Global Warming : तापमान वाढ थांबता थांबेना

Temperature Increase : जागतिक तापमान वाढ ही गंभीर समस्या ठरत आहे. २०२४ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वांत उष्ण ठरले आहे. जागतिक हवामान संस्थेने सहा आंतरराष्ट्रीय नोंदींच्या एकत्रित विश्‍लेषणानंतर ही घोषणा केली आहे.
Temperature
TemperatureAgrowon
Published on
Updated on

Pune News : जागतिक तापमान वाढ ही गंभीर समस्या ठरत आहे. २०२४ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वांत उष्ण ठरले आहे. जागतिक हवामान संस्थेने सहा आंतरराष्ट्रीय नोंदींच्या एकत्रित विश्‍लेषणानंतर ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे गेली दहा वर्षे विक्रमी तापमानाच्या क्रमवारीत सर्वांत वरच्या क्रमांकावर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जागतिक पृष्ठभागाचे सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक कालावधीतील (१८५० ते १९००) सरासरी तापमानापेक्षा जवळपास १.५५ अंशांनी अधिक आहे. यात ०.१३ अंशाची तफावत गृहीत धरण्यात आली आहे. जागतिक हवामान संस्थेच्या विश्‍लेषणानुसार २०२४ हे जागतिक सरासरी तापमान सर्वाधिक असलेले पहिले वर्ष ठरले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान बदल वाटाघाटी प्रक्रियेअंतर्गत जागतिक हवामान संस्थेने युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, जपान मेटेरॉलॉजिकल एजन्सी, नासा, अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (नोआ), इंग्लंडच्या (युके) मेट ऑफिस युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया येथील क्लायमेटिक रिसर्च युनिट आणि बर्कले अर्थ या स्रोतांकडून उपलब्ध झालेल्या तापमान नोंदीचे विश्‍लेषण केले आहे. या सर्व संस्थांच्या नोंदी या २०२४ हे वर्ष सर्वांत उष्ण वर्ष असल्याचे ठळक करतात.

Temperature
Maharashtra Rain Alert : राज्यातील आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज; काही भागात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी

जागतिक हवामान संस्थेच्या सरचिटणीस सेलेस्टे साऊलो म्हणाल्या, ‘‘हवामानाचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर आहे. आमच्याकडे केवळ एक किंवा दोन विक्रमी उष्ण वर्षे नाहीत, तर संपूर्ण दहा वर्षांची ही मालिका आहे. मानवी हस्तक्षेप आणि वाढत्या हरित गृह वायूच्या पातळीमुळे समुद्राची वाढती पातळी, बर्फ वितळणे आणि तीव्र स्वरूपाच्या हवामान घटना अनुभवायला मिळत आहेत.’’

‘‘एका वर्षात १.५ अंशापेक्षा जास्त तापमान वाढ म्हणजे पॅरिस कराराच्या दीर्घकालीन तापमानाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात आपण अयशस्वी झालो आहोत असे नाही. ही उद्दिष्टे वैयक्तिक वर्षाच्या ऐवजी दशकांमध्ये मोजली जातात. मात्र तापमान वाढीचा प्रत्येक अंश महत्त्वाचा आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या खाली किंवा अधिक पातळीवर असली तरी जागतिक तापमान वाढ मानवी जीवन, अर्थव्यवस्थांवर आणि आपल्या ग्रहावर होणारे परिणाम वाढवते,’’ असेही सेलेस्टे साऊलो म्हणाल्या.

दरम्यान, ‘ॲडव्हान्सेस इन ॲटमॉस्फेरिक सायन्सेस’मध्ये प्रकाशित केलेल्या एका वेगळ्या अभ्यासात असे आढळून आले आहे, की २०२४ मध्ये समुद्रातील तापमान वाढ ही विक्रमी उच्च तापमानात महत्त्वाची भूमिका बजावते. चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲटमॉस्फेरिक फिजिक्सच्या प्रोफेसर लिजिंग चेंग यांच्या नेतृत्वाखाली ५४ शास्त्रज्ञ आणि ३१ संस्थांच्या अभ्यासानुसार, केवळ समुद्र पृष्ठभागावरच नव्हे तर त्यावरील २००० मीटरच्या उंचीपर्यंतचे तापमान आतापर्यंतचे सर्वांत उष्ण ठरले आहे.

Temperature
Maharashtra Weather Forecast : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

इन्स्टिट्यूट ऑफ ॲटमॉस्फेरिक फिजिक्सच्या अभ्यासानुसार जागतिक तापमान वाढीच्या अतिरिक्त उष्णतेपैकी सुमारे ९० टक्के उष्णता समुद्रात साठवली जाते. ज्यामुळे समुद्रातील उष्णतेचे प्रमाण हवामान बदलाचे महत्त्वपूर्ण सूचक बनतात. २०२३ ते २०२४ या कालावधीत जागतिक महासागराच्या वरील २००० मीटरपर्यंतच्या उष्णेतमध्ये १६ जेट्टाज्युल्स एवढी वाढ झाली आहे. ही वाढ २०२३ मधील एकूण जगातील वीज निर्मितीच्या तब्बल १४० पट आहे.

जागतिक हवामान संस्थेतर्फे मार्च २०२५ मध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट २०२४’ या अहवालात हरितगृह वायू, पृष्ठभागाचे तापमान, महासागरातील उष्णता, समुद्र पातळीत वाढ, हिमनद्यांची स्थिती आणि समुद्रातील बर्फाचे प्रमाण यांसह मुख्य हवामान बदल निर्देशकांसह उच्च प्रभाव असलेल्या घटनांचे तपशील प्रसिद्ध केला जाणार आहे.

जागतिक तापमान वाढ हे कठोर वास्तव आहे. वैयक्तिक वर्षामध्ये १.५ अंश मर्यादा ओलांडण्याने आपण दीर्घकालीन उद्दिष्टात कमी पडलोय असे म्हणता येणार नाही. मात्र योग्य मार्गावर येण्यासाठी आपल्याला आणखी कठोर संघर्ष करावा लागेल. २०२४ मधील तापमानाचा विचार करून २०२५ हवामान कृती आराखडा आवश्यक आहे. हवामानातील सर्वांत वाईट आपत्ती टाळण्यासाठी अजून वेळ आहे. पण नेत्यांनी आता कृती केली पाहिजे.
अँतोनियो गुतेरेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र संघटना

- २०१५ ते २०२४ ही आतापर्यंतची सर्वांत उष्ण दहा वर्षे.

- १८५० ते १९०० या कालावधीच्या सरासरीपेक्षा १.५ अंशाहून अधिक तापमान असलेले २०२४ हे एकमेव वर्ष

- हे निष्कर्ष काढण्यासाठी सहा आंतरराष्ट्रीय नोंदींचा वापर

- २०२४ मध्ये जमीन आणि समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तसेच महासागरातील उष्णता असाधारण.

- पॅरिस करारानुसार दीर्घकालीन तापमान लक्ष्य अद्याप टिकून, मात्र गंभीर पातळीवर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com