Agriculture Impact of Super El Nino: जगभरातील हवामान व्यवस्थेला मोठा धक्का देऊ शकणारा ‘सुपर एल निनो’ वेगाने आकार घेत असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने दिला आहे. प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान एल निनोच्या मर्यादेपेक्षा झपाट्याने वाढत असून, वातावरणीय परिस्थितीही या प्रक्रियेला अधिक बळ देत आहे. त्यामुळे भारतात मॉन्सून हंगामातील पावसावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे..हवामान तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती कायम राहिल्यास १९५० नंतरच्या सर्वांत शक्तिशाली एल निनो घटनांपैकी एक यंदा अनुभवायला मिळू शकते. त्यामुळे भारतासह जगभरात दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, उष्णतेच्या लाटा आणि शेती उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाच्या सदर्न हेमिस्फिअर मॉनिटरिंग रिपोर्टनुसार, एल निनो आता अधिकृतपणे सक्रिय झाला आहे. मध्य प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान एल निनोच्या आवश्यक मर्यादेपेक्षा अधिक झाले असून, महासागर आणि वातावरण यांच्यातील परस्परसंवाद अधिक मजबूत होत आहे. हा परस्परसंवाद एल निनोची तीव्रता आणखी वाढवत असतो. त्यामुळे यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत एल निनो कायम राहण्याची शक्यता हवामान मॉडेल्सनी व्यक्त केली आहे..Super El Nino 2026 : सुपर एल निनोचा धोका वाढला; ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा इशारा.शेतीवर मोठा परिणाम शक्यसुपर एल निनोचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसू शकतो. भारतात विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या धान, मका, सोयाबीन, कापूस, डाळी आणि ऊस यांसारख्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसात खंड पडल्यास पेरण्या उशिरा होणे, पिकांची वाढ खुंटणे, उत्पादन घटणे आणि शेती खर्च वाढणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यापूर्वीच्या २०१५-१६ आणि २०२३-२४ च्या एल निनो काळात जगातील अनेक देशांमध्ये दुष्काळ, पीक नुकसान, जनावरांचे नुकसान, अन्नधान्याच्या किमतीत वाढ आणि अन्नसुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. २०१५-१६ च्या एल निनोमुळे जगभरातील ६ कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले होते..भारतीय मॉन्सूनच्या दृष्टीने पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. एकीकडे प्रशांत महासागरातील एल निनो वेगाने बळकट होत आहे, तर दुसरीकडे हिंद महासागरातील आयओडी सकारात्मक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दोन्ही हवामान प्रणालींच्या परस्पर परिणामावर यंदाच्या मॉन्सूनचे स्वरूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोमुळे पावसात खंड किंवा तूट निर्माण होण्याचा धोका कायम असला, तरी सकारात्मक आयओडी सक्रिय झाल्यास त्याचा काही प्रमाणात समतोल साधला जाऊ शकतो. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत प्रशांत आणि हिंद महासागरातील बदल, मॉन्सूनची प्रगती आणि पावसाचे वितरण याकडे कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे..EL Nino: एल निनो ७० वर्षांतील सर्वाधिक शक्तिशाली.दोन आठवड्यांत तापमानात मोठी वाढऑस्ट्रेलिया हवामान विभागाच्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात निनो ३.४ निर्देशांक +१.२४ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला आहे. एल निनो जाहीर करण्यासाठी आवश्यक मर्यादा +०.८० अंश सेल्सिअस असते. केवळ गेल्या दोन आठवड्यांत या निर्देशांकात ०.३ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. जगभरातील सर्व प्रमुख हवामान मॉडेल्स पुढील काही महिन्यांत प्रशांत महासागराचे तापमान आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त करत आहेत. समुद्राच्या तापमानाबरोबरच वातावरणीय स्थितीही एल निनोच्या विकासाला अनुकूल झाली आहे. प्रशांत महासागरावरील मोसमी वारे नेहमीपेक्षा कमकुवत झाले असून, काही भागांत ते उलट दिशेने वाहत आहेत. तसेच डेट लाइनजवळ ढगांचे प्रमाण वाढले आहे..ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाच्या अहवालासह युरोपियन कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस आणि कोपर्निकस मरीन सर्व्हिस यांनीही जागतिक महासागरांच्या तापमानाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. मे २०२६ हा १९०० नंतरचा सर्वाधिक उष्ण मे महिना ठरला आहे. तसेच २१ जून रोजी जागतिक समुद्रपृष्ठाचे तापमान २०.८६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे २०२३ आणि २०२४ मधील विक्रमांपेक्षाही जास्त आहे. तर यंदा जून महिन्यात ही तफावत आणखी वाढली असून, वर्षातील या कालावधीसाठी तो नवा उच्चांक ठरला आहे..तीव्र स्वरूपाचे बदल?हवामान शास्त्रज्ञांच्या मते, महासागरांचे वाढते तापमान आणि एल निनो एकत्र आल्यास जगभरात हवामानातील तीव्र टोकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. उष्ण महासागर वातावरणात अधिक उष्णता आणि आर्द्रता सोडतात. त्यामुळे अनेक भागांत अतिवृष्टी, महापुर, चक्रीवादळांची तीव्रता वाढणे, तर काही भागांत तीव्र दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ शकतात. समुद्राचे तापमान वाढल्याने समुद्राची पातळी वाढणे, हिमनद्या वितळणे आणि सागरी परिसंस्थांवर ताण वाढण्याचीही शक्यता आहे. .तसेच मरीन हीटवेव्ह म्हणजेच समुद्रातील असामान्य उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होऊ शकतात. याचा परिणाम मासेमारी, किनारी अर्थव्यवस्था आणि सागरी जैवविविधतेवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान तज्ज्ञांच्या मते, सकारात्मक आयओडी भारतासाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरू शकतो. कारण अशा स्थितीत हिंद महासागरातून भारताकडे अधिक आर्द्रता येते आणि अनेकदा एल निनोमुळे होणाऱ्या पावसाच्या तुटीची तीव्रता कमी होऊ शकते. मात्र सकारात्मक आयओडी नेमका कधी तयार होईल आणि तो किती प्रभावी ठरेल, याबाबत अद्याप निश्चितता नाही..‘आयओडी’ सध्या तटस्थ; पण सकारात्मक होण्याची शक्यताभारताच्या मॉन्सूनवर प्रभाव टाकणारा आणखी एक महत्त्वाचा हवामान घटक म्हणजे इंडियन ओशन डायपोल म्हणजेच आयओडी सध्या तटस्थ अवस्थेत आहे. २७ जून रोजी आयओडी निर्देशांक -०.०२ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या हवामान मॉडेल्सनुसार, दक्षिण गोलार्धातील हिवाळा आणि वसंत ऋतूत सकारात्मक आयओडी विकसित होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.