Poultry Innovation: शिक्षणाने अभियंता असलेले तेजस एरंडे यांनी वडील दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली गावरान पक्षी संगोपन व्यवसाय आकारास आणण्यास सुरुवात केली आहे. सुमारे सात-आठ वर्षांचा ब्रॉयलर पक्षी संगोपनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. देशी कुक्कुटपालन व्यवस्थापनात खर्चावर नियंत्रण ठेवताना अनेक सुधारणा व सुविधा त्यांनी तयार केल्या आहेत. राज्यासह परराज्यांतील बाजारपेठा मिळवल्या आहेत. देशी अंडी व चिकनला ग्राहकांकडून चांगली मागणी असून, ही बाजारपेठ वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. .मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले तेजस एरंडे जळगावात स्थायिक झाले असून पोल्ट्री उत्पादक म्हणून त्यांची आश्वासक वाटचाल सुरू झाली आहे. त्यांचे आजोबा साहेबराव येथे शासकीय नोकरीनिमित्त आले. वडील दिनेश यांचा माल वाहतुकीसंबंधीचा व्यवसाय होता. तो बंद करून त्यांनी जळगाव शहरानजीक सावखेडी बुद्रुक शिवारात मांसल पक्षी (ब्रॉयलर) संगोपन सुरू केले. त्यातील बारकावे अभ्यासले..त्यातील संधी लक्षात घेऊन पुढे सुमारे पंधरा किलोमीटरवरील धार (ता. धरणगाव, जि. जळगाव) शिवारात एक एकर जमीन घेतली. सुमारे सात- आठ वर्षांचा ब्रॉयलर पक्षी संगोपनाचा अनुभव झाला खरा. मात्र त्या तुलनेत गावरान पक्ष्यांना असलेले मार्केट, त्यातील अधिक उत्पन्नाची संधी त्यांना खुणावू लागले. मात्र त्याकडे वळण्यापूर्वी यातील अनुभवी पोल्ट्री उत्पादक मंडळींकडे भेट दिली. संधींबरोबर धोकेही जाणून घेतले. बराच अभ्यास केल्यानंतर मग त्यांनी ब्रॉयलर पक्षी संगोपन बंद करून गावरान कुक्कुटपालन सुरू केले..Poultry Farming: कुक्कुटपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनावर भर.आजमितीला त्यात दोन वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. संगोपनगृहातील व्यवस्थापनाची जबाबदारी दिनेश व तेजस हे पितापुत्र सांभाळत आहे. तेजस अभियंता आहेत. ते ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने एका कंपनीत नोकरी करतात. धाकटे बंधू मयूर देखील अभियंता असून ते खासगी नोकरी करतात. दिनेश व तेजस या पितापुत्रांनी कामांच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. सकाळी सहा ते दुपारी दोन पोल्ट्रीची जबाबदारी तेजस यांच्यावर असते. तर त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वडील ही जबाबदारी पार पाडतात. त्यासाठी दररोज जळगाव ते धार अशी ये-जा करावी लागते..गावरान पक्षी संगोपनएरंडे यांनी आठ वर्षांच्या अनुभवातून पोल्ट्री व्यवसायात गरजेनुसार अनेक बदल केले आहेत. कमी खर्च व अधिक नफा हे सूत्र ठेवले. गावरान पक्षी जातिवंतच असावेत यादृष्टीने ते पारखून घेतले आहेत. सुमारे ९० बाय ५० फूट आकाराचे संगोपनगृह सिमेंट, पत्रा, मजबूत तारेची जाळी व रॉड्स यांच्या मदतीने मजबूतपणे तयार केले आहे. वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी तारेचे कुंपण केले आहे. संगोपनगृहाची मध्यभागेतील उंची १२ फूट तर आजूबाजूची उंची १० फूट आहे. उन्हाळ्यात संरक्षणासाठी हिरव्या नेटचा उपयोग केला जातो. अर्थात, गावरान पक्ष्यांना तापमान व वातावरणातील बदलांची मोठी बाधा होत नाही..चाळीस अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानातही हे पक्षी तग धरतात. कोंबड्यांसाठी मुक्तसंचार पद्धतीचाही वापर केला असून तेथे त्या चरतात. त्या काटक असून मरतुकीचे प्रमाण कमी आहे. ब्रॉयलर पक्ष्यांच्या तुलनेत खाद्य, औषधोपचार व वाढीसंबंधीची संप्रेरके आदींवरील खर्च ५० ते ६० टक्के कमी झाला आहे. मका धार व नजीकच्या गावांमधील शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यापासून सकस खाद्य तयार केले जाते..Poultry Business: पोल्ट्री व्यवसायातून साधली मेटकर कुटुंबीयांनी प्रगती.विक्री व्यवस्थापनसध्या एक हजारांपर्यंत पक्ष्यांची संख्या आहे. अंडी व चिकन अशा दोन्ही स्वरूपाची विक्री व्यवस्था उभारली आहे. मुंबई, हैदराबाद तसेच कर्नाटकातील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. त्यामुळे बाहेरील बाजारपेठ शोधण्याची गरज भासत नाही. दर सहा महिन्यांची बॅच असते. प्रति कोंबडी वर्षभरात ८० च्या संख्येपर्यंत अंडी देते. दररोज दोनशेच्या आसपास अंडी उपलब्ध होतात. त्यात चढ-उतार होतात..प्रति अंड्याला किरकोळ बाजारात २० रुपये दर मिळतो. खाण्यास रुचकर, सकस, अर्थात आरोग्यदायी असल्याने या पक्ष्यांना मोठी मागणी आहे. प्रति नर पक्षी ७५० ते ८०० रुपये तर मादी पक्षास सातशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. वर्षाची उलाढाल काही लाखांच्या घरात पोचली आहे. प्रति महिना एका चांगल्या कंपनीच्या पगाराप्रमाणे उत्पन्न हाती येते. हिवाळ्याच्या काळात नफ्याचे प्रमाण अधिक असतो. कारण या काळात अंडी व पक्ष्यांना मागणीही चांगली असते. देशी अंडी व चिकनला एकूणच ग्राहकांकडून चांगली असून ती पुरवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे तेजस सांगतात..पोल्ट्रीतील महत्त्वाच्या बाबीदेशी पक्ष्यांचे छोटेखानी प्रजनन केंद्र उभारले आहे. त्यामध्ये १० जातिवंत पक्षी आहेत. त्यातूनच पक्ष्यांची अधिकाधिक पैदास करण्याचा प्रयत्न केला जातो. गरजेनुसार सोलापूर येथूनही पक्षी मागवले जातात..संगोपनगृहात विजेवरील खर्च जवळपास शून्य झाला आहे. त्यासाठी सौर ऊर्जेचा आधार घेतला आहे. त्यावर आधारित दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे व सायरन व्यवस्था बसविली आहे. संगोपनगृहानजीक अनोळखी व्यक्ती आल्यास सायरन वाजतो. तेजस व दिनेश यांच्या मोबाइलवर त्याचा संदेश तत्काळ जातो. रात्रीच्या वेळेस संगोपनगृहाच्या सुरक्षेसाठी ही व्यवस्था मोठा आधार ठरली आहे. व्यवसायातील संधी लक्षात घेता पुढे पंधराशे पक्ष्यांचे संगोपनगृह उभारले जाणार आहे..धरणगाव बनलेय कुक्कुटपालनाचे क्लस्टरजळगाव जिल्ह्यातील धरणगाव परिसरातील दोनगाव, पथराड, धार, सोनवद, एकलग्न आदी भागांमध्ये क्लस्टर स्वरूपात व्यावसायिक स्वरूपातील कुक्कुटपालन वाढीस लागले आहे. सातपुडा देशी संकरित कोंबडी वाणाचे प्रजनन व मोठे व्यवस्थापनगृह दोनगाव येथे एक कंपनी चालविते. या भागात मांसल पक्षी, अंड्यांची बाजारपेठ वाढत आहे. या भागातून धुळे, गुजरात, नागपूर भागात जाण्यासाठी सुसज्ज मार्ग आहेत. तसेच मोठे हॉटेल्स, चिकन विक्री केंद्रे या भागात आहेत. यामुळे कुक्कुटपालनासाठी धरणगाव तालुक्यातील गावांना अनेक जण पसंती देत असून त्यातून व्यवसायातील अर्थकारण वाढत आहे.तेजस एरंडे ९१३०१११८५४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.