Maharashtra Weather Update : ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता नाही

Rain Prediction : फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ‘ला- निना’ स्थिती आहे. एप्रिल २०२५ पर्यंन्त त्याचे अस्तित्व जाणवणार आहे.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

माणिकराव खुळे

Maharashtra Weather Forecast : सध्या घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेचे प्रत्यावर्ती चक्रीय वारे हे केवळ ओरिसा राज्यावर स्थिर आहेत. त्यामुळे बंगाल उपसागरातून ताशी ३० ते ३५ कि.मी. वेगाने महाराष्ट्राकडे आर्द्रता घेऊन येणारे अपेक्षित वेगवान पूर्वीय वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात अपेक्षित ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता त्याबरोबरच मावळली आहे.

हवेत गारवा वाढण्याची शक्यता

मावळलेल्या पावसाळी वातावरणामुळे महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. त्यामुळे पुढील १० दिवस म्हणजे बुधवार १२ फेब्रुवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या १० दिवसात, चढ- उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे.

किमान तापमानात २ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होणार असली तरी हे किमान तापमान सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअस अधिकच असेल. कारण पूर्वी ढगाळ वातावरणामुळे ३ ते ५ अंश सेल्सिअसने होणाऱ्या वाढीऐवजी २ अंश सेल्सिअसच्या घसरणीमुळे एकूणच किमान तापमानात आता केवळ सरासरीपेक्षा अंदाजे २ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता जाणवते.

Weather Update
Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात उन्हाच्या झळा

किमान तापमानातील २ किंवा अधिक अंश सेल्सिअसपर्यंत घसरण, विशेषतः मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात अधिक जाणवेल.

आतापर्यंतच्या थंडीच्या कालावधीत महाराष्ट्रात सहसा फेब्रुवारी महिन्यात सरासरी ५ ते ७ दिवसाच्या थंडीच्या लाटेचा कालावधी दिसतो. या वर्षीच्या ‘ला- निना’ मुळे फेब्रुवारी महिन्यात साधारण ५ ते ७ दिवस कालावधीच्या थंडीच्या लाटेची अपेक्षा आहे.

वातावरणातील सध्याचा हा बदल हवेत गारवा वाढून, उशिरा लागवडीच्या रब्बी पिकांसाठी लाभदायी ठरणार आहे. शिवाय ढगाळ व दमट वातावरणाची शक्यता दुरावल्यामुळे उशिरा लागवड झालेल्या रब्बी पिकांवर कीड,रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाही. तसेच किरकोळ पावसाबरोबर ४, ५ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता नाही.

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकण आणि पुणे, सातारा या जिल्ह्यातील पट्यात ही शक्यता अधिकच दाट आहे. त्यामुळे थंडी साधारणच राहून एखाद- दुसरी थंडीची लाट जाणवेल.

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता अधिक आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाणवणारे कळंघण किंवा सुटणाऱ्या थंड वाऱ्याचे वरळ या वर्षीच्या‘ला- निना’मुळे फेब्रुवारी महिन्यात जाणवण्याची शक्यता आहे. याचा रब्बी पिकांना फायदेशीर ठरेल.

पूर्व मोसमी काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेची स्थिती

पूर्व मोसमी काळातील मार्च, एप्रिल, मे या महिन्यात घडणारे बदल हे अवकाळी पाऊस, गारपीट व उष्णतेची तीव्रता ही एन्सो, आयओडी आणि एम.जे.ओच्या स्थित्यंतरावर अवलंबून असतात. शिवाय देशातील पूर्व मोसमी हंगाम, दीर्घ पल्ल्याच्या अंदाजासाठी जागतिक पातळीवर आत्तापर्यंत इतर हवामान घटकांच्या केलेल्या निरीक्षणांच्या नोंदी विचारात घेतल्या जातात.

मे महिन्यात ला- निना जाऊन एन्सो तटस्थेत जाणार आहे. बऱ्याच कालावधीपासून तटस्थ असलेल्या आयओडीत एप्रिल महिन्यात बदलाची शक्यता आहे. त्याच बरोबर ९२ दिवसांच्या पूर्वमोसमी काळात, मार्गस्थ होणारा एम.जे.ओ, कधी, किती दिवस व किती एम्प्लिटुडने हिंद महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्रात मार्गक्रमण करणार आहे, ह्या सर्व गोष्टीवर अवलंबून आहे.

१ मार्च दरम्यान घोषित होणाऱ्या पूर्व-मोसमी हंगामाच्या, दीर्घ पल्ल्याच्या अंदाजानंतर यावर्षीचा पाऊस, गारपीट आणि उष्णतेची स्थिती अधिक स्पष्ट होईल.

ला-निना, इंडियन ओशन डायपोल आणि एम.जे.ओ ची स्थिती

Weather Update
Maharashtra Weather: राज्यातील थंडीच कमीच राहणार ; बहुतांशी भागात तापमानातील चढ उतार कायम

ला-निना

सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ‘ला- निना’ स्थिती आहे. अजून तीन महिने म्हणजे एप्रिल २०२५ पर्यंन्त त्याचे अस्तित्व जाणवणार आहे. मे २०२५ नंतर पुन्हा एन्सो तटस्थ अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. पुढील २०२५ च्या मान्सून संबंधी खुलासा हा येणाऱ्या १५ एप्रिलला होईल.

इंडियन ओशन डायपोल

हिंद महासागरीय द्विध्रुवीता सुद्धा ( इंडियन ओशन डायपोल) सध्याच्या कालावधीत तटस्थ अवस्थेत आहे. पुढील दोन महिन्यापर्यंत म्हणजे मार्च २०२५ अखेर पर्यन्त ही तटस्थ अवस्था टिकून राहण्याची शक्यता जाणवते.

एम.जे.ओ

हिंद महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्रात मागील आठवड्यापर्यंत जानेवारी २०२५ अखेर एक एम्प्लिटुडसह (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) एम.जे.ओ.ची उपस्थिती जाणवली.

सध्या एम.जे.ओ हिंद महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्राच्या बाहेर आहे. त्यामुळे अवकाळी पावसासाठी त्याची पूरक स्थिती सध्या नाही.

जागतिक पातळीवरील वातावरणावर परिणाम करणाऱ्या सहसा या तीन प्रणालीच्या घडामोडी आणि सध्याची स्थिती अशा पद्धतीची जाणवत आहे.

कमाल आणि किमान तापमानाची स्थिती

कोकण

मुंबईसह संपूर्ण कोकणातील जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १७ ते २० अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २७ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दोन्ही तापमान काहीसे सरासरीच्या खाली घसरले असल्यामुळे मुंबईसह कोकणातील वातावरण आल्हाददायक जाणवत आहे.

उर्वरित महाराष्ट्र

उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात (सोलापूर,कोल्हापूर २० अंश सेल्सिअस वगळता) पहाटेचे किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान (जळगाव ३० अंश सेल्सिअस आणि महाबळेश्वर २८ अंश सेल्सिअस वगळता) ३१ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

भागपरत्वे किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळे २९ जिल्ह्यात दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे.

फेब्रुवारी महिन्यात पावसाची शक्यता आहे काय?

आत्तापर्यंत जमा झालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्राची फेब्रुवारी महिन्याची पावसाची मासिक सरासरी ही साधारण दोन ते सव्वा दोन सेंमी इतकी असते. अर्थात सरासरी क्षेत्र आधारित दोन ते सव्वा दोन सेंमी पाऊस या हंगामात किरकोळ पाऊस समजावा आणि सरासरी पावसाचा दिवसही एखादाच असतो.

फेब्रुवारी महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ मिळून १८ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी तर उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.

- माणिकराव खुळे, ९४२२०५९०६२

(सेवानिवृत्त ज्येष्ठ हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com