
Pune News : मॉन्सूनचा पाऊस कोसळू लागल्याने कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत दमदार पाऊस होत आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. पावसाला सुरूवात झाली असली तरी राज्याच्या अनेक भागात अद्यापही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा आहे.
कोकणासह घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी सुरू झाल्याने नद्या, नाले, ओढे वाहू लागले आहेत. लवकरच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यातील कोर्ची येथे सर्वाधिक १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी (ता. २८) दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे. दुबार पेरणीच्या संकटातून जिल्ह्यातील शेतकरी सावरले. काहींनी लावणीपूर्वीची नांगरणी सुरू केली आहे. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात नद्यांचे पाणी वाढले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता. २८) पहाटेपासून जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस पडत आहेत. पावसामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मालवण, सावंतवाडी, देवगड या तालुक्यांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
याशिवाय इतर भागातदेखील जोरदार पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या पावसाने हजेरी लावली. बुधवार (ता. २८) सकाळपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. शेतकरी खरीप हंगामातील पिकांची टोकणी आणि पेरणीसाठी नियोजन करू लागला आहे. खानदेशात जोरदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही.
पावसाची स्थिती अशी...
- रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
- कोकणात पावसामुळे शेतीच्या कामांना वेग
- पुणे, नगर, नाशिक, सांगली जिल्ह्यात हलका पाऊस
- कोल्हापूरच्या पश्चिमेकडे सरी मागून सरी
- जळगाव, धुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण
- नागपुरात हलका पाऊस; अकोल्यात उघडीप
- परभणी, हिंगोली ढगाळ वातावरणात हलक्या सरी
- पुरेशा पावसाअभावी खानदेशासह सोलापूर, सांगली, पुण्याच्या पूर्व भागात, नाशिक, नगर, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पेरण्या रखडलेल्याच
- कोल्हापूर, मराठवाड्यासह बुलडाणा, अकोला, अमरावती आदी भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
१०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :
वाडा १४०, पालघर १३०, जव्हार १०० (जि. पालघर), देवगड ११०, वैभववाडी १००, मालवण १०० (जि. सिंधुदुर्ग), मुलदे ११० (जि. रत्नागिरी), ओझरखेडा १०० (जि. नाशिक), कोर्ची १६०, कुरखेडा १०० (जि. गडचिरोली) देवरी (जि. गोंदिया),
मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस (मिलिमीटर)(स्रोत - हवामान विभाग) :
कोकण :वाडा १४०, पालघर १३०, देवगड, मुलदे प्रत्येकी ११०, वैभववाडी, मालवण, जव्हार प्रत्येकी १००, पेण, माणगाव, रामेश्वर, मोखेडा प्रत्येकी ९०, मुरबाड, सावंतवाडी, भिवंडी प्रत्येकी ८०, शहापूर, ठाणे, तलासरी, उल्हासनगर, लांजा, रत्नागिरी, तळा प्रत्येकी ७०, पोलादपूर, दोडामार्ग, विक्रमगड, ठाणे, संगमेश्वर, चिपळूण, माथेरान, अंबरनाथ प्रत्येकी ६०, मंडणगड, सुधागड पाली, अलिबाग, कणकवली, दापोली, गुहागर प्रत्येकी ५०.
मध्य महाराष्ट्र :ओझरखेडा १००, गगनबावडा प्रत्येकी ९०, महाबळेश्वर ८०, धुळे ७०, इगतपुरी ६०, वेल्हे ५०, त्र्यंबकेश्वर,
पारोळा, हर्सूल, अकोले प्रत्येकी ४०, पेठ, एरंडोल, लोणावळा, नेवासा, राधानगरी, येवला प्रत्येकी ३०.
मराठवाडा :गंगापूर ६०, खुलताबाद ४०, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पूर्णा, चाकूर, सोनपेठ, मानवत, पाथरी, बदनापूर प्रत्येकी ३०.
विदर्भ :कोर्ची १६०, कुरखेडा, देवरी प्रत्येकी १००, देसाईगंज, सालकेसा प्रत्येकी ८०, लाखंदूर, भंडारा, सडक अर्जूनी, आमगाव प्रत्येकी ६०, अर्जूनी मोरगाव, आरमोरी, गोरेगाव, गोंदिया, पवनी प्रत्येकी ५०.
घाटमाथा :ताम्हिणी १५०, डुंगेरवाडी १४०, दावडी १००, आंबोणे, भिवपूरी प्रत्येकी ९०, कोयना ८०, शिरगाव प्रत्येकी ७०.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.