शेती विकासामध्ये कळसूबाई संस्थेचे सामुदायिक प्रयत्न

अकोले (जि. नगर) येथे जून २०१७ मध्ये कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची सुरुवात झाली. या नोंदणीकृत संस्थेमध्ये सुमारे १,६६० शेतकरी सभासद आहेत. संस्थेच्या माध्यमातून शेती विकास, पशुपालन, देशी बियाणे संवर्धन, प्रसारावर भर दिला आहे.
Training program on seed selection.
Training program on seed selection.

अकोले (जि. नगर) येथे जून २०१७ मध्ये कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची सुरुवात झाली. या नोंदणीकृत संस्थेमध्ये सुमारे १,६६० शेतकरी सभासद आहेत. संस्थेच्या माध्यमातून शेती विकास, पशुपालन, देशी बियाणे संवर्धन, प्रसारावर भर दिला आहे. अकोले (जि. नगर) तालुक्यातील ६० टक्के भाग आदिवासी आहे. या डोंगरी भागात अन्नधान्य पिके, जंगली रानभाज्या आणि चारापिके अशी विविधता आहे. पारंपरिक अन्नधान्य पिकांमध्ये सुमारे दोनशेच्या वर जातींची समृद्धता आढळते. कमी पाणी, ओलाव्यावर येणारी कडधान्ये ही या भागाची खासियत.अकोले तालुक्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये बायफ संस्था शाश्‍वत विकासासाठी गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत आहे. यामध्ये पशुधन, शेती, महिला आणि सामाजिक विकास इत्यादी घटकांचा समावेश आहे. अकोले परिसरात बियाणे संवर्धक शेतकरी, महिला बचत गटांसोबत बायफ संस्थेने काम सुरू केले. त्यानंतर बियाणे संवर्धक प्रतिनिधींची निवड करून जून, २०१७ मध्ये अकोले येथे कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था स्थापन झाली. या नोंदणीकृत संस्थेमध्ये अकरा सदस्य असून १,६६० शेतकरी सभासद आहेत. यामध्ये बहुतांश महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.  पीक जाती संवर्धन कार्यक्रम 

  • विविध पीक जातींची लागवड. शुद्धतेसाठी स्वस्थळी संवर्धन केंद्र. भौतिक आणि जनुकीय शुद्धतेवर भर. शेतकऱ्यांना पीक जात निवडीची मुभा. 
  • जमीन प्रकार,पीक उत्पादन,वातावरणात तग धरण्याची क्षमता,रोग व कीड प्रतिकारक क्षमता,चारा,बाजारातील मागणीचा विचार.
  • प्रतिकूल वातावरणात तग धरणाऱ्या,रोग-कीड प्रतिकारक,चांगला बाजारभाव असणाऱ्या विविध पिकांच्या स्थानिक जातींचे उत्पादन. 
  • भात जातींची प्रक्षेत्रीय लागवड. शास्त्रीय गुणवैशिष्ट्यांच्या अभ्यास. काळभात, जिरवेल, रायभोग, गरी कोळपी, हली कोळपी या भात जातींचे शुद्ध बियाणे निर्मिती. 
  • परसबाग बियाणे निर्मिती 

  • वांगी, दोडका, मिरची, काटेरी भेंडी, डांगर,भोपळा, माठ, पालक, धने, मेथी, गवार, डिंगरी, घोसाळी, इत्यादी भाजीपाला बियाणे सेट विक्री. 
  • आदिवासी महिलांना रोजगार. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अहमदाबाद शहरांत बियाण्यांना मागणी.
  • शाश्‍वत शेतीची जोड 

  • बियाणे संवर्धन कार्यशाळा, प्रक्षेत्र भेटी. 
  • लोकसहभागातून शुद्ध बियाणे निवड, साठवणूक पद्धती, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन आणि वापर.
  • बियाणे साठवणुकीसाठी मडकी, बलद, मुडा वापर.
  • पीक लागवड पद्धतीत बदल, शुद्ध बियाणे निर्मिती.

  • गादी वाफे पद्धतीने रोप निर्मिती. एसआरटी आणि एसआरआय पद्धतीने भात लागवड, सरी आणि वरंबा पद्धतीने नाचणी, वरई, वाल लागवड. 
  • कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, गोमूत्र वापर, दशपर्णी वापर. 
  • सेंद्रिय निविष्ठांचा पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास. शेतकऱ्यांना विक्री.
  • बियाणे संवर्धन आणि विक्री नियोजन 

  •  ११४ पीक जातींचे संवर्धन (भात, नाचणी, वरई, वाल, कडधान्ये, कंद, जंगली अन्न वनस्पती).
  • कोंभाळणे, एकदरे आणि देवगाव येथे बियाणे बँक.
  • दहा ठिकाणी स्वस्थळी संवर्धन केंद्राच्या माध्यमातून विविध पिकांच्या ५०  स्थानिक जातींचे गुण वैशिष्ट्यांचा बायफ संस्थेमार्फत प्रक्षेत्रीय अभ्यास.
  • भात, वाल, हरभरा, वाटाणा पिकाच्या नऊ स्थानिक जातींचे ३१ टन बियाणे उत्पादन आणि विक्री. दहा टन तांदूळ विक्री. १८,८०० परसबाग बियाणे संच विक्री. यातून एकूण उलाढाल ४३ लाख रुपये.
  • संस्थेतर्फे ४६ जंगली अन्न वनस्पतींचा अढळ, प्रकार, खाण्यायोग्य भाग, बनविण्याची पद्धती, औषधी उपयोग, संवर्धन पद्धतींचे संकलन. 
  • कोंभाळणे येथील बियाणे संवर्धन आणि प्रशिक्षण केंद्रामार्फत बियाणे निवड, उत्पादन, संवर्धनाबाबत प्रशिक्षण.ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये दुवा.
  • ‘बायफ’ची साथ  एप्रिल २०१४ पासून राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमांतर्गत जव्हार (पालघर), अकोले (नगर), जुन्नर (पुणे), धडगाव (नंदुरबार), एटापल्ली (गडचिरोली), कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे प्रकल्प सुरू झाला. यामध्ये भात, नाचणी, वरई, राळा, बंटी, वाल, घेवडा, मका, ज्वारी, चवळी, भाजीपाला, कंद पिके तसेच जंगली भाज्या, जंगली फळांचे सर्व्हेक्षण, संवर्धन आणि उत्पादनावर भर दिला आहे. या उपक्रमांना शबरी वित्त व विकास महामंडळ, कर्तव्य फाउंडेशन आणि ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट असोसिएशन इन इंडिया यांचे सहकार्य आहे. राष्ट्रीय पातळीवर गौरव 

  • संस्थेच्या सदस्या आणि बियाणे संवर्धक राहीबाई पोपेरे यांना भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे जागतिक महिलादिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारीशक्ती-२०१८ पुरस्कार तसेच भारत सरकारतर्फे २०२० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान. 
  • केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटीज ॲण्ड फार्मर राईटस ॲथॉरिटी मार्फत पिकांच्या स्थानिक जातींचे संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन व विकास संस्थेला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जीनोम सेव्हियर कम्युनिटी पुरस्कार’. तसेच कळसूबाई संस्थेच्या सदस्या ममताबाई भांगरे (देवगाव, ता. अकोले, जि. नगर) यांना ‘राष्ट्रीय जीनोम सेव्हियर शेतकरी पुरस्कार’. 
  • लोकसहभागातून बियाणे संवर्धन

  • पीक वाण संवर्धन कार्यक्रमामध्ये राहीबाई सोमा पोपेरे, हिराबाई हैबत भांगरे, ममताबाई देवराम भांगरे, हिराबाई लहू गभाले, शांताबाई खंडू धांडे, जनाबाई लक्ष्मण भांगरे, आनंदा नाना गोलवड, लक्ष्मण खंडू डगळे, उत्तम मारुती डगळे, सोनाबाई विठ्ठल भांगरे, फसाबाई मच्छिंद्र लोटे, नंदकुमार मंडवळे, निवृत्ती गंगाराम भांगरे, विठ्ठल रखमा भांगरे, एकनाथ कृष्णा भांगरे, भोरू बुधा पेढेकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 
  • बायफ संस्थेमार्फत संजय पाटील, जितीन साठे, योगेश नवले यांचे शेतकऱ्यांना माहिती संकलन, बीजोत्पादन आणि धान्य उत्पादन, पोषण आणि जनुकीय गुणधर्मांचा अभ्यास, मूल्यवृद्धी ते विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळते. संस्थेच्या उपक्रमाला बायफ मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळीकांचन तसेच देशभरातील तज्ज्ञ संशोधकांची साथ आहे. संस्थेच्या माध्यमातून स्थानिक पीक जातींवरील शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटीज ॲण्ड फार्मर राइट्‍स ॲथॉरिटी, नवी दिल्लीमार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. याचबरोबर संस्थेने भाताच्या १३ जाती, वाल पिकाच्या १८ जातींचे बियाणे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय जनुक कोशामध्ये राष्ट्रीय संपत्ती म्हणून जतन करण्यासाठी पाठविले आहे.
  • - संजय पाटील, ९६२३९३१८५५ (लेखक बायफ संस्थेत कृषी जैव विविधता विभागात मुख्य प्रकल्प अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com