Monsoon Rain : ...अखेर पावसाने राज्याला भिजवले

Latest Rain News : तळ कोकणात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची थांबलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : तळ कोकणात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची थांबलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. दोन दिवस विदर्भात जोरदार कोसळणाऱ्या वरुणराजाने शनिवारी (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हजेरी लावली आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता खरिपाच्या पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

साधारणतः १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणाऱ्या मॉन्सूनने यंदा चांगलीच वाट पाहायला लावली. ११ जून रोजी तळ कोकणात दाखल झालेल्या मॉन्सूनने पुढील चाल करण्यासाठी तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी घेतला.

यातच पूर्वमोसमी पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पूर्वमशागतीसह पेरण्यांची कामे खोळंबली होती. मात्र मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत झाल्यानंतर दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस पडत आहेत. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. पावसाअभावी भात रोपवाटिकेतील रोपे करपण्याची शक्यता होती. तर अनेक भागांत रोपांची उगवण झाली नव्हती. रत्नागिरी जिल्ह्यातही पाऊस झाला.

रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे, शिवार आंबेरे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. उकाड्याशी दोन हात करणाऱ्या मुंबईकरांना शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून दिलासा दिला. शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि ठिक ठिकाणी लोकल ट्रॅकवर पाणी साचले. उपनगरांतही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

Rain Update
Monsoon Update : पूर्व विदर्भात मॉन्सून दाखल

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता.२४) दुपारनंतर निफाड, येवला व चांदवड तालुक्यांत दमदार सरी बरसल्या. अनेक भागांत शेतात पाणी साचले. जिल्ह्यात अनेक भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. तर दुपारी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला.

सातारा जिल्‍ह्यात शनिवारी दुपारनंतर पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यांत कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

अकोला जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२३) रात्री हलक्या स्वरूपाच्या सरी आल्या. त्यानंतर शनिवारी (ता.२४) पुन्हा पावसाने उघडीप दिली आहे. पूर्व विदर्भात मॉन्सून दाखल झाल्यानंतर अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत मात्र अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही.

वाशीम जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. अकोला शहरातही रिझमिझ पाऊस सुरू झाला. मात्र पेरणी योग्य दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने कमीअधिक हजेरी लावली.

सोलापूर जिल्ह्यातही काही भागांत पाऊस झाला. नगर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. पाथर्डी तालुक्यात हलकासा पाऊस झाला. कोपरगाव, संगमनेर तालुक्यांतील काही भागात पावसाने हजेरी लावली.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटात हलका पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर परिसरात जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी परिसरात पाऊस पडला. खानदेशातील धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस झाला.

Rain Update
Monsoon 2023: माॅन्सूनची सोलापूर, उदगीर, नागपूरपर्यंत मजल!

शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील राज्यातील पाऊस (मि.मी.)

कोकण : दोडामार्ग ९०, कणकवली ८०, सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ प्रत्येकी ६०, मुरूड, मुलदे प्रत्येकी ५०, राजापूर ४०, देवगड, लांजा, श्रीवर्धन प्रत्येकी ३०, संगमेश्‍वर, महाड, पनवेल प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ९०, चंदगड ५०, हर्सूल, मंगळवेढा, पेठ प्रत्येकी २०, महाबळेश्‍वर, इंदापूर प्रत्येकी १०

मराठवाडा : आंबाजोगाई ३०, निलंगा २०, सेलू, उदगीर, सोनपेठ, जिंतूर, परळी वैजनाथ प्रत्येकी १०.

विदर्भ : सावनेर, काटोल प्रत्येकी ५०, नरखेडा ४०, वरूड ४०, कळमेश्‍वर, गोंदिया, जेवती, चिखलदरा प्रत्येकी ३०.

...असा बरसला पाऊस

- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरींवर सरी

- कोल्हापुरातही पावसाची कमी अधिक हजेरी

- धुळ्यातील साक्रीच्या पश्‍चिम भागात तुरळक पाऊस

- नाशिकमधील निफाड, येवला व चांदवड तालुक्यांत दमदार सरी

- सोलापूर, साताऱ्यात पावसाची हजेरी

- सांगली, जळगावमध्ये ढगाळ वातावरण

- परभणी,‌ हिंगोलीत ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप

- पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी.

- नागपुरात उघडीप

- बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटात हलक्या सरी

- नगरच्या कोपरगाव, संगमनेर भागात हजेरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com