Mango Production : आगाप आंबा उत्पादनाचे अवगत केले तंत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातवण येथील प्रशांत शिंदे (ता. देवगड) यांनी शासकीय ठेकेदारी व्यवसाय सोडून पूर्णवेळ आंबा बाग विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. अनुभव, परिश्रम व कौशल्यातून आगाप उत्पादन नियोजनासह थेट विक्रीचे तंत्र अवगत केले. तीन वर्षांपासून हंगामपूर्व आंबा बाजारपेठेत आणून उल्लेखनीय दर मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
Mango Production
Mango ProductionAgrowon
Published on
Updated on

जागतिक स्तरावर प्रसिद्ध देवगड हापूस (Devgad Hapus) आंब्याचे सर्वाधिक उत्पादन (Mango Production) देवगड तालुक्यात (जि. सिंधुदुर्ग) घेतले जाते. समुद्रकिनारपट्टीच्या मालवण आणि वेंगुर्ल्यासह जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातही या हापूसची लागवड (Hapus Cultivation) होते. मात्र ग्राहकांची पहिली पसंती याच तालुक्याला असते. नांदगाव-देवगड मार्गावरून जाताना पावलोपावली हापूसच्या बागा दिसून येतात. हे पीक या भागातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनले आहे.

Mango Production
Mango Orchard : आमराई गेली कुठे?

शिंदे यांची शेती जिल्ह्यात देवगड-मालवण राज्यमार्गावर प्रसिद्ध कुणकेश्‍वरनजीक कातवण गाव आहे. गावात प्रशांत सीताराम शिंदे राहतात. व्यवसायाने ते शासकीय ठेकेदार म्हणून कार्यरत होते. परंतु या व्यवसायात ते फार रुळले नाहीत. किंबहुना, हा व्यवसाय त्यांच्या स्वभावाशी फारसा जुळला नाही. त्यामुळे वडिलोपार्जित आंबा व्यवसायाकडे पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला.

अर्थात ठेकेदारी व्यवसाय सुरू असताना देखील वडील, भावांसोबत आंबा बागेत काम करायचा अनुभव त्यांना होताच. त्याच जोरावर शिंदे यांनी कराराने बागा घेण्यास सुरवात केली. टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ करीत झाडांची संख्या आज दोन हजारांपर्यंत पोहोचवली आहे. स्वतःच्या बागेसोबत ते या झाडांचे व्यवस्थापनही कुटुंबीयांच्या मदतीने करतात. ही कसरत करताना सर्व सदस्यांची चांगलीच दमछाक होते. शिंदे यांची वडिलोपार्जित आठ एकर जमीन आहे. त्यात हापूसची तीनशे झाडे आहेत. आज आंबा शेतीत २५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव तयार झाला आहे.

Mango Production
Mango crop Advisory : मोहोर अवस्थेतील आंबा बागेचे व्यवस्थापन

आगाप हंगामाचे नियोजन

स्वमालकीच्या बागेतील काही झाडे आगाप हंगामासाठी ठेवली आहेत. त्यांच्यासाठी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाणी व्यवस्थापन केले जाते. १५ मेच्या सुमारास झाडांना जिवामृत देण्यास सुरुवात केली जाते. त्यानंतर दर पंधरा दिवसांनी त्याची मात्रा सुरू ठेवताना पूर्ण हंगामात आळवणी आणि फवारण्या आठ ते नऊ वेळा केल्या जातात. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेणखत, लेंडीखत प्रति झाड ४ ते ५ किलो दिले जाते. या झाडांना ऑगस्टमध्ये मोहोर येतो. त्याच्या संरक्षणासाठी कीडनाशकांची फवारणी केली जाते. जिवामृत व सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन असल्याने आंब्यात साका आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच फळाला दर्जेदार आकार, उत्तम चव आणि रंग मिळाला आहे. त्याचा फायदा चांगला दर मिळण्यासाठी होतो.

विक्री व्यवस्था

सन २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात पहिला पेटी बाजारपेठेत पाठविली. वाशी मार्केट बरोबरच गुजरात, मुंबई, सांगली, कोल्हापूर येथेही थेट विक्री होते. याशिवाय थेट मागणी करणाऱ्या ग्राहकांना आंबा पाठविण्याची व्यवस्था होते. गेल्यावर्षी एकूण सात हजार पेटी आंबा उत्पादित झाला. हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर मिळतो. जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत दर अधिक राहतो.

या कालावधीत चार डझनी पेटीला सुमारे ४ ते ५ हजार रुपये दर मिळतो. त्यानंतर बाजारपेठेत आवक वाढते. दर कमी होतात.पंधरा एप्रिलनंतरचा आंबा ‘कॅनिग’साठी दिला जातो. त्याला प्रति किलो ३० ते ३५ रुपये दर मिळतो. आगाप हंगामाचा ‘मार्केटिंग’ला चांगला फायदा होतो. पहिली पेटी गेल्यानंतर अनेक व्यापारी स्वतःहून संपर्क साधतात. एकूण वार्षिक उलाढाल दीड ते दोन कोटी रुपये होते.

आव्हानांशी झुंज

प्रचंड कष्ट करीत बागा सांभाळत असताना तौक्ते वादळाचा मोठा तडाखा बसला. त्यात सुमारे अडीच हजार आंबा पेटींचे नुकसान झाले. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात देखील मोठे नुकसान झाले. या काळात सुरुवातीच्या महिनाभर कोणतेच निश्‍चित धोरण न ठरल्यामुळे आंबा विक्रीचा मोठा प्रश्न उभा राहिला. या कालावधीत तब्बल २० लाखांचे नुकसान झाले. मात्र शिंदे डगमगले नाहीत. त्यांनी येणाऱ्या आव्हानांशी झुंज दिली. कोरोना काळात सर्व बाजारपेठा बंद होत्या. अशावेळी स्थानिक आणि राज्यातील विविध शहरांमध्ये जाऊन थेट विक्री केली. त्यातून विक्री व्यवस्थेचा अंदाज आला. आता त्यावरच अधिक भर दिला आहे.

Mango Production
Mango Management : आंबा लागवडीत नियोजन, व्यवस्थापन महत्त्वाचे

पहिली पेटी पाठवण्याचा मान

सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाळ्यात प्रचंड पाऊस सुरू असतो. यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. सततचा पाऊस, दमट वातावरण, जोरदार वारे अशा सर्व नैसर्गिक संकटांचा सामना करीत दोन डझनाची पहिली पेटी २४ नोव्हेंबरला वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात शिंदे यशस्वी झाले. पहिली पेटी पाठविण्याचा मान मिळविण्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. या पेटीला आठहजार रुपये दर मिळाला. सन २०२० मध्ये एकूण उत्पादन चार हजार ६०० पेटी, तर सरासरी दर प्रति पेटी २५०० रुपये मिळाला. सन २०२१ मध्ये सरासरी दर दोन हजार ८०० रुपये मिळाला.

आगाप हंगाम नियोजन व फायदा

भरपावसात आलेला मोहोर टिकविणे ही कोकणात अशक्यप्राय गोष्ट असते. काही बागायतदार २५ ते ३० झाडांवर हा प्रयोग दरवर्षी करीत असतात. खरे तर आगाप हंगाम व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही असे अनेक बागायतदारांचे म्हणणे आहे. यात उत्पादनखर्च अधिक येतो. मोहोर आणि त्यानंतर फळे टिकविण्यासाठी अनेक फवारण्या घ्याव्या लागतात. परंतु पहिली पेटी ‘मार्केट’ला पाठविण्याचा मान मोठा असतो. दर चांगला मिळतो. ग्राहकांमध्ये मोठी चर्चा या निमित्ताने होते.

मालवण- कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर दरवर्षी आगाप हंगामाचे नियोजन करतात. त्यांनी१६ नोव्हेंबर २०१८ मध्ये कोकणातून पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये पाठविली. त्यावेळी दहा डझनाला साडेतेरा हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये आगाप हंगामाचा माल कोल्हापूरला पाठविला. पाच डझनी पेटीला नऊ हजार रुपये दर मिळाला. सन २०२१ मध्ये फोंडेकर यांनी चार नोव्हेंबरला पुन्हा पहिली पेटी पाठविण्याचा मिळविला. दोन पेट्यांना १८ हजार रुपये दर मिळाला. त्यांच्या म्हणण्यानुसार आगाप हंगामातील आंब्याला दर चांगला मिळतोच. परंतु त्यानंतरच्या नियमित हंगामातील आंब्यालाही चांगला दर मिळतो.

प्रशांत शिंदे, ९४२११४६५५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com