Paus Andaj : पुढील १५ दिवसात पाऊस कसा राहील?; माॅन्सून राज्यातून एकाच दिवसात का परतला ?

Rain Update : राज्यातही काही भागात पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात परतीच्या पावसाने राज्यातून एकाच दिवसात माघार घेतली. तर दक्षिण भारतातील चार राज्यांमध्ये ईशान्य माॅन्सून सक्रिय झाला असून तेथे चांगला पाऊस पडत आहे. राज्यातही काही भागात पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.  

परतीच्या पावसाविषयी श्री. खुळे म्हणाले की, परतीचा पाऊस दहा दिवस महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात मुक्काम ठोकून होता. मात्र मंगळवारी माॅन्सूनने महाराष्ट्र, सीमावर्ती मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक राज्यातून व संपूर्ण देशातून एका दिवसात निरोप घेतला. म्हणजे परतीचा पाऊस प्रवेश करतो-ना-करतो, तोच एका दिवसात महाराष्ट्रातून निघूनही गेला. थोडक्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस हा एका दिवसाठीच  महाराष्ट्राला स्पर्श करून गेला असेच म्हणावे लागेल. 

एका दिवसातच परतीच्या पावसाने राज्यातून का माघार घेतली? याविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, पॉंंडिचेरी, काराईकल, तामिळनाडू केरळ ह्या दक्षिणेकडील चार राज्याच्या भागात गेल्या आठवड्यापासून बंगालच्या उपसागरातून बळकट वेगवान पूर्वीय वाऱ्यांच्या वातावरणीय प्रणाल्यातून पूर्व ईशान्य मोसमी भरपूर पाऊस होत होता. ह्या प्रणाल्यांच्या रेट्यातूनच महाराष्ट्र, सीमावर्ती मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटकसहित राज्यातून व संपूर्ण देशातूनच परतीच्या पावसाने एका दिवसात हनुमान-उडी घेतली. 

Rain Alert
Heavy Rain Warning : आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला मुसळधारा; चेन्नईसह चार जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद

माॅन्सून यंदा उशीरा परतीच्या प्रवासावर निघाला होता पण वेळेत गेला काय? विषयी श्री. खुळे सांगतात की, होय ! मान्सून वेळेत गेला. जून ते सप्टेंबर ह्या ४ महिन्याच्या पावसाळ्यात मोसमी पावसाने १३९ दिवसानंतर म्हणजे निसर्गाने ठरवून दिलेल्या त्याच्या सरासरी कालावधीत हजेरी लावून महाराष्ट्रातून १५ ऑक्टोबरला निघून गेला. तो वेळेतच परतला म्हणून माॅन्सूनचे हे वर्तन नैसर्गिक व सुयोग्यच झाले असे समजावे. 

येणाऱ्या रब्बी हंगामावर काय परिणाम होतील? या प्रश्नाचे उत्तर देताना खुळे म्हणाले की, माॅन्सून वेळेत परतल्यामुळेच रब्बी हंगामाच्या पुढील सहा महिन्यासाठी निसर्गत: परंपरेने चालत आलेल्या वातावरणीय घटना म्हणजे थंडी,  बंगालच्या उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी अशी होणारे चक्रीवादळे व त्यांची सरासरी वारंवारेतील संख्या, कमी होणारी गारपीट व माफक असे धुक्याचे प्रमाण, थंडीतील भू-दवीकरण अर्थात कमी बादड, भू-स्फटिकिकरण म्हणजेच हिवाळ्यात बर्फाचा चुरा पडणे शिवाय वेळेतच पुन्हा ईशान्य माॅन्सूनचे निर्गमन होणे इत्यादी वातावरणीय घटना पार मार्च - एप्रिलपर्यंत सुयोग्य असे वातावरणीय बदल शेतीसाठी घडून येतील, असे वाटते.

दक्षिणेकडील चार राज्यात होणाऱ्या ह्या मान्सून पावसाच्या स्वरूपाविषयी श्री. खुळे सांगतात की, १५ ऑक्टोबरपासूनच ईशान्य माॅन्सूनचे रूपांतर झाले. म्हणजेच  पुढील तीन महिन्यासाठी तेथील चार राज्यात ईशान्य माॅन्सूनचे त्याचवेळी लगेचच आगमनच झाले असेच समजावे. महाराष्ट्रातही ह्यापुढे तीन महिने होणाऱ्या पावसाला ईशान्य माॅन्सून किंवा हिवाळी पाऊस म्हणूनच संबोधले जाते. 

Rain Alert
Monsoon : मॉन्सून देशातून परतला

राज्यात पुढील दोन आठवड्यात पाऊस कसा राहू शकतो? याविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, १७ ऑक्टोबरपर्यंत कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत मात्र मध्यम पावसाची शक्यता अधिक असेल, असे वाटते. ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यानचे पावसाचे दुसरे आवर्तन त्याच्या नियोजित तारखेऐवजी ४ दिवस अगोदर म्हणजे १८ ते २२ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात २४ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जाणवते.

सध्या चालु असलेल्या शेतकामासाठी ह्या पावसाची विशेष भिती बाळगू नये, असेही वाटते. विशेषतः मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणवते. 

सध्याचे तापमाने येत्या काळात काय परिणाम करू शकतात? याविषयी श्री. खुळे म्हणाले की, सध्या कमाल तापमान हे ३३ तर किमान तापमान हे २३ अंश सेल्सिअस  दरम्यान जाणवते. दोन्हीही तापमानातील दहा अंशाचा फरक पाहता, शिवाय पहाटचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा २ अंशाने कमी आहे. म्हणून ऑक्टोबर अखेर अपेक्षित थंडीचा हळूहळू प्रभाव तर दुपारचे कमाल तापमान हे सरासरी इतके आहे. म्हणून उर्वरित ऑक्टोबर महिन्यात 'ऑक्टोबर हिट'चाही परिणाम जाणवू शकतो, असे वाटते.              

ह्या दोन तापमानातील सध्याचा फरक हा वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण हळूहळू कमी होऊन पावसाचे प्रमाणही कमी होत जाईल. सकाळी पडणारे दवीकरणही सध्या कमी होईल. नंतर मात्र निरभ्र आकाशासहीत हळूहळू थंडीही आपली चाहूल दाखवील. कारण ला- निनाही अजून डोकावलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com