
Pune News: कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा जोर वाढला आहे. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी आठपर्यंत राज्यात ११३ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे ओढे, नाल्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होऊन धरणांतील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अप्पर वैतरणा, दारणा, गंगापूर, भंडारदरा, खडकवासला, घोड, हतनूर, वीर, राधानगरी अशा काही धरणांतून विसर्ग सोडल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. तर राज्यात अनेक ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत होता. त्या वेळी कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला होता. परंतु आता पुन्हा या भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सुमारे ९६ मंडलांत अतिवृष्टी झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्यात दोन, रायगडमधील २४, रत्नागिरीतील २६, सिंधुदुर्गमधील ४३ मंडलांत अतिवृष्टी झाली. तर पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम सरी बरसल्या.
अप्पर वैतरणा, तिलारी जलविद्युत प्रकल्प, मोडकसागर, तानसा, तुळशी, विहार, बारवी या धरणात वेगाने पाण्याची आवक वाढत आहे. तर अप्पर वैतरणा धरणातून १७ हजार ३३५ क्युसेकने वैतरणा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. तर कुंडलिका, जगबुडी नद्यांनी पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा, कोलाड, गोवे, पुई, वाकण, खारगाव, धटाव, खेड शहर, अलसुरे, चिंचघर, प्रभू वाडी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ताम्हिणी घाटमाथ्यानंतर दावडी घाटमाथ्यावर १६५ मिलिमीटर पाऊस पडला. तर डुंगरवाडी १५८, शिरगाव १५४, भिरा १४७, वळवण १३९, लोणावळा ११७, आंबोणे ११२, भिवपुरी १००, खोपोली १२२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोकणातील धबधबे ओसंडून वाहू लागले असून भात खाचरे तुडुंब भरली आहेत. झालेल्या पावसामुळे भात लागवडी वेगात सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. तर घाटमाथ्यावर दमदार पाऊस कोसळत आहे.
गुरुवारी (ता. ३) सकाळी आठपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २६० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे पुन्हा धरणांत आवक वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातही तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे दारणा, गंगापूर धरणांत वेगाने आवक सुरू असून विसर्ग ही कमीजास्त करण्यात येत आहे.
त्यामुळे नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्यातील दोन मंडलांत, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर चांगला आहे. तर पाच मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. कृष्णा कन्हेर, राधानगरी या धरणांत आवक वाढत असल्याने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे वेणा, भोगवती नद्या भरून वाहत आहेत.
विदर्भातही यवतमाळ जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे या भागात शेतात पाणी साचले असून पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. उर्वरित भागात ढगाळ वातवरणासह अधूनमधून ऊन पडत आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे.
राज्यात अतिवृष्टी झालेली मंडले : स्रोत- कृषी विभाग
कोकण : मुरबाड ९९, नयाहडी ९०, पनवेल, ओवाळे, कर्नाळा, नेरे ६५, कर्जत, चौक ८७, कळंब, कशेले, पाथ्रज ७४, उरण, कोपरोली, हमरापूर, वाशी ७१, मानगाव, निझामपूर ७०, इंदापूर, मालवण, नेरळ, चिचवली, आंबेरी ८६, रोहा ११३, कोलाड १३९, घोसाळे, तळा ७८, सोनसाडे १३९, खोपोली, भरणे, दाभोळ, मंडणगड ६७, पावस ७०, तरवल, फुंगूस, देवरूख, तुलसानी, माभळे ६६, फनसावणे ८४, अंगावली, कोंडगाव ७७, देवळे १६६, तेर्हे ८४, राजापूर ९५, सौदळ १२०, कोंडये १२७, जैतापूर,
नाटे ९५, कुंभावडे ११८, ओनी, पाचल १२०, लांजा ११०, भांबेड ८९, पुनस १०३, सातवली ७०, विळवडे ११०, देवगड ९३, पडेल ९८, मीतबंब ९१, शिरगाव, बापर्डे, तळेबाजार ११७, पेंडूर १६८, मसूर, आचरा १३२, श्रावण, पोईप १४३, सावंतवाडी, बांदा १२४, आजगाव, मदुरा, वेंगुर्ला, वेतोरे, मानगाव, मडगाव १३३, निरवडे १२५, आंबोली, मांडखोल, घोटस १३८, म्हापण, वालावल ९६, कणकवली, फोंडा, नांदगाव, वागडे १९३, तळेरे ११७, कुडाळ १०४, कडवल, ओरस १३७, कसाळ १४३, पिंगुळी १०४, वैभववाडी, येडगाव ११७, भुईबावडा १००
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी, घोटी, धारगाव ८१, कार्ला, खडकाळा, ताकवे खु १०८, लोणावळा, कुसगाव ११३, केळघर ७५, महाबळेश्वर ११५, आंबा ७७, गगनबावडा १३४, साळवण १०४, आजरा, गवसे ७३
विदर्भ : सावळी, अंजनखेड ६७
- ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २६० मिलिमीटर पावसाची नोंद
- राज्यात ११३ मंडलांत अतिवृष्टी
- पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यात संततधार
- मराठवाड्यात पावसाची उघडीप
- पूर्व विदर्भात यवतमाळमध्ये दोन मंडलांत अतिवृष्टी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.