Weather Forcast : चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता नाही

Manik Khule : दक्षिण भारतातील चार राज्यांत ईशान्य हिवाळी मॉन्सून रुजू होणार आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनने परतीच्या प्रवासातील चार दिवसांच्या महाराष्ट्रातील वास्तव्यात पाऊस दिला नाही. म्हणजेच नैर्ऋत्य मॉन्सून परतीचा पाऊस देतोच असे नाही.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

अनिल जाधव
Rain Update :
दक्षिण भारतातील चार राज्यांत ईशान्य हिवाळी मॉन्सून रुजू होणार आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनने परतीच्या प्रवासातील चार दिवसांच्या महाराष्ट्रातील वास्तव्यात पाऊस दिला नाही. म्हणजेच नैर्ऋत्य मॉन्सून परतीचा पाऊस देतोच असे नाही. सप्टेंबर महिन्यात पूर्वा ते हस्त अशा तीन नक्षत्रांचा पाऊस हा परतीचा पाऊस समजण्याची गफलत शेतकऱ्यांकडून होते. खरं तर तो नैर्ऋत्य मॉन्सूनचा पाऊस असतो. दक्षिणेकडील चार राज्यांत सुरू झालेल्या ईशान्य माॅन्सूनचा पाऊस बघून आपल्याकडेही पाऊस होऊ शकतो, अशी काहीशी कल्पना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनात असते... पावसाचं हे सगळं गणित उलगडून सांगताहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे.

नैर्ऋत्य माॅन्सून अखेर परतला; पण मग काय दिले या माॅन्सूनने?
- मॉन्सून सुरू होण्यापूर्वीच तीन-चार महिने अगोदरपासूनच मॉन्सूनच्या चार महिन्यांचा अंदाज आणि त्यातील प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला त्या त्या महिन्याच्या पावसाचा मासिक अंदाज याची आगाऊ माहिती मिळत गेली. एकूण चार महिन्यांत घडून आलेल्या विविध वातावरणीय प्रणाल्या, त्यांच्याशी संबंधित घडामोडी, त्यातून पडू शकणाऱ्या पावसासंबंधी बऱ्याच वल्गना या कालावधीत आपण ऐकल्यात. काही खऱ्या ठरल्या तर काही आभासीच राहिल्या. त्यातलं खरं-खोटं लगेचच लक्षात येतं. पण सर्वसामान्य जनता, शेतकरी, मीडिया व हवामान विभाग या प्रत्येकाने आपापल्या चिकित्सक नजरेतून मॉन्सून कसा अनुभवला? माॅन्सूनने त्यांना काय दिले? हे हवामान शास्त्राच्या विश्‍वासर्हतेसाठी बघणे नक्कीच आवश्यक आहे.

इंडियन ओशन डायपोल (आयओडी) विशेष प्रभावी राहिला नाही, म्हणजेच धन अवस्थेकडे झुकला नाही. ‘एल निनो’चाही पाहिले तीन महिने प्रभाव नव्हता. आणि दोघांचे आगमनही ऑगस्टअखेरपर्यंत झाले नाही. त्यामुळे भाकिताप्रमाणे पाऊस पडण्याची वाट पाहावी लागली. तरीदेखील एल- निनो वर्षात जून व ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट जाणवली. शिवाय देशात असमान वितरणात पाऊस झाला. देशात ८७ सेंमी पावसाची अपेक्षा असताना ८२ सेंमी पाऊस झाला. हवामान शास्त्रीय भाषेत सरासरी इतका असला, तरी तो सरासरीच्या किमान टोकाकडे होता.

Weather Update
Weather Update : राज्यात हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता

ऑक्टोबर ते जानेवारी या काळात महाराष्ट्रात पाऊस होईल की नाही?
- दक्षिण भारतातील संपूर्ण तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या काही भागांत ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने कार्यरत असणारा ईशान्य माॅन्सूनही यंदा सरासरी इतकाच असण्याचा अंदाज आहे. एरवी या मॉन्सूनचा प्रभाव आणि बंगाल उपसागरातून येणारे एखादे-दुसरे चक्रीवादळ यामुळे महाराष्ट्रात एखादा-दुसरा पाऊस या काळात होऊन जातो. परंतु यंदा मात्र ती शक्यता कमीच मानली जात आहे. कारण दक्षिणेत सामान्य ईशान्य माॅन्सून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या उत्तर क्षेत्रात हवेचे कमी दाब क्षेत्रे व चक्रीवादळे निर्माण होऊन महाराष्ट्राच्या दिशेने कूच करण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. म्हणूनच ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात बे-मोसमी (अवकाळी) पावसाची शक्यता कमी जाणवते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या ऑक्टोबर हीट जाणवत आहे. पण ही ऑक्टोबर हीट म्हणजे नेमकी काय असते?
- ऑक्टोबर महिन्यात माॅन्सून महाराष्ट्रातून परतत असतो. त्यानंतर हळूहळू हवेचा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या अक्षवृत्ताकडून दक्षिणेकडील अक्षवृत्ताकडे सरकत असतो. संपूर्ण उत्तर भारत व महाराष्ट्रावर उच्च दाब क्षेत्र तयार होत असते. तेव्हा सध्याच्या संथ नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची जागा ईशान्य मोसमी वारे घेतात. आणि हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या आसची (ट्रफ) जागा हवेच्या उच्च दाब क्षेत्राचा पोळ (रिज) घेतो. दरम्यान नैर्ऋत्येकडून वाहणारे वारे क्षीण होत आलेले असतात. ईशान्यकडील वारे नैर्ऋत्येकडे वहनाच्या तयारीत असतात. म्हणजेच एकंदरीत ऑक्टोबरच्या या २०-२५ दिवसांत महाराष्ट्र व सभोवतालच्या राज्यात वारे वाहत नाहीत. वारे पूर्णपणे शांत अवस्थेत असतात. त्यामुळे आपल्याला ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर ईशान्येकडून वा पूर्वेकडून येणारे वारे अंगावर आल्यासारखे जाणवू लागतात. निसर्गाचा हा दरवर्षीचा नित्यनेम असतो. आता महाराष्ट्रावर असलेले हे हवेच्या उच्च दाबाचे पार्सल, तसेच राहून विस्कळीत न होता एकजिनसी एकवटून बांधलेले राहते. ऑक्टोबरच्या हीटमुळे हवा पूर्णपणे समान तापते. आकाश पूर्णत: निरभ्र नसल्यामुळे रात्रीतून पहाटेपर्यंत उष्णतेचे पूर्णपणे उत्सर्जन होत नाही, म्हणजे जमीन पूर्णपणे थंड होत नाही. अनेक दिवस सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे या शेष उष्णतेचे संचय होऊन दिवसागणिक हवेच्या गोठोडेरूपी पार्सलमध्ये उष्णता वाढते. ती आपला घाम काढते.

मुंबईत तर ही स्थिती अधिक तीव्र असते. कारण मुंबई असे बेट आहे, की जिथे सर्वसाधारण समुद्रसपाटीपेक्षा खोली अधिक आहे. हवेच्या दाबाची उंची अधिक असते. त्यामुळे उष्णतेचा परिणाम अधिक जाणवतो. मुंबईतून माॅन्सून निघून गेलेला असतो. आकाश निरभ्र असते. त्यामुळे उष्णता जमिनीवर अधिक पोहोचते. हवा कोरडीच असते. आर्द्रता काहीशी कमी होऊन ७० टक्क्यांपर्यंत येते. कमाल तापमान ३० ते ३४ अंशांदरम्यान असते. पाऊस शक्यतो होत नाही. कारण मुंबईची ऑक्टोबर महिन्याची मासिक सरासरी ७ ते ८ सेंमी असते. दिवसाचे १२ तास पूर्ण उष्णता मिळते. किनारपट्टीवरून वाहणारे दैनिक खारे वारे संथ झाल्यामुळे समुद्राचा थंडावा उशिरा मुंबईच्या भूभागावर पोहोचतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये मुंबई अधिक तापते व जिवाची घालमेल होते. यंदा ऑक्टोबरमध्ये कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हीट चांगलीच जाणविण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा परिणाम कायम राहू शकतो; परंतु त्यानंतर होणाऱ्या बदलाच्या निरीक्षणावरून पुढील भाकित वर्तवता येईल.

नोव्हेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत. त्यात खरंच तथ्य आहे का?
- वेगवेगळ्या देशांचे मॉडेल बघून स्वतःला अभ्यासक म्हणवणारे ऊठसूट काहीही भाकितं करत आहेत. अशा मंडळींचा सध्या सुळसुळाट झालाय. ते मॉडेल काय सांगते यापेक्षा याला त्यातले काय कळले, त्यानुसार डिजिटल मीडियात बातम्यांचं पेव फुटलं आहे. नोव्हेंबर महिन्यात पावसाचा अंदाज हा त्यातलाच प्रकार आहे. दक्षिण भारतात कार्यरत असणाऱ्या ईशान्य माॅन्सूनसाठी तयार होणाऱ्या प्रणाल्यांतून एखादी प्रणाली व्यापक क्षेत्र काबीज करत महाराष्ट्रापर्यंत पोहोचली किंवा बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ रस्ता बदलून महाराष्ट्राकडे झुकले, तरच महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये पाऊस होतो. आणि तो होतोच असे नाही. तसे काही घडणार असेल तर आठ-दहा दिवस अगोदर ते कळते. त्यानुसार हवामान विभाग आगाऊ सूचना देतच असतो. त्यामुळे आताच नोव्हेंबरच्या पावसाबाबत वल्गना करणाऱ्या या बातम्यांना महत्त्व देऊ नये, असे वाटते.

रब्बी पेरण्यांचं चित्र काय राहील?
- रब्बीत ज्वारी, हरभरा, मका, लाल व रांगडा कांदा यांच्या लागवडी ऑक्टोबर महिना किंवा त्या अगोदरही उरकल्या जातात. तर गहू, साठवणीचा गावठी उन्हाळ कांदा यांच्या लागवडी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होतात. उन्हाळ भुईमूग, सोयाबीन यांच्या पेरण्या जानेवारीत होतात. परंतु त्यासाठी आधी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये भरपूर पाऊस होणे गरजेचे असते. तसेच नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये बेमोसमी पाऊस आणि उत्तरेकडून थंडीचे लवकर आगमन होणे गरजेचे असते. तसेच भरपूर दिवसाचे निरभ्र आकाश असले पाहिजे आणि २६ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत गारपीट व्हायला नको असते. यंदा उत्तर भारतात तयार होणारे पश्‍चिमी झंजावातच थंडी, गारपीट नियंत्रित करू शकतील. एल-निनोच्या वर्षात चांगल्या थंडीची अपेक्षा करूया. दरवर्षी प्रमाणेच १५ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात हळूहळू थंडी पडेल असे वाटते. परंतु त्या दरम्यानचे एखादे चक्रीवादळ त्यात काय अडथळा आणू शकते, यावर थंडीचे आगमन अवलंबून असेल.

पुढील वर्षीच्या मॉन्सूनवर सुपर एल-निनोचा परिणाम होऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. त्याबद्दल काय सांगाल?
- पुढील वर्षी सुपर एल-निनोची शक्यता व देशाच्या माॅन्सूनवर त्याचा होणारा नकारात्मक परिणाम याच्या शक्यता वर्तवणारी ‘नोआ’ची बातमी सध्या व्हायरल झाली आहे. परंतु अजून चित्र स्पष्ट नाही. कारण पुढील वर्षीच्या मॉन्सून अंदाजासाठी ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ पर्यंतचे जागतिक पातळीवरचे वेगवेगळी निरीक्षणे बाकी आहेत. जसे की, युरोपातील जानेवारीतील तापमान, फेब्रुवारी-मार्चमधील प्रशांत महासागरातील गरम पाण्याचे आकारमान, विसंगती, डिसेंबरमधील वायव्य प्रशांत व अटलांटिक तसेच म्यानमारजवळील फेब्रुवारीतील महासागराचे पाण्याचे तापमान, उत्तर अटलांटिकाजवळील मे महिन्यातील हवेचा दाब, तसेच उत्तर मध्य प्रशांत महासागरावरील मे महिन्यातील भागानुसार वाऱ्याच्या वेगातील फरक इत्यादी निरीक्षणे बाकी आहेत. मागील वर्षीही फेब्रुवारी २०२२ मध्येचएल-निनो जूनपासूनच कार्यरत होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु प्रत्यक्षात त्याचा परिणाम किंवा उगम आता सप्टेंबरमध्ये आपण पाहत आहोत. त्यामुळे सुपर एल-निनोबद्दल सध्या लक्ष ठेवून राहणे, वाट बघणे योग्य ठरेल.

येत्या पंधरवड्यात चक्रीवादळ येणार, अशा बातम्या शेतकऱ्यांना संभ्रमात पाडत आहेत. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल का?
- अरबी समुद्रात केरळ राज्यातील कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्ताच्या दरम्यान पण लक्षद्विप बेटांच्याही अति पश्‍चिमेकडे आज कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते २६ ऑक्टोबरनंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होऊन ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता नाही. दक्षिण पाकिस्तान अथवा कच्छ किनारपट्टीमार्गे देशाच्या भू-भागावर चक्रीवादळ प्रवेश करण्याची शक्यता कमी जाणवते. त्यामुळे या कोणत्याही चक्रीवादळाचा परिणाम होऊन महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता सध्या तरी जाणवत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com