Weather News : थंडीचा कडाका वाढणार

Weather Update : विदर्भातील संपूर्ण ११ व खानदेशातील ३ जिल्ह्यासह नाशिक, नगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी अशा महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात सोमवार (ता. १८) डिसेंबर पासून दिवसाच्या थंडीबरोबर रात्रीच्याही थंडीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Cold Weather Nashik
Cold Weather NashikAgrowon
Published on
Updated on

माणिकराव खुळे
कशी असेल महाराष्ट्रातील थंडी?

Cold Sesaon : - विदर्भातील संपूर्ण ११ व खानदेशातील ३ जिल्ह्यासह नाशिक, नगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी अशा महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात सोमवार (ता. १८) डिसेंबर पासून दिवसाच्या थंडीबरोबर रात्रीच्याही थंडीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ व उर्वरित दक्षिण महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर अशा एकूण १४ जिल्ह्यात मात्र सध्या जाणवत असलेली थंडी आहे त्याच पातळीत टिकून राहू शकते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र तिथेही थंडी वाढण्याचा अंदाज आहे. गुजरात किनारपट्टीबरोबरच मुंबई किनारपट्टीवरही ताशी १५ ते २० किमी वेगाचे वारे वाहतील. त्यामुळे मुंबईकरांनाही हलक्या बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागेल.

महाराष्ट्रातील कमाल - किमान तापमानाच्या नोंदी काय श्रेणीच्या असतील?
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान साधारण १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या आसपास, तर दुपारचे कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या आसपास जाणवेल. ही दोन्हीही तापमान  सरासरी तापमानापेक्षा एखाद्या अंशाने कमीच असतील.


विदर्भातील पहाटेचे किमान तापमान हे १० ते १२ अंश सेल्सिअसच्या आसपास जाणवेल, असे वाटते. एकंदरीत डिसेंबरच्या थंडीच्या मासिक भाकितापेक्षा अधिक चांगली थंडी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये राहू शकेल, असे वाटते.
या उर्वरित डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.

Cold Weather Nashik
Cold Weather : नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

महाराष्ट्रात कशामुळे थंडीची शक्यता निर्माण झाली?
उत्तर भारतात वायव्येकडून पूर्वेकडे मार्गस्थ होत असलेल्या पश्चिमी झंजावातांच्या साखळीतून सध्या तेथे थंडी व बर्फ पडत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याच्या वहनासाठी अनुकूल इतक्या कमी दाबाची क्षेत्रेही सध्या मध्य प्रदेशासह महाराष्ट्रावर अस्तित्वात येत आहेत.                

त्यामुळे मध्य प्रदेशाबरोबर ईशान्येकडील जोरदार थंड वारे महाराष्ट्राच्या भू-भागावर ओढले जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम कडाक्याच्या थंडीचा प्रभाव वाढण्यामध्ये होणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या महिन्यात पारा अधिक घसरून, महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरी किंवा त्याखालची पातळी गाठू शकेल.

थंडीचा उत्तर भारतावर होणारा परिणाम कसा असेल?
उत्तर भारताचा संपूर्ण पट्टा सध्या धुक्याच्या चादरीत लपेटलेला आहे.  तेथील किमान तापमान सध्या ४ ते ८ अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे. तेथील दृश्यमानता भागपरत्वे ५०० ते २०० मीटरच्या आत खालावली असून, रेल्वे व विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवत आहे.

एकंदरीत पाऊस, बर्फ, थंडी, धुके काहीसे जाणवत असले तरी उत्तर भारतातील हिवाळी पर्यटनास वातावरण ठीकच समजले जाईल, असे वाटते.

रब्बी हंगामासाठी महाराष्ट्रात या थंडीची उपयोगिता -
- या वर्षीच्या ‘एल-निनो’ मुळे ईशान्य मॉन्सून दक्षिण भारतातच १५ अंश अक्षवृत्तीय सीमारेषेदरम्यानच्या क्षेत्र मर्यादेतच कार्यरत राहिला. त्यामुळे महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहिले. त्याच प्रमाणे या वर्षी हिवाळी हंगामात शीत- लहरींची संख्याही दरवर्षीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता डिसेंबर महिन्यातील सध्याची थंडी ही रब्बी हंगामासाठी नक्कीच पूरक व जमेचीच बाजू समजावी.

कारण मागील वर्षी २०२२ ला याच दिवसात महाराष्ट्रातील डिसेंबरातील थंडी ‘मॅन-दौंस’ या चक्रीवादळामुळे हिरावली गेली होती. परंतु ‘ला-निना’ होता म्हणून चांगल्या पर्जन्यामुळे रब्बी हंगाम तरून गेला होता.
केरळ, तमिळनाडू राज्यात येत्या दोन तीन दिवसात ईशान्य मॉन्सूनच्या हंगामातील शेवटच्या टप्प्यातील पावसाची शक्यता अजूनही दिसत आहे.

(निवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग, पुणे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com