायचे. आता सुधारित पीक व्यवस्थापनाचा अवलंब सुरू केल्याने एकरी उत्पादनात वाढ झाली आहे. आमच्या भागात ही पद्धत रुजू लागली आहे. -भास्कर महाले, ८२७५८६१०९१ (सोयाबीन उत्पादक, वडाळे हातगड, ता. कळवण)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com