
Weather Forecast : यंदा देशात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस (Rain Update) होण्याची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान संस्थेने सोमवारी (ता. १०) जाहीर केला आहे. महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण (Rain Forecast) कमी राहील, असे स्कायमेटने म्हटले आहे.
स्कायमेटने ४ जानेवारी २०२३ रोजी यंदा पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी राहण्याचा प्राथमिक अंदाज दिला होता. त्यावर आजच्या अंदाजामुळे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
यंदा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (Long Period Average-LPA) ९४ टक्के पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. यात ५ टक्के कमी किंवा अधिक तफावत गृहित धरली आहे. मॉन्सूनचा कालावधी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा असतो.
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणाले, ‘‘ ला निना या घटकामुळे गेली सलग चार वर्षे सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परंतु आता ला निना संपुष्टात आला आहे. एल निनो या घटकाची संभाव्यता वाढली आहे. एल निनो परत आला तर मॉन्सून कमजोर राहू शकतो. ''
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात जुलै आणि ऑगस्ट या महत्त्वाच्या महिन्यांत पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे जूनमध्ये दीर्घकालिन सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस होऊ शकतो, जुलैमध्ये सरासरीच्या ९५ टक्के, ऑगस्टमध्ये ९२ टक्के, सप्टेंबरमध्ये ९० टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.
स्कायमेट ही हवामानविषयक अंदाज व्यक्त करणारी खासगी संस्था आहे. यापूर्वी या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजावरून बऱ्याच उलट-सुलट चर्चा झालेल्या आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) या सरकारी संस्थेने अद्याप यंदाच्या मॉन्सूनचा दीर्घकालिन अंदाज जाहीर केलेला नाही. आयएमडीचा अंदाज आल्यानंतर यंदाच्या हंगामात ढोबळ पाऊसमान कसे राहील, याचे चित्र आणखी स्पष्ट होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.