डॉ. रामचंद्र साबळे
Weather Forecasting : महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज (ता. २९) ते मंगळवार (ता. ३१) या कालावधीत १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. बुधवार ते गुरुवार (ता.१ ते २ नोव्हेंबर) या कालावधीत हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. जेव्हा हवेच्या दाबात वाढ होते, तेव्हा तापमानात घसरण होते. शुक्रवारी (ता.३ नोव्हेंबर) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यामुळे तापमानात चढ-उतार जाणवेल.
उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. त्यामुळे उत्तर भारतातील थंड वारे दक्षिण दिशेने वाहण्यास सुरुवात होईल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता नाही. कमाल व किमान तापमान घसरण्यास या आठवड्याच्या अखेरीस सुरुवात होईल.
प्रशांत महासागर, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस इतके समान राहील. त्यामुळे ‘एल निनो’चा प्रभाव जाणवणार नाही. सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे हवामान कोरडे राहील. यापुढील काळात ऑक्टोबर हीट कमी होत जाईल.
१ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत सरासरी इतका पाऊस झालेला आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यांत या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ८५ टक्के कमी पाऊस झाला आहे. तसेच नांदेड, यवतमाळ, वाशीम, अकोला, अमरावती, बुलडाणा, जळगाव, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नगर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ९० टक्के कमी पाऊस झालेला आहे.
कोकण ः
या आठवड्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील.
मात्र रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ५३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ४० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. सर्व जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर धुळे जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २१ टक्के इतकी कमी राहील. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा धुळे जिल्ह्यात पूर्वेकडून, तर नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
मराठवाडा ः
धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान परभणी, जालना, बीड व छ. संभाजीनगर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २६ टक्के राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात ताशी १३ किमी, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ताशी ५ ते ८ किमी इतका राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती या चारही जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. या सर्व जिल्ह्यांत कमाल तापमानात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील.
बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
या आठवड्यात यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५७ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आद्रता २६ ते ३३ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील.
आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग अत्यंत कमी म्हणजे ३ ते ४ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ५१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ३७ टक्के व सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २१ ते २७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
कृषी सल्ला ः
- पिकांना सिंचन करण्यासाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
- हळव्या भात जाती परिपक्व होताच कापणी करून झोडणीची कामे करून घ्यावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.