Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढण्यास सुरवात झाली आहे. हवेचा दाब आज (ता.२०) १००८ हेप्टापास्कल, उद्या (ता.२१) १०१० हेप्टापास्कल, मंगळवारी (ता.२२) १०१२ हेप्टापास्कल इतके वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होईल. सुरवातीस गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पाऊस थांबेल. तसेच अरबी समुद्र व बंगालचा उपसागरावरही हवेचे दाब वाढत आहेत. तेथे या आठवड्यात हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहण्यामुळे मॉन्सून राज्याबाहेर पडण्यास अनुकूल हवामान स्थिती निर्माण होत आहे.
प्रत्येक मॉन्सून हंगाम हा वेगवेगळा असतो. हवामान बदलाच्या प्रभावामुळे मॉन्सूनही दिवसेंदिवस प्रभावित होताना दिसून येत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाश गरजेपेक्षा कमी मिळाला. त्याचा विविध पिकांचे वाढीवर तसेच उत्पादकतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. हवामान बदलाचे परिणाम शेती क्षेत्रावर फार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले. काही भागात अधिक पाऊस, तर काही भागात कमी पाऊस झाल्याचे दिसून आले. प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १६ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २१ अंश सेल्सिअस इतके कमी राहण्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव जाणवत असल्याचे आढळले. त्यामुळेही मॉन्सून महाराष्ट्राबाहेर पडण्यास उशीर झाल्याचे दिसून आले.
कोकण
आज आणि उद्या (ता.२०,२१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ते १४ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ५ ते ९ मिमी, रायगड जिल्ह्यात ७ ते १० मिमी, ठाणे जिल्ह्यात ९ ते १५, मिमी व पालघर जिल्ह्यात १४ ते १८ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ईशान्येकडून, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. म्हणजेच या आठवड्याच्या सुरवातीच्या काळात नैऋत्य मॉन्सून वाऱ्यांचा प्रभाव राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ८० टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज आणि उद्या (ता.२०,२१) नाशिक जिल्ह्यात २१ ते २८ मिमी, धुळे जिल्ह्यात २३ ते २५ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात ५ ते १० मिमी व जळगाव जिल्ह्यात ३ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ८० टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ५६ ते ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ५३ टक्के, तर नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३५ टक्के इतके कमी राहील.
मराठवाडा
आज आणि उद्या (ता.२०,२१) धाराशिव जिल्ह्यात २ ते १६ मिमी, लातूर जिल्ह्यात २ ते १३ मिमी, नांदेड जिल्ह्यात ८ ते ११ मिमी, बीड जिल्ह्यात १० ते २२ मिमी, परभणी जिल्ह्यात २ ते ११ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २ ते १४ मिमी, जालना जिल्ह्यात १ ते १३ मिमी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११ ते २० मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, धाराशिव, बीड व परभणी जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. तसेच जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ते पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात ७० टक्के, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ६२ ते ६८ टक्के राहील. धाराशिव, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५७ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज आणि उद्या (ता.२०,२१) बुलडाणा जिल्ह्यात १० ते १५ मिमी, अकोला जिल्ह्यात ५ ते ६ मिमी, वाशीम जिल्ह्यात १५ ते १९ मिमी व अमरावती जिल्ह्यात ५ ते ११ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५८ टक्के इतकी कमी राहील.
मध्य विदर्भ
आज आणि उद्या (ता.२०,२१) यवतमाळ जिल्ह्यात १३ ते १४ मिमी, वर्धा जिल्ह्यात १ ते १३ मिमी पावसाची शक्यता राहील. नागपूर जिल्ह्यात आज (ता.२०) १ मिमी पाऊस, तर उद्या उघडीप राहणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ८२ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ६० टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४३ ते ४६ टक्के इतकी कमी राहील.
पूर्व विदर्भ
आज आणि उद्या (ता.२०,२१) गडचिरोली जिल्ह्यात २ ते १२ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यात २ ते १५ मिमी पावसाची शक्यता राहील. आज (ता.२०) भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पूर्ण उघडीप राहणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ९१ टक्के, तर चंद्रपूरव गोंदिया जिल्ह्यांत ८० ते ८६ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज आणि उद्या (ता.२०,२१) कोल्हापूर जिल्ह्यात १० ते १५ मिमी, सांगली जिल्ह्यात ३ ते ४ मिमी, सातारा जिल्ह्यात ५ ते १२ मिमी, सोलापूर जिल्ह्यात १ ते १० मिमी, पुणे जिल्ह्यात १५ मिमी व अहिल्यानगर जिल्ह्यात १५ ते १८ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, सांगली व सातारा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर पुणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, सांगली, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९५ टक्के, तर दुपारची ५७ ते ८२ टक्के राहील.
कृषी सल्ला
रब्बी ज्वारी व हरभरा पिकाची पेरणी जमिनीत योग्य ओल असताना करावी.
द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करून घ्यावी.
रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी गादीवाफ्यावर रोप तयार करण्यासाठी बी पेरणी करा.
जमिनीतून तसेच बियाण्याद्वारे पसरणाऱ्या कीड-रोगांपासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणास जैविक व रासायनिक घटकांची बीजप्रक्रिया करावी.
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.