IMD Weather Forecast: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानंतर आता पावसाचा जोर ओसरला असून, बहुतांश भागांत उघडीप मिळाली आहे. मात्र कोकण आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा प्रभाव कायम असून, घाटमाथ्यावर दमदार सरी सुरूच आहेत. त्यामुळे प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक कायम असून खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे..राज्यात गुरुवारी (ता. ६) बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण आणि पश्चिम घाटातील काही मोजक्याच ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. सकाळी आठ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे १३९.५०, तर महाबळेश्वर येथे १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांतील काही मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला..Vidarbha Rain Update: विदर्भात पावसाचा जोर वाढला.घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव कायम असून दावडी, नवजा, ताम्हिणी, आंबोणे, भिरा, शिरगाव आणि डोंगरवाडी परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे सह्याद्रीतील धरणक्षेत्रात पाण्याची आवक सुरू असून, अनेक धरणांतून नियंत्रित विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे..कोकणात मागील काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पावसाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने मुंबईसह कोकणातील पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर विभागांतील बहुतांश प्रमुख धरणे ९० ते १०० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. चासकमान, पानशेत, खडकवासला आणि भाटघर ही धरणे पूर्ण भरली असून, उजनी धरणही जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. कोयना, मुळशी, पवना, वीर, भंडारदरा, निळवंडे, डिंभे आणि गिरणा धरणांतील पाणीसाठाही समाधानकारक आहे..Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात.मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असला, तरी जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, काही मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. विदर्भातही तुरळक स्वरूपाचा पाऊस सुरू असून गोसीखुर्द, तोतलाडोह आणि उर्ध्व वर्धा धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र काही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठ्यासाठी अजूनही पावसाची गरज आहे.जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे राज्यातील खरीप हंगामाला मोठा आधार मिळाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात आणि ऊस पिकांची वाढ समाधानकारक असून पिकांची स्थिती सुधारली आहे. धरणांतील भरघोस पाणीसाठ्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसातील खंड कायम राहिल्यास उशिराच्या पिकांसाठी नियमित पावसाची गरज कायम आहे..राज्यात गुरुवारी (ता. ६) ६५ मिलिमीटरपेक्षाअधिक पावसाची नोंदघाटमाथा : दावडी १३४, नवजा १२३, ताम्हिणी १०२, आंबोणे व भिरा प्रत्येकी ९०, शिरगाव ८०, डोंगरवाडी ७८, पोफळी ५८, लोणावळा कार्यालय ४७, वळवण ४५, खांड ३३, शिरोटा ३०, खोपोली २५, लोणावळा (टाटा) २४. ठाणे : ठाकुर्ली (अपर) ६७. रायगड : माणघरूण ८६. रत्नागिरी : आंबव, कडवई, माखजन प्रत्येकी ८८. सिंधुदुर्ग : आंबोली १३९, आंबेरी ६५, ओरस बुद्रुक ६५. सातारा : महाबळेश्वर १२२, मोरगिरी ७८, हेलवाक ७४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.