
Rainfall Prediction: आजचा दिवस (ता. २३) जागतिक हवामान दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. या वर्षीची थीम ‘लवकर इशारा देण्याची तफावत बंद करणे अशी आहे. ‘वेळेवर इशारे देणे आणि वेळेवर योग्य कार्यवाही करणे’ अशी आहे. हवामान विषयक मोठ्या समस्या टाळण्यासाठी तसे करणे गरजेचे आहे. वादळे वारे काही तासांत प्रचंड नुकसान करू शकतात. लवकर इशारा दिल्यास त्वरित उपाययोजना करून संभाव्य आर्थिक नुकसान आणि जीवितहानी टाळणे शक्य होईल.
महाराष्ट्रावर या आठवड्यात १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्य आहे. कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यानंतर हवेचे दाब कमी होतात. बुधवार (ता.२६)पासून हवेचे दाब कमी राहतील. त्यामुळे वाऱ्याच्या दिशेत बदल होईल. हिंदी महासागराच्या व अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यातून मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्मिती होईल. हवामान ढगाळ राहील. आज (ता.२३) भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर व वर्धा जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहून पावसाची शक्यता निर्माण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतातून काढलेली हळद शिजवून वाळत घातली असल्यास. ताडपत्रीने झाकून ठेवावी.
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १८ अंश सेल्सिअस, व इक्वॅडोरजवळ २८ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव अल्प प्रमाणात राहील.
कोकण
कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६२ ते ६९ टक्के, तर पालघर व रत्नागिरी जिल्ह्यांत ७० ते ७१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६० ते ६८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे जिल्ह्यात ३६ टक्के, नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत ४० ते ४५ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ५० टक्के, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत १० ते १२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ४ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान नांदेड व परभणी जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर उर्वरित धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. या पुढील काळात कमाल तापमानाची तीव्रता वाढत जाईल. किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर जालना, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, तर बीड व परभणी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः निरभ्र राहील. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३० ते ३८ टक्के, तर धाराशिव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत ४० ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता हिंगोली व जालना जिल्ह्यांत १० ते १२ टक्के इतकी कमी राहील. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २४ टक्के आणि बीड जिल्ह्यात ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य, आग्नेय व वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर अमरावती जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात २७ टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३५ ते ३८ टक्के आणि वाशीम जिल्ह्यात ४३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत १५ ते १८ टक्के व वाशीम जिल्ह्यात २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ३३ टक्के, नागपूर जिल्ह्यात ३७ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यात ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १५ ते १७ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यात आज (ता. २३) १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत आज (ता.२३) १५ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. सर्व जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३७ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्यात ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १७ ते १८ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २० ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ११ कि.मी. आणि चंद्रपूर जिल्ह्यात १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान सातारा, पुणे व अहिल्यानगर व कोल्हापूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस आणि पुणे जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३३ ते ३८ टक्के, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ५० टक्के राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे व अहिल्यानगर व सातारा जिल्ह्यांत २० ते २१ टक्के, तर सांगली जिल्ह्यात ३३ टक्के आणि कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत ४३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा पूर्व, ईशान्येकडून राहील.
कृषी सल्ला
पूर्व व मध्य विदर्भात पावसाची शक्यता लक्षात घेता वाळत घातलेली हळद ताडपत्रीने झाकून ठेवावी.
नवीन लागवड केलेल्या फळपिकांच्या लहान रोपांना सावली करावी.
प्रखर सूर्यप्रकाशापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळांवर कागदी पिशव्यांचे आवरण घालावे.
भाजीपाला पिकांमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच त्वरित उपाय करावेत.
जनावराला पिण्यासाठी पाणी देताना त्यात थोडे मीठ मिसळून द्यावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉरसाउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.