
Agriculture Weather : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता.१,२) १००८ ते १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मंगळवारपासून हवेचे दाब १०१० ते १०१२ हेप्टापास्कल होताच किमान तापमानात घसरण होऊन कडाक्याच्या थंडीत वाढ होईल. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
ईशान्येकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढले. पहाटे व सकाळी कडाक्याची थंडी जाणवेल. नाशिक जिल्ह्यातील निफाड तसेच धुळे, परभणी, अहिल्यानगर, जळगाव, पुणे जिल्ह्यांत उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होईल.
किमान तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यास पिके सुकतात. काही पिकांना ते सहन न झाल्यास मरतात. त्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे ठरते. फळबागांमध्ये शेकोट्या करून पहाटेच्या वेळी अल्पशा प्रमाणात किमान तापमानात वाढ करणे गरजेचे ठरते. कुक्कुटपालन शेडमध्ये लाइटचे बल्ब लावून शेडमधील तापमान वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जनावरांचे शेडच्या बाजूने झाप बांधून थंड वारे आत येणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते.
दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत मोठ्या प्रमाणात घट होण्यामुळे काही भागात तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दुपारीही थंडी जाणवण्यास सुरुवात होईल. ऊस पिकातील साखर उतारा वाढण्यास थंडी उपयुक्त ठरेल. तसेच गव्हाचे फुटव्यांचे प्रमाणही वाढेल.
आंबा पिकास मोहर येण्यास थंडी उपयुक्त ठरेल. प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २२ अंश सेल्सिअस, तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे हवामान ढगाळ राहील. सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता आहे.
कोकण
वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान रायगड व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील.
ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी जिल्ह्यात ५१ टक्के, तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४१ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३० ते ३२ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ ते २७ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
या आठवड्यात तापमानात चढ-उतार जाणवतील. जळगाव जिल्ह्यात व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस व नंदुरबार जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ५१ टक्के, तर नंदुरबार, धुळे व नाशिक जिल्ह्यांत २२ ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ताशी ७ कि.मी., तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ताशी ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
मराठवाडा
ढगाळ हवामानामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होऊन थंडीवर परिणाम होणे शक्य आहे. उद्या (ता.२) लातूर व धाराशिव जिल्ह्यांत ०.१ ते ०.३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील. बंगालच्या उपसागरात चक्राकार वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे मराठवाडा विभागात हवामान बदल जाणवण्याची शक्यता आहे.
वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी ७ कि.मी., तर नांदेड, परभणी व जालना जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी. राहील. बीड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ कि.मी., तर लातूर जिल्ह्यात ताशी १० कि.मी. व धाराशिव जिल्ह्यात ताशी १३ कि.मी. राहील.
कमाल तापमान लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर उर्वरित धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, लातूर, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५३ ते ६७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३२ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला व अमरावती जिल्ह्यांत ताशी ५ ते ६ कि.मी. व बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ताशी ७ ते ८ कि.मी. राहील.
कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५१ ते ५३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा वेग यवतमाळ जिल्ह्यात ताशी ८ कि.मी., तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ताशी ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ७२ टक्के, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ६० ते ६२ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ३४ ते ३७ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी., तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ताशी ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. गडचिरोली जिल्ह्यात आज (ता.१) १.६ मि.मी. व उद्या (ता.२) २.६ मि. मी. पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
उद्या (ता.२) कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी., तर कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ताशी ५ कि.मी. व अहिल्यानगर जिल्ह्यात ताशी ७ कि.मी. राहील.
कमाल तापमान कोल्हापूर, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील.
कृषी सल्ला
ऊस तोडणीनंतर उसाची पाचट सऱ्यात ओढून त्यावर पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचे द्रावण टाकावे. त्यामुळे पाचट लवकर कुजून उत्तम खत होते.
पिकांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सायंकाळी सिंचन करावे. त्यामुळे जमिनीचे तापमान योग्य राखण्यास मदत होते.
जनावरांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून बंदिस्त गोठ्यात जनावरे बांधावीत.
कुक्कुटपालन शेडमध्ये तापमान वाढविण्यासाठी बल्ब लावावेत.
आंबा मोहर निघताच मोहराचे किडीपासून संरक्षण करावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.